रिपब्लिकन पक्षाची गांधीगिरी; प्रशासनाचा निषेध, रस्तेदुरुस्तीबाबत निवेदन
चांदवड : वार्ताहर
शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने बुधवारी (दि. 20) गांधीगिरी पद्धतीने अनोखे आंदोलन केले. आंदोलकांनी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात चक्क कागदी होड्या सोडून प्रशासनाचा निषेध केला आणि तात्काळ रस्ते दुरुस्तीची मागणी केली. या आंदोलनानंतर नगरपरिषद मुख्याधिकार्यांना याबाबत निवेदनही देण्यात आले.
शहर झाले खड्डेमय गाव
चांदवड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर रोड, गणपती मंदिर रोड, शिवाजी चौक रोड आणि सार्वजनिक वाचनालय रोड यांसारख्या प्रमुख रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. सर्वत्र मोठमोठे खड्डे पडले असून, पावसाचे पाणी साचल्याने या खड्ड्यांचा अंदाज घेणे कठीण झाले आहे. या समस्येकडे सरकारी अधिकार्यांचे दुर्लक्ष होत असल्याने, चांदवड शहराला खड्डेमय गाव म्हणून ओळख मिळाली आहे, असा आरोप राजाभाऊ आहिरे यांनी केला.
आरोग्य धोक्यात, अपघातात वाढ
गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील नागरिकांना चांगले रस्ते मिळालेले नाहीत, त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. खड्ड्यांमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांना अपघात होत असून, अनेकजण जखमी झाले आहेत. काही लोकांचे हात-पाय फ्रॅक्चर झाले आहेत, तर काहींना पाठीच्या मणक्यांचे गंभीर आजार जडल्याचे आंदोलकांनी सांगितले. विशेषतः वयोवृद्ध आणि विद्यार्थ्यांची या रस्त्यांवरून ये-जा करताना मोठी गैरसोय होत आहे. शहरात गेल्या 15-20 वर्षांत कोणतेही विकासकाम झालेले नाही, असा आरोपही
करण्यात आला.
उपाययोजना न केल्यास आंदोलन
आंदोलनकर्त्यांनी नगरपरिषदेला तात्काळ सर्व रस्त्यांची दुरुस्ती करून त्यांना नवीन स्वरूप देण्याची मागणी केली.
जर प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)तर्फे आमरण उपोषण आणि त्याहूनही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राजाभाऊ आहिरे यांनी दिला. त्यावेळी निर्माण होणार्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले. आंदोलनात रिपब्लिकन पक्षाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.