11 लाख 18 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त
सिडको : प्रतिनिधी
अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल करून आरोपींकडून सुमारे 11 लाख 18 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. घरफोडीच्या गुन्ह्यात 15.720 ग्रॅम सोन्याचे दागिने, तर दुसर्या प्रकरणात 65 ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले.
अंबड येथील वनश्री कॉलनी, फडोळ मळा परिसरातील रहिवासी जितेंद्र भालेराव यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला. त्याच्याकडून 15.720 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे 2 लाख 8 हजार रुपये किमतीचे जप्त करण्यात आले. दुसर्या प्रकरणात गंगासागर रो-हाउस परिसरातील एका तरुणीने तिच्या परिचित मित्राविरुद्ध तक्रार दाखल केली होती. संबंधित तरुणाने पंधरा दिवसांत सोन्याचे दागिने परत करण्याचे आश्वासन देऊन ते घेतले होते. मात्र, ठरलेला कालावधी उलटूनही दागिने परत न केल्याने 28 सप्टेंबर रोजी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातही गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून 65 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. या दागिन्यांची बाजारभावानुसार किंमत सुमारे 9 लाख 10 हजार रुपये आहे.अशा प्रकारे अंबड पोलिसांनी दोन गुन्ह्यांची उकल करून एकूण 11 लाख 18 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर करीत आहेत.
Ambad police solve two crimes