पुण्याचा सराईत चोर उपनगर पोलिसांच्या जाळ्यात
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
बायकोचा वाढदिवस आहे; चांगले कपडे दाखवा, असे सांगून महिला दुकानदाराचे लक्ष विचलित केले आणि काउंटरवरील रोख रकमेचा डबा चोरून पळ काढला. उपनगर क्षेत्रातील आनंदनगर येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेचा उपनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला. पुण्याच्या सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकून त्याच्याकडून चोरीची सर्व रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
आनंदनगर भागातील तनिष्क ग्लॅम गॅलरीच्या महिला चालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, 8 सप्टेंबर रोजी दुपारी 2.45 वाजेच्या सुमारास 25 ते 30 वयोगटातील तरुण दुकानात आला. पत्नीच्या वाढदिवसासाठी कपडे खरेदी करायचे असल्याचे सांगत त्याने कपडे पाहण्यास सुरुवात केली. महिला दुकानदार कपडे दाखवण्यात व्यस्त असताना, भामट्याने अत्यंत हातचालाखीने काउंटरवर ठेवलेला सात हजार रुपयांचा रोख रकमेचा डबा उचलला आणि तेथून पळ काढला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून प्रभारी अधिकारी संजय पिसे यांनी गुन्हेशोध पथकाला तपासाचे आदेश दिले. पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे व अंमलदार विनोद लखन यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने संशयिताचा माग काढत शुभम अशोक माने (वय 26, रा. धनकवडी, ता. हवेली, जि. पुणे) यास ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेली सात हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
अटक करण्यात आलेला शुभम माने सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याच्यावर पुण्यातील सिंहगड रोड आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तोतयागिरी, फसवणूक आणि घरफोडीचे तीन गंभीर गुन्हे आधीच दाखल आहेत.
ही धडक कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपआयुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलिस आयुक्त अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे, पोलिस निरीक्षक शांताराम डंबाळे, सुनील बडे, पोउनि प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार विनोद लखन, संदीप पवार, गौरव गवळी, प्रशांत देवरे, सुनील गायकवाड, अनिल शिंदे व सहकार्यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार विनोद लखन करत आहेत.
Cash box stolen by staging a ruse about wife’s birthday