बिल मंजुरीसाठी पन्नास हजार स्वीकारले
नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा परिषद बांधकाम विभागातील लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला बिल मंजुरीसाठी 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना बुधवारी (दि. 18 मार्च) उघडकीस आली. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.
तक्रारदारांंनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र कार्यालयात दिलेल्या तक्रारीनुसार, चे. त्र्यंंबकराज कृपा मजूर व बांधकाम सहकारी सोसायटी मर्या., मु.पो. पिंपळद (त्र्यंं) ता. त्र्यंंबकेश्वर, जि. नाशिक यांच्यामार्फत गडदवणे व तुंगारपाडा (ओझरखेड) येथील सिमेंट काँक्रीट बंधारा दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली होती. या कामांमध्ये गडदवणे येथील कामाची निविदा रक्कम 9,74,887 रुपये असून, त्याची निव्वळ देय रक्कम 8,09,131 रुपये आहे. तुंगारपाडा (ओझरखेड) येथील कामाची निविदा रक्कम 9,75,417 रुपये असून, त्याची निव्वळ देय रक्कम 8,10,159 रुपये आहे. अशी एकूण 16,19,290 करण्यात आली होती.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, जिल्हा परिषद बांधकाम विभागातील लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती वैशाली ठाकरे तसेच वरिष्ठ सहायक लेखा अधिकारी अरुण धारणकर यांनी सुरुवातीला 72 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर पंचासमक्ष तडजोड होऊन 50 हजार रुपयांवर व्यवहार ठरविण्यात आला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून बुधवारी (18 मार्च) जिल्हा परिषद बांधकाम विभागातील लघुपाटबंधारे विभागाच्या कक्षात आरोपी कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे यांनी तक्रारदाराकडून 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
Zilla Parishad’s female executive engineer caught taking bribe