मखमलाबाद येथे डॉक्टरला मारहाण, दोन आरोपींना अटक
पंचवटी : प्रतिनिधी
मखमलाबाद बसस्टँड परिसरात भाजीपाला घेण्यासाठी थांबलेल्या डॉक्टरला मारहाण करून त्यांचे दात पाडले. ही धक्कादायक घटना दि. 9 ला रात्री नऊच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. जगदीश दत्तात्रय घोडेकर (वय 69) हे आपले क्लिनिक बंद करून ओळखीचा रिक्षाचालक दीपक लोंढे यांच्यासोबत घरी जात असताना मखमलाबाद बसस्टँडजवळ भाजीपाला घेण्यासाठी थांबले होते. त्यावेळी आरोपी त्यांच्या जवळ आले आणि भाजीपाला का खाता, चिकन-मटण खा, असे म्हणून कुरापत काढू लागले. वाद वाढल्यावर आरोपींनी फिर्यादीस हाताने बेदम मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी मधेे पडलेल्या रिक्षाचालक दीपक लोंढे यांनाही आरोपींनी मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीचे पुढील दोन दात पडून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.
फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत राहुल देवराम गारे (रा. मातोरी) तसेच अजय तानाजी मोरे (रा.गणाधीश हॉलच्या मागे) या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पुढील तपास म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोहर क्षीरसागर करत आहेत. मखमलाबाद परिसरातील डॉ. जगदीश दत्तात्रय घोडेकर यांना मारहाण झाल्याची घटना घडल्यानंतर म्हसरूळ पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. अटक केल्यानंतर शुक्रवारी (दि. 11) दोन्ही आरोपींना मखमलाबाद बस स्टँड येथे आणून गुन्हेगारांवर जरब बसण्यासाठी पोलिसांनी आरोपींची धिंड काढली. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे मखमलाबाद ग्रामस्थांनी स्वागत करून कौतुक केले आहे. यामुळे नागरिकांच्या मनात पोलिसांविषयी विश्वासाचे आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे, अमोल म्हस्के, मनोहर क्षीरसागर, पोलीस हवालदार राकेश शिंदे, सतीश वसावे, जितू शिंदे, संदीप पोटिंदे, निशिकांत नांद्रे, प्रमोद गायकवाड, मनोज आहेर, गुणवंत गायकवाड, भाऊराव गवळी व देवराम चव्हाण यांनी केली.
Parade through the village: Slogans raised hailing ‘Nashik District – A Stronghold of the Law’.