गरब्याच्या मैदानात डिझायनर पगडीचा जलवा

ड्रेसला राजेशाही लूक देण्यासाठी तरुणाईची पसंती

नाशिक : प्रतिनिधी
नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, गरबाप्रेमींमध्ये पारंपरिक पोशाखासोबतच आकर्षक दागदागिने आणि विविध अ‍ॅक्सेसरीजची क्रेझ वाढली आहे. यंदा गरबा मैदानांवर ड्रेसला साजेसा राजेशाही लूक देणार्‍या डिझायनर पगडीने विशेष लक्ष वेधले आहे. देवीची प्रतिमा, चमकदार खडे, रंगीबेरंगी पिसे आणि आकर्षक कलाकुसर असलेल्या या पगड्यांना गरबा स्पर्धांमध्ये सहभागी होणार्‍या तरुणाईकडून पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे, या पगड्या खरेदी करण्याऐवजी भाडेतत्त्वावर घेण्याकडेही गरबाप्रेमींचा कल वाढला आहे. त्यासाठी दिवसाला पाचशे ते एक हजार रुपये मोजावे लागत आहेत.
नवरात्रोत्सव आणि गरबा एक समीकरणच आहे. त्यामुळे नवरात्रोत्सव सुरू झाला की, विविध गरबा, रासदांडियाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येते. गरबा नाइट्ससाठी तरुणाईची वाढती क्रेझ असल्याने हटके आणि डिझायनर लूकसाठी तरुणाई शोधात असते. त्यामुळे यंदा गरबा पोशाखाला साजेशे असे मुले आणि मुलींच्या घागरा, धोतीवर मॅचिंग अशा पगड्यांना मागणी वाढल्याचे चित्र आहे.
गरबा पोशाखाला उठावदार आणि वेगळा लूक देण्यासाठी बाजारात विविध प्रकारच्या डिझायनर पगड्या उपलब्ध आहेत. पगडीच्या मध्यभागी देवीची छोटी मूर्ती किंवा प्रतिमा लावली जाते. त्यासोबत चमकणारे खडे, रंगीबेरंगी पिसे, पेपर फॅन्स, काचांचे नक्षीकाम आणि आकर्षक लेसचा वापर करून पगडी सजवली जाते. पोशाखाच्या रंगाशी जुळणारी पगडी निवडून गरबाप्रेमी आपला लूक अधिक आकर्षक दिसण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या पगडीची क्रेझ वाढली असून, पगडी भाडेतत्त्वावर घेण्यास पसंती दिली जात आहे. नृत्य करताना अडथळा येऊ नये, यासाठी या पगड्या वजनाने हलक्या आणि डोक्यावर व्यवस्थित बसतील अशा पद्धतीने तयार केल्या जातात.
डिझायनर पगड्यांची वाढती लोकप्रियता लक्षात घेता त्या भाडेतत्त्वावर देण्याचा पर्यायही उपलब्ध झाला आहे. पगडीच्या डिझाइननुसार दिवसाला पाचशे ते एक हजार रुपये भाडे आकारले जात आहे. महागडी पगडी विकत घेण्याऐवजी आपल्या गरबा ड्रेसच्या रंगाशी जुळणारी पगडी भाडेतत्त्वावर घेण्यास अनेक जण पसंती देत आहेत. त्यामुळे यंदाच्या नवरात्रोत्सवात आकर्षक पोशाखांसोबतच डिझायनर पगडी हा गरबाप्रेमींच्या लूकचा महत्त्वाचा भाग ठरत आहे.

गरब्याला मिळणारे वाढते व्यावसायिक स्वरूप आणि विविध मैदानांवर आयोजित केल्या जाणार्‍या स्पर्धांमुळे आकर्षक पोशाखांसह डोक्यावरच्या सजावटीकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी व्यावसायिक गरबा नृत्यकलाकारांकडून डिझायनर पगड्यांना पसंती दिली जात आहे. लाइटवेट असणार्‍या या पगड्यांना मागणी वाढली आहे.
– वृषाली माहेगावकर, संचालिका, कला द डिझायनर

 

Designer turbans steal the show at the Garba ground.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *