भामट्यांनी वृद्धाकडील सहा लाख 56 हजारांचे दागिने लुटले

सिडकोतील उपेंद्रनगरमधील घटना; गुन्हा दाखल

सिडको : प्रतिनिधी
बँकेतून सोडवून आणलेले सहा लाख 56 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन घरी जात असलेल्या त्रेषष्टवर्षीय व्यक्तीच्या हातातील पिशवी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावून नेल्याची घटना सिडकोतील उपेंद्रनगर परिसरात घडली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानदेव कडू कापसे (वय 63, रा. साईग्राम हौसिंग सोसायटी, उपेंद्रनगर, सिडको) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 9 सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास कापसे साईग्राम हौसिंग सोसायटी परिसरातून जात होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांना धक्का देऊन त्यांच्या हातातील कापडी पिशवी बळजबरीने हिसकावून घेतली आणि तेथून पळ काढला. या पिशवीत कापसे यांच्या कुटुंबीयांचे सोन्याचे दागिने होते. त्यात सोन्याच्या अंगठ्या, 30 ग्रॅम वजनाची सोन्याची गहू पोत, 20 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या तसेच सोन्याचे टॉप्स यांचा समावेश होता. चोरीला गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत सहा लाख 56 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Fraudsters robbed an elderly person of jewelry worth ₹6.56 lakh.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *