कोट्यवधींचा निधी वार्यावर; एमएसआयडीसीचा कारभार
घोटी : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी)मार्फत कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या टाकेद-वासळी रस्त्याच्या कामातील नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
तब्बल तीन महिन्यांपूर्वी रस्ता खोदून ठेवून लवकरच काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन वासळी ग्रामपंचायतीला देण्यात आले होते. मात्र, आजतागायत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. विशेष म्हणजे, गतवर्षी आंबेवाडी-इंदोरे रस्त्याचीही अशीच अवस्था करून जवळपास वर्षभर वाहतूक ठप्प ठेवण्यात आली होती. आता टाकेद-वासळी-सोनोशी मार्गालाही त्याच दुर्दशेला सामोरे जावे लागणार असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, या रस्त्याच्या कामाबाबत आमदार हिरामण खोसकर व आमदार माणिकराव कोकाटे यांनी संबंधित विभागाला विशेष सूचना देऊनही अधिकारी आणि ठेकेदारांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. टाकेद गटातील सर्व रस्ते विकासकामांची चौकशी करून जबाबदार अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी वासळीचे सरपंच काशीनाथ कोरडे यांनी केली आहे.
रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने संपूर्ण मार्गावर गुडघाभर पाणी साचले आहे. नागरिक, शेतकरी आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या निष्काळजी कारभाराविरोधात सरपंच काशीनाथ कोरडे यांनी संबंधित विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
अनेक गावांचा संपर्क धोक्यात
टाकेद-वासळी रस्ता हा वासळी, कचरवाडी, बारशिंगवे, राहुलनगर, भोईरवाडी आणि सोनोशी या गावांना मुख्य बाजारपेठेशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, सध्या रस्ता जागोजागी खोदून ठेवण्यात आला असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मातीचे मोठे ढिगारे टाकण्यात आले आहेत. पहिल्याच पावसात या मातीचा चिखल होऊन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नसून अपघाताचा धोका वाढला आहे.
शेतकर्यांचे नुकसान
रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेली जुनी बंदिस्त गटारे माती टाकून बुजविण्यात आली आहेत. रस्त्यावरील खोदलेली माती थेट शेतकर्यांच्या शेतात टाकण्यात आल्यामुळे पिकांचे नुकसान होत असून, पावसाचे पाणी शेतात साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पहिल्याच पावसात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे. दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक व पादचार्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय
या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात ये-जा करतात. रस्त्यावर चिखल, पाणी आणि खड्डे निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी शालेय बस तसेच खासगी वाहने अडकत असल्याने विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत पोहोचणे कठीण झाले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Taked-Vasali road dug up for three months.