पुरातून एकाच कुटुंबातील 15 जणांना वाचवण्यात यश

पिंप्रीसदोजवळ नदीला पूर; प्रशासन, पोलिसांचे थरारक रेस्क्यू

इगतपुरी : प्रतिनिधी
पिंप्रीसदो नदीला आलेल्या भीषण पुरामुळे नदीकाठी राहणार्‍या एका आदिवासी कुटुंबातील 15 सदस्यांसह एका पाळीव श्वानाला प्रशासनाने सुखरूप बाहेर काढले. शासकीय यंत्रणेची सतर्कता आणि पोलीस पथकाच्या धाडसी कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भावली धरणाकडे जाणार्‍या पिंप्रीसदो शिवारात नदीकाठच्या आदिवासी कुटुंबांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अभिजित बारवकर आणि पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
पाण्याचा प्रवाह अत्यंत तीव्र असताना बचाव पथकाने छातीएवढ्या पाण्यात उतरून लाइफ जॅकेट आणि दोरीच्या सहाय्याने अत्यंत बिकट परिस्थितीत रेस्क्यू ऑपरेशन राबवले. या कारवाईत लहान मुले, वृद्ध आणि महिलांसह सर्व 16 जणांना पुराच्या तावडीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
बाधित कुटुंबाची शहरात माहेश्वरी मंगल कार्यालयात राहण्याची व भोजनाची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या मदतकार्यात तहसीलदार बारवकर, पोलीस निरीक्षक बळप, पोलीस उपनिरीक्षक अमोल गायधनी, पुरवठा अधिकारी ललित पाटील, मंडळ अधिकारी जी. डी. कुलकर्णी, तलाठी सचिन कल्याणकर, पोलीस कर्मचारी व महसूल पथकाने मोलाची भूमिका बजावली.

15 members of the same family successfully rescued from the floods.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *