आज होणार बाप्पा विराजमान

नाशिक : प्रतिनिधी
गणरायाचे आगमन होणार असल्याने शहरात नवचैतन्य पसरले आहे. आज सोमवारी (दि. 14) गणेश चतुर्थी ते शुक्रवार (दि. 25) अनंत चतुर्दशीपर्यंत यंदाचा गणेशोत्सव असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत व्यग्र असणार्‍या गणेशभक्तांनी बाप्पाच्या स्वागतात कोणतीही कमी राहू नये म्हणून चोख तयारी केली आहे. आरास, मखर, डेकोरेशन, देखावे, प्रसाद आणि बाप्पाची आकर्षक सुबक गणेशमूर्ती खरेदी करत आज बाप्पाचे मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना केली जाणार आहे. घरगुती बाप्पाच्या आगमनासोबत मंडळाच्या बाप्पाच्या प्रतिष्ठापनेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. गेल्या काही दिवसांपासून गणेशभक्तांकडून बाप्पाचे बुकिंग करण्यात आले होते. आज बाप्पाला ढोल-ताशाच्या गजरात घरी नेले जाणार आहे. गणेशोत्सवासाठी लागणारी बाप्पाची मूर्ती, पूजासाहित्य, डेकोरेशन, फुले यांची दुकाने शहरातील विविध भागांतील चौकाचौकात थाटल्याने शहरातील वातावरण बाप्पामय झाले आहे.

वरुणराजाच्या हजेरीने व्यावसायिकांचे हाल
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शहरात पावसाने हजेरी लावल्याने गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले; मात्र भाविकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नसल्याचे चित्र होते. तर पावसामुळे व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. विक्रीसाठी ठेवलेले सामान पावसात भिजले. त्याचप्रमाणे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना साहित्य दाखविताना व्यावसायिक पावसामुळे मेटाकुटीला आल्याचे चित्र होते.

बाजारपेठेत वाहतूक कोंडी
बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. मात्र, बाजारपेठेत अनेकांनी दुचाकी वाहने नेल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते.

प्रतिष्ठापना मुहूर्त
14 सप्टेंबर, सोमवार : शुभ मुहूर्त : सकाळी 11 वाजून 21 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 48 मिनिटांपर्यंत. यावर्षी जवळपास अडीच तासांचा शुभ मुहूर्त गणपती बसवण्यासाठी असेल.

देखाव्यांचे आकर्षण
शहरातील विविध गणेश मंडळांच्या वतीने यंदाच्या वर्षी वेगवगेळ्या संकल्पनेवर आधारित देखावे तयार केले आहेत. सामाजिक संदेश देणारे देखावे यांसह पौराणिक आणि गेल्या वर्षभरात घडलेल्या सामाजिक, राजकीय घडामोडींवर भाष्य करणारे देखावेही साकारण्यात
आले आहेत.

नाशिक ढोलचा आवाज घुमणार
बाप्पाच्या स्वागत मिरवणुकांत नाशिक ढोलचा आवाज घुमणार आहे. शहरातील मानाच्या गणपतीचे काही दिवस आधी मंडळात आगमन झाले असले तरी आज प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने नाशिक ढोल आणि गुलालाची उधळण करत बाप्पाचे स्वागत केले जाणार आहे.

मोदक आणि प्रसादाच्या ऑर्डर
गणेशोत्सवात बाप्पासाठी प्रसादाला विशेष महत्त्व असल्याने भाविकांकडून मोदक, लाडू, मिठाई यांची प्रसादासाठी स्वीट मार्टवर ऑर्डर देण्यात आली आहे.

bappa-will-be-installed-today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *