तापमान तब्बल 42 अंश सेल्सिअसवर
मनमाड : प्रतिनिधी
नांदगाव तालुक्यात उन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे. नांदगाव शहरासह मनमाड आणि संपूर्ण तालुक्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. सध्या तब्बल 42 अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे संपूर्ण परिसर होरपळून निघाला आहे. दुपारच्या वेळी रस्त्यावर अघोषित संचारबंदी लागू केल्याचे चित्र पाहायला
मिळत आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, हवामान अंशतः ढगाळ होते. ढगाळ वातावरण आणि कडक ऊन या दोन्हीच्या एकत्र परिणामामुळे हवेतील उकाडा प्रचंड वाढला आहे. कमाल तापमान 41 ते 43 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिल्याने नागरिकांना असह्य उष्णतेचा सामना करावा
लागत आहे.
एअर क्वालिटी इंडेक्स तब्बल 349 वर पोहोचला असून, तो अतिशय वाईट या श्रेणीमध्ये नोंदवला गेला आहे. प्रदूषित हवा आणि वाढते तापमान यामुळे श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना मोठा त्रास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सतर्कतेचा इशारा
नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा दिला असून, वाढते तापमान अन् हवेची खराब गुणवत्ता पाहता नागरिकांना घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दुपारी 12 ते दुपारी 4 या वेळेत थेट उन्हात जाणे टाळावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून भरपूर पाणी, लिंबू पाणी किंवा ताक प्यावे. मास्कचा वापर करा. हवेची गुणवत्ता खराब असल्यामुळे बाहेर पडताना तोंड आणि नाक रुमालाने किंवा मास्कने झाकून घ्यावे. तालुक्यात सध्यातरी उष्णतेची हीच लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Heatwave wreaks havoc in Nandgaon, Manmad areas