किमयागार!

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल विरोधकांच्या इंडिया आघाडीतील पक्षांना मोठा धक्का देणारे आहेत. यात अपवाद आहे तो केरलम् राज्याचा. या राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डावी लोकशाही आघाडी यांच्यातच पारंपरिक लढत होत असते. पाच वर्षांनी सत्तापरिवर्तन हे या राज्याचे वैशिष्ट्य आहे. कधी संयुक्त लोकशाही आघाडी, तर कधी डावी लोकशाही आघाडी सत्तेवर येत असते. यावेळी संयुक्त लोकशाही आघाडीने डाव्या लोकशाही आघाडीचा पराभव केला. हा निकाल अपेक्षितच होता. दोन्ही आघाड्या भाजपाच्या विरोधात आहेत. भाजपाला या राज्यात खाते उघडता आले नाही. आसाम व पश्चिम बंगालमध्ये सुसाट असलेल्या भाजपाच्या ‘वंदे भारत’ सुपरफास्ट एक्स्प्रेसला तामिळनाडू व केरलम् या दाक्षिणात्य राज्यांत थांबावे लागले. विरोधकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीतील आक्रमक नेत्या ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस भाजपाला रोखू शकली नाही. आसाममध्येही भाजपाला रोखण्यात काँग्रेसला अपयश आले. पुद्दुचेरी या छोट्याशा केंद्रशासित राज्यातही विरोधक निष्प्रभ ठरले. प. बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्याचे विश्वासू सहकारी अमित शहा यांच्या जादूने बंगालींना प्रभावित केले. दुसरीकडे, तामिळनाडूत थलपती विजय किमयागार ठरले. त्याच्या तमिळगा वेत्तरी कळघम (टीव्हीके) पक्षाने सत्ताधारी द्रमुक आणि विरोधी अण्णा द्रमुक या दोन्ही द्राविडी पक्षांना आणि त्यांच्या आघाड्यांना आरसा दाखविला. लोकसभा व राज्यांच्या विधानसभांत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यासाठी भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने लोकसभेत मांडलेले घटनादुरुस्ती विधेयक दोन तृतीयांश बहुमताअभावी
फेटाळले गेले. सरकारने आरक्षणाचा संबंध मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी विधेयकात जोडला. महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यासाठी मतदारसंघांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव सरकारने मांडला. हीच बाब विरोधकांना खटकली. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरू असताना राजकीय लाभासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून महिलांच्या प्रश्नावर सरकार राजकारण करत असल्याचे विरोधकांच्या लक्षात आले. मुळात सरकारने बरीच लपवाछपवी करून काँग्रेससह सर्व विरोधक महिलांच्या विरोधात असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केल्याचे विरोधकांनी लक्षात आणून दिले. या पार्श्वभूमीवर पुद्दुचेरीसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले होते. भाजपासाठी या निवडणुका जितक्या प्रतिष्ठेच्या होत्या तितक्याच विरोधकांच्या अस्तित्वाच्या होत्या. लोकसभेच्या 20 जागा आणि विधानसभेच्या 140 असलेल्या दक्षिणेतील केरलम् राज्यात विरोधी इंडिया आघाडी संघटित नसली, तरी भाजपासमोर विधानसभेत खाते उघडण्याचे आव्हान होते. लोकसभेच्या 42 व विधानसभेच्या 294 जागा असलेल्या प. बंगालमध्येही विरोधी इंडिया आघाडी संघटित नसली, तरी या आघाडीतील तृणमूल काँग्रेसचा भाजपाशी थेट सामना झाला. कोणत्याही परिस्थितीत प. बंगाल सर करण्यासाठी पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी ‘राजकारणात सर्वकाही क्षम्य’ या नीतीचा अवलंब केला. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसची सत्ता टिकविण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सारी ताकद पणाला लावून मोदी-शहा यांना लक्ष्य करताना निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचे आरोप करून लक्ष वेधून घेतले होते. लोकसभेच्या 14 व विधानसभेच्या 126 जागा असलेल्या आसाममध्ये विरोधी इंडिया आघाडी म्हणावी तितकी संघटित नसली, तरी सत्ताधारी भाजपा व विरोधी काँग्रेस असा थेट सामना झाला. लोकसभेच्या 39 आणि विधानसभेच्या 234 जागा असलेल्या तामिळनाडूत इंडिया आघाडीत असलेल्या द्रविड मुनैत्र कळघमच्या (द्रमुक) नेतृत्वाखालील सत्ताधारी पुरोगामी लोकशाही आघाडीत काँग्रेस, डावे पक्ष व इतर लहान द्राविडी पक्षांचा समावेश होता. या आघाडीचा मुकाबला करण्यासाठी अखिल भारतीय अण्णा द्रमुकने भाजपाशी हातमिळवणी केली. या राज्यात थलपती विजय यांनी कमाल केली. लोकसभेची एक आणि विधानसभेच्या 30 जागा असलेल्या पुद्दुचेरीत एआर काँग्रेस व भाजपा यांच्या सत्तेसमोर काँग्रेस आणि द्रमुकचे आव्हान होते. पाच राज्यांपैकी प. बंगालमधील निवडणूक सर्वाधिक लक्षवेधी ठरली होती. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात सुमारे 91 लाख मतदारांची नावे वगळण्याच्या विरोधात तृणमूल काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव, मतदान तोंडावर आले असताना मतदारयाद्या अद्ययावत करण्याचा घोळ सुरूच होता. मतदानाच्या वेळी झालेले कथित गैरप्रकार आणि हिंसाचार, काही मतदान केंद्रांवर
फेरमतदान, मतदानानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे ज्या स्ट्राँगरूममध्ये ठेवली होती, तेथे ममता बॅनर्जी यांचा उमेदवार म्हणून प्रवेश, स्ट्राँगरूमच्या बाहेर बॅनर्जींसह तृणमूल नेते आणि उमेदवारांची धरणे आदी घडामोडी पाहता ममता बॅनर्जी यांनी ही निवडणूक तृणमूल काँग्रेस विरुद्ध निवडणूक आयोग अशा वळणावर आणली. भाजपा आणि निवडणूक आयोग यांची युती असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. प. बंगालमध्ये भाजपाला बहुमत मिळण्याचे निष्कर्ष काही एक्झिट पोलमधून दिसले होते. बॅनर्जी यांनी एक्झिट पोल फेटाळून आपल्या पक्षाला 256 जागा मिळतील, असा दावा केला होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा अभेद्य गड उद्ध्वस्त करण्याची किमया बॅनर्जी यांनी करून प. बंगालमध्ये आपल्या तृणमूल काँग्रेेसचे साम्राज्य उभारले होते. ते उद्ध्वस्त करण्यासाठी गेल्या दहा वर्षांंपासून भाजपाने कंबर कसली होती. यावेळी काहीही करून ममतांचा किल्ला पाडायचा यासाठी मोदी-शहा यांनी रणनीती आखली होती. निवडणुकीत धर्माचा वापर करणे, ही भाजपाच्या रणनीतीची नेहमीच खासियत राहिली आहे. यावेळी प. बंगालमधील घुसखोरीचा मुद्दा भाजपाने वारंवार उपस्थित केला. या राज्यात घुसखोरीला ममता बॅनर्जी प्रोत्साहन देत असल्याचा आरोप मोदी-शहा यांनी केला. प. बंगालमध्ये घुसखोरी कोठून होते, तर ती बांगलादेशातून. घुसखोरी करणारे बरेचसे मुस्लिम आहेत. तेच बॅनर्जी यांचे मतदार आहेत, हेच भाजपाने बंगाली हिंदूंच्या मनावर बिंबवले. आसाममध्येेही हाच मुद्दा भाजपाने अधोरेखित केला. आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सरमा यांनी खुलेआम मुस्लिमविरोधी भूमिका घेतली होती. प. बंगालमध्ये भाजपाचे हिंदुत्व कार्ड यावेळी चालले,तर ममता बॅनर्जी यांनी उभी केलेली बंगाली अस्मिता कोमेजली. दक्षिणेत भाजपाला हिंदुत्व कार्ड रुजवायला आणखी बराच काळ लागणार असल्याचे तामिळनाडू आणि केरलम् या राज्यांचे निकाल सांगताहेत. तामिळनाडूतील थलपती विजय यांनी स्थापन केलेल्या टीव्हीके पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून त्रिशंकू स्थिती निर्माण केली आहे. तामिळनाडूत विजय यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रॅली काढली होती. त्यात चेंगराचेंगरी झाली होती. त्यात सुमारे 60 जण मरण पावले होते. इतकी चेंगराचेंगरी होण्याइतकी गर्दी एका राजकीय यात्रेदरम्यान घडली. अलीकडच्या काळात राजकीय सभांना किंवा यात्रांना गर्दी जमवावी लागते. तामिळनाडूत एवढी प्रचंड गर्दी जमवण्याची क्षमता नव्यानेच राजकारणात प्रवेश करणार्‍या एका अभिनेत्याने सिद्ध केली. त्या अभिनेत्याचे नाव विजय. त्यांना तेथे थलापती विजय या नावानेही ओळखले जाते. त्यांचे मूळ नाव जोसेफ विजय चंद्रशेखर आहे. रजनीकांत यांच्या लोकप्रियतेचे विक्रम या अभिनेत्याने तेथे मोडीत काढले होते. त्याची दखल घेण्यात मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन कमी पडले आणि अण्णा द्रमुक पक्षानेही विजय यांची दखल घेतली नाही. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले थलपती विजय हेच आता किंगमेकर ठरले आहेत. त्यांनी द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन्ही पक्षांच्या वर्चस्वाला जोरदार धक्का दिला. विजय यांच्या पक्षाला तामिळनाडूच्या जनतेने भरभरून मते दिली. त्यांचा पक्ष पहिल्या क्रमांकावर आला. अनेकदा तामिळनाडूत द्रमुक व अण्णा द्रमुक यांची आलटूनपालटून सत्ता येत असल्याचा इतिहास आहे. दोन्ही पक्षांच्या वर्चस्वाला थलपती विजय यांनी जबरदस्त धक्का दिला आहे.

 

Alchemist!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *