इगतपुरी तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग

240 मिमी पावसाची नोंद; भावलीजवळील पूल पाण्याखाली

इगतपुरी : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यात मुसळधार पावसाची संततधार सुरूच असून, गेल्या 24 तासांत तब्बल 240 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे भावली धरणाकडे जाणार्‍या पिंप्रीसदो रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने भावली, तळोघ, तळोशी, बोरली, तारांगण पाडा, मानवेढे, धामडकीवाडी, जामुंडे, भगतवाडी व आंबेवाडी आदी गावांचा इगतपुरी शहराशी संपर्क तुटला आहे.
सततच्या पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, भाम धरणाच्या बाजूने जाणार्‍या रस्त्यावर दरड कोसळल्याने मांजरगावकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. रस्ते व पूल पाण्याखाली गेल्याने दैनंदिन कामे, शाळा, आरोग्य सेवा आणि अत्यावश्यक प्रवासावर मोठा परिणाम झाला असून, परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. इगतपुरीत आतापर्यंत एकूण 1699 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पूरपरिस्थिती आणि दरड कोसळण्याच्या घटना लक्षात घेता प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी विनाकारण पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून अथवा पुलावरून प्रवास करू नये आणि सुरक्षिततेची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Heavy rainfall in Igatpuri Taluka.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *