महानगरांप्रमाणेच अत्याधुनिक सुविधा आता नाशिकमध्येच

ना. गिरीश महाजन : साईबाबा हॉस्पिटलमध्ये सुविधांचा लोकार्पण सोहळा

नाशिक : प्रतिनिधी
महानगरांमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक हृदयरोग निदान व उपचार सुविधा आता नाशिकमध्येच उपलब्ध होत असल्याने उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना मोठा फायदा होणार आहे, असे प्रतिपादन कुंभमेळामंत्री तथा जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील अत्याधुनिक हृदयरोग निदान व उपचार सुविधांचे लोकार्पण महाजन यांच्या हस्ते रविवारी (दि. 9) करण्यात आले. यावेळी त्यांनी रुग्णालयाचे संचालक डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांचा गौरव करत त्यांना ‘आधुनिक युगातील ऋषी’ आणि ‘डॉक्टर योगी’ अशी
उपाधी दिली.
यावेळी नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके, आमदार देवयानी फरांदे, सुधाकर बडगुजर, नगरसेवक दिनकर पाटील, लक्ष्मण सावजी, दीपक चंदे, नगरसेवक श्याम बडोदे, नगरसेवक शाहू खैरे, मविप्रचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, अजिंक्य वाघ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, वैद्यकीय तज्ज्ञ, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, संस्थांचे पदाधिकारी, नागरिक व रुग्ण
उपस्थित होते.
रुग्णसेवेसाठी रुग्णालयात दुसरी अत्याधुनिक हृदयविकार निदान प्रयोगशाळा, 128 छेदांची प्रगत हृदय संगणकीय छायाचित्रण तपासणी सुविधा तसेच हृदयाच्या रक्तवाहिन्यांची संगणकीय तपासणीची सुविधा सुरू करण्यात आली. याशिवाय, रक्तवाहिन्यांच्या आतील स्थितीचे अचूक परीक्षण करणारे अंतर्गत रक्तवाहिनी ध्वनिचित्रण आणि रक्तप्रवाहातील अडथळ्यांचे मूल्यांकन करणारी एफएफआर मार्गदर्शित रक्तवाहिनी प्रसारण उपचार सुविधा उपलब्ध झाली आहे.
या अत्याधुनिक सुविधांमुळे हृदयरोगाचे अधिक अचूक व जलद निदान तसेच सुरक्षित उपचार शक्य होणार आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना हृदयरोग उपचारांसाठी महानगरांकडे जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी
होणार आहे.
गिरीश महाजन यांनी श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटने नाशिकमध्ये जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे नागरिकांना दर्जेदार, जलद आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा मिळण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी रुग्णालयाच्या प्रगतीचा आढावा घेताना महानगरांच्या तोडीस तोड अत्याधुनिक हृदयरोग उपचार नाशिकमध्येच उपलब्ध करून देणे हे संस्थेचे ध्येय असल्याचे सांगितले. भविष्यातही अधिक प्रगत सुविधा सुरू करण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले.
रुग्णालयात आता दोन अत्याधुनिक हृदयविकार निदान प्रयोगशाळा, प्रगत हृदय संगणकीय छायाचित्रण, हृदयाचे चुंबकीय अनुनाद छायाचित्रण,
अंतर्गत रक्तवाहिनी ध्वनिचित्रण व एफएफआर सुविधा, अनुभवी हृदयरोगतज्ज्ञांची टीम तसेच 200 खाटांचे सुसज्ज बहुविशेषज्ञ रुग्णालय अशा सुविधा एकाच छताखाली उपलब्ध
झाल्या आहेत.
कार्यक्रमास डॉ. पल्लवी धर्माधिकारी, डॉ. ऐश्वर्या धर्माधिकारी, विश्वजित धर्माधिकारी, डॉ. अध्वर्यु कुथेे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. पल्लवी धर्माधिकारी यांनी केले, तर डॉ. अजिंक्य देसले यांनी
आभार मानले.

State-of-the-art facilities, just like in major cities, are now available right here in Nashik.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *