एसटी कर्मचार्यांच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला
नाशिक : प्रतिनिधी
महामार्ग बसस्थानकावर शनिवारी (दि. 25 जुलै) प्रवाशाला सोडण्यासाठी आलेल्या एका दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली. मात्र, एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांनी तत्परता दाखवत स्थानकावरील अग्निशमन सिलिंडरचा वापर करून काही मिनिटांत आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून, कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 12 एसपी 2900 क्रमांकाची दुचाकी घेऊन आर्यन पाटील व पी. एस. पाटील (मो. 9096456531, 885500870) हे प्रवाशाला सोडण्यासाठी महामार्ग बसस्थानकावर आले होते. प्रवाशाला बसमध्ये बसवित असताना दुचाकीतून धूर निघत असल्याचे त्यांच्या
निदर्शनास आले.
त्यांनी तातडीने वाहतूक नियंत्रण कक्षात धाव घेत अग्निशमन सिलिंडरची मागणी केली. यावेळी कर्तव्यावरील वाहतूक नियंत्रक के. एल. लाड, डी. टी. शिंदे आणि आर. एम. मथुरे तसेच सुरक्षारक्षक एम. के. भामरे, एस. डी. बागूल आणि पी. एन. वागळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानकावर उपलब्ध असलेल्या अग्निशमन सिलिंडरच्या सहाय्याने दुचाकीला लागलेली आग विझवली.
कर्मचार्यांच्या समयसूचकता, धाडस आणि तातडीच्या कृतीमुळे आग इतर वाहनांपर्यंत किंवा स्थानक परिसरात पसरली नाही. तसेच एसटी महामंडळाचे कोणतेही नुकसान झाले नसून, कोणतीही जीवितहानीही झाली नाही. कर्मचार्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
Two-wheeler suddenly catches fire at highway bus station.