दुष्काळग्रस्त दहा तालुक्यांसाठी 4 लाख 27 हजार क्विंटल धान्य मंजूर

जिल्ह्यातील 36 लाख 62 हजार लाभार्थ्यांना मोफत धान्य

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात दुष्काळाची प्रथम यादी जाहीर झालेल्या दहा तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांसाठी चार लाख 27 हजार 400 क्विंटल अन्नधान्याच्या नियतनास मंजुरी देण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील 36 लाख 62 हजार 117 लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचा लाभ देण्यात येत आहे. सप्टेंबर 2026 मध्ये जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजनेच्या 7 लाख 26 हजार 303 आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या 29 लाख 35 हजार 814 अशा एकूण 36 लाख 62 हजार 117 लाभार्थ्यांना ऑनलाइन वितरण प्रणालीद्वारे मोफत अन्नधान्य देण्यात आले.
ऑक्टोबरसाठीही धान्य वितरण सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या 25 सप्टेंबर 2026 रोजीच्या निर्णयानुसार, पर्जन्यमानातील तूट व अन्य घटकांमुळे राज्यातील 265 तालुके प्रभावित झाले आहेत. यात नाशिक जिल्ह्यातील दहा तालुक्यांचा समावेश आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, शेतमजूर आणि गरजू कुटुंबांना अन्नधान्याची टंचाई भासू नये, यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील शासकीय गोदामांची एकूण साठवण क्षमता पाच लाख 8 हजार 880 क्विंटल आहे. मंजूर नियतनापैकी दोन लाख 26 हजार 820 क्विंटल अन्नधान्याची उचल पूर्ण झाली आहे. उर्वरित धान्याची उचल वेळेत पूर्ण करून रास्तभाव दुकानांमार्फत पात्र लाभार्थ्यांना वितरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या व्यक्तींनी धान्याची मागणी केल्यास, शासनाच्या निकषांनुसार उत्पन्न आणि उपलब्ध इष्टांकाची पडताळणी करून पात्रतेनुसार त्यांचा अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंब योजनेत समावेश करण्यात येणार आहे. शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे आधार जोडणीकरण पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ तातडीने देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. कोणतेही पात्र कुटुंब अन्नधान्यापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाचा प्रयत्न आहे.

स्थलांतरितांनाही मिळणार धान्य
दुष्काळामुळे रोजगार किंवा पाण्याच्या शोधात अन्य भागांत स्थलांतर करणार्‍या पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या सोयीच्या रास्त भाव दुकानातून धान्य घेता यावे, यासाठी पोर्टेबिलिटी सुविधेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. योजनेत नसलेल्या गरजू व्यक्तींच्या पात्रतेची पडताळणी करून त्यांना योजनेत समाविष्ट करण्याची कार्यवाहीही केली जाणार आहे. शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे आधार जोडणीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे.

4.27 lakh quintals of food grain sanctioned for ten drought-affected talukas.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *