मका, सोयाबीनसह खरिपातील पिकांना दिलासा
निफाड : विशेष प्रतिनिधी
निफाड तालुक्यात संततधार पावसामुळे सोयाबीन, मका पिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, जनजीवन विस्कळित झाले. बुधवारी दुपारी चारच्या दरम्यान निफाड-उगाव रस्त्यावर झाड पडल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. मात्र, पडलेले झाड तातडीने दूर केल्यानंतर वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली.
निफाड तालुक्यामध्ये 2 ते 13 ऑगस्टदरम्यान पावसाने दडी मारल्याने सोयाबीन व मका उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. या 12 दिवसांमध्ये कडकडीत ऊन पडत असल्याने सोयाबीन व मका पिकांना विहिरीचे पाणी भरावे लागते की काय, या चिंतेत शेतकरी होते, तर काही शेतकर्यांनी आपापल्या सिंचनाच्या साधनाद्वारे पाणी भरण्यास सुरुवात केली होती.
मागील तीन ते चार दिवस तालुक्यात कुठेना कुठे पाऊस कमी-जास्त प्रमाणात हजेरी लावत होता; परंतु सर्वत्र पाऊस झाला नव्हता, मात्र बुधवारी (दि. 20) कोटमगाव, खानगाव, वनसगाव, उगाव या गावांना पावसाने झोडपले. मंगळवारी रात्रीही मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला. मात्र, बुधवारी सकाळपासून संततधार पावसाने तालुक्यात सुरुवात केली. हा पाऊस जवळजवळ दुपारी चारपर्यंत पडत होता.
पावसाने निफाड, जळगाव, काथरगाव, कोठुरे, गोंडेगाव, चांदोरी, सायखेडा, मांजरगाव, खानगावथडी, नांदूरमध्यमेश्वर, गाजरवाडी, नैताळे, धारणगाव वीर, धारणगाव खडक यांसह परिसरात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळित झाले होते. उद्योग -व्यवसायावर परिणाम झाला होता. हा पाऊस खरीप पिकांना पोषक ठरला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.