गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे जाणारी पायवाट आणि रात्र होताच संपूर्ण परिसरावर अलगद पसरत जाणारा शांत अंधार या सगळ्या वातावरणात आमचं बालपण वाढत होतं. पण त्या बालपणातली रात्रीची सुंदर गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे – चांदण प्रकाशातली झोप..!
आजच्यासारखं बंद दरवाजांंचं, एसी आणि पंख्याच्या आवाजातलं आयुष्य तेव्हा नव्हतं. तेव्हा रात्र म्हणजे घराबाहेरचं- आकाशातलं जग जिवंत होण्याची वेळ असायची. जीव नकोसा करणारे उन्हाळ्याचे दिवस. दिवसभर उन्हाच्या झळा लागायच्या, वाराही प्रचंड गरम होऊन अंगावर यायचा. दिवसभर उन्हाने तापलेली जमीन संध्याकाळी हळू हळू थंड व्हायला लागायची तेव्हा सर्वजण बाहेर खळ्यावर येऊन बसायचे. रात्री मग तिथेच जेवणाची पंगत बसायची.. वारा एव्हाना थोडा थंडावा घेऊन वाहू लागायचा. जेवण उरकून घरातल्या बाया जेव्हा शिराईने अंगण झाडायला घ्यायच्या तेव्हा मागोमागच तिथे मोठे बाडदान अंथरले जायचे आणि हे दिसले की आम्ही मुलं पटापट घरातून गोधड्या घेऊन त्यावर आमची जागा पकडायला यायचो. अंगणाची नेमकीच भुई घेतलेली असली की मग तर सगळं कसं मस्त थंड थंड वाटायचं. कधी कधी तर उंबराच्या झाडाखाली अंथरूण टाकलं जायचं आणि त्या थंड मातीत तिथेच आमची रात्रीची खोली तयार व्हायची.
त्या गोधड्यांनाही एक वेगळाच वास असायचा.. दिवसभर उन्हात वाळलेल्या कापडाचा, थोडासा धुराचा, आजीच्या औषधांचा आणि एकूणच घराच्या मायेचा..!
रात्र जसजशी गडद व्हायची, तसतसं आकाश मात्र उजळत जायचं. शहरातून कधीच न दिसणारं ते आकाश असंख्य तारांनी भरलेलं असायचं. चंद्र जणू आमच्याच अंगणातच उतरून बसलाय, असं वाटायचं. त्या चांदण्याच्या प्रकाशात सगळं काही वेगळंच दिसायचं. उंबराच्या झाडांच्या सावल्या जमिनीवर हलक्या हलक्या डोलायच्या. उंच निलगिरीच्या सावल्या कधी मनात भीती दाटवायच्या. पाटाचं पाणी मंद आवाज करत वाहत राहायचं. दूर कुठेतरी कुत्र्याचा आवाज यायचा, तर वावरातून रातकिड्यांचं अखंड गाणं ऐकू येत रहायचं. त्या शांततेतला हा एक गूढ आवाज होता आणि आम्ही तो ऐकत झोपायचो
झोपायच्या आधी गप्पांचा कार्यक्रम चालायचाच. तात्या कधी आकाशातले तारे दाखवायचे.. ती चांदणी बघ, ती सप्तर्षी – सप्तर्षी तर फार उशिरा समजली आम्हाला.. आधी ती आमच्यासाठी बाज.. आणि तीन चोर म्हणूनच माहीत होती. आणि त्या जवळजवळ, एकमेकांपासून सारख्या अंतरावर उभ्या असलेल्या तीन चांदण्या म्हणजे आमच्यासाठी – त्रिकांड!! झोप येईपर्यंत आम्ही डोळे विस्फारून आकाशाकडे बघत राहायचो आणि कानांनी माणसांच्या गप्पा ऐकत असायचो.
कधी मोठी माणसं जुन्या गोष्टी सांगायची तर कुणी भुताचा किस्सा सांगायचं आणि मग आम्ही गोधडी डोक्यावर ओढून घ्यायचो. भीती वाटायची, पण तरीही त्या गोष्टी ऐकायची ओढ कमी व्हायची नाही.
आमच्यातल्या कुणाला झोप लागली की तो नकळत दुसर्याच्या अंगावर हात- पाय टाकून झोपायचा. कुणाची गोधडी सरकली की तात्या – काका – दादा अलगद उठून ती पुन्हा अंगावर घालायचे. त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इतकी माया दडलेली असायची की आज आठवलं तरी मन भरून येतं. पूर्ण चंद्राच्या; पौर्णिमेच्या रात्री तर वेगळीच जादू असायची. चांदण्याचा प्रकाश एवढा स्वच्छ असायचा की अंगणातल्या माणसांचे चेहरेसुद्धा स्पष्ट दिसायचे. झाडांच्या पानांतून गाळून येणारा तो पांढराशुभ्र प्रकाश जमिनीवर पडला की जणू कोणी रांगोळीच काढली आहे, असं वाटायचं. कधी मध्यरात्री अचानक जाग यायची. डोळे उघडले की वर आकाश दिसायचं अगदी शांत.. अन बाजूला सगळेजण गाढ झोपलेले. कुणाच्या घोरण्याचा आवाज, कुणाच्या श्वासाची हलकी लय आणि त्यामध्ये वाहणारा थंडगार वारा..
त्या क्षणी एक वेगळीच सुरक्षितता वाटायची. जणू संपूर्ण आकाशच आपल्यावर पांघरूण घालून उभं आहे असे वाटायचे.
कधीकधी रात्री उशिरा.. शक्यतो पहाटेच.. पावसाची हलकी चाहूल लागायची. वार्याचा आवाज बदलायचा. आंब्याची, उंबराची पानं जोरात हलायला लागायची.. निलगिरीचे झाड त्याची जागा सोडून गुलमोहरापर्यंत वाकू लागायचे.. मग अचानक कुणीतरी ओरडायचे, अरे उठा पाऊस आला! आणि मग सगळ्यांची एकच धावपळ उडायची. गोधड्या उचलायच्या, उशा गोळा करायच्या, लहान मुलांना उठवायचं पण त्या गडबडीतही एक मजा असायची. अंगणातल सैन्य घरात येऊन झोपायचं आणि बाहेर पावसाचं युद्ध सुरू व्हायचं. साधा पाऊस आहे की गारांचा ते बाहेर न बघता नुसत्या कौलांच्या आवाजावरून मोठ्यांना कळायचं.
अंगण कितीही ओले झाले तरीही दुसर्या दिवशी रात्री आम्ही पुन्हा त्याच खळ्यावर झोपायला तयार असायचो.
आज विचार केला की जाणवतं –
त्या झोपेत आजसारखा केवळ आराम नव्हता, तर त्यात निसर्गाशी एक नातं होतं. आकाश रोज डोक्यावर असायचं, वारा अंगावरून फिरायचा, चंद्र चेहर्यावर प्रकाश टाकायचा आणि आपण त्या सगळ्याचा एक भाग आहोत ही भावना नकळत मनात रुजत जायची.
आजच्या बंद खोल्यांमध्ये झोप मिळते. पण त्या चांदण्याखाली मिळणारी शांतता मिळत नाही. आज मोबाईलच्या स्क्रीनचा प्रकाश आहे, पण त्यात चंद्रप्रकाशाची ऊब नाही. फॅनची हवा, एसीचा गारवाही आज आहे, पण रात्रीच्या वार्याचा जिवंत स्पर्श मात्र अजिबात नाही.
आजही कधी गावाकडे गेलं आणि रात्री खळ्यावर उभं राहून वर आकाशाकडे पाहिलं की मन पुन्हा त्या दिवसांत जातं.. जिथे झोप येण्यासाठी कोणत्याही गोष्टीची गरज नव्हती. फक्त आकाशभर चांदणं,
बाजूला आपली माणसं आणि मनभर समाधान पुरेसं होतं. अन् त्या चांदण प्रकाशातील झोपेत फक्त शरीर विसावत नव्हतं तर मनही शांत होत होतं.. आणि कदाचित म्हणूनच त्या रात्री… आजही स्मरणात आल्या की मनावर अलगद चांदणं पसरल्यासारखं वाटतं.. एवढंच ….
Sleep in the moonlight