विल्होळीत बिबट्याचा वावर; कुत्र्याला केले ठार

सीसीटीव्हीत हल्ल्याचे चित्रीकरण; शेतकरी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सिडको : प्रतिनिधी
विल्होळी परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा स्पष्ट झाला असून, गुरुवारी पहाटे शेतातील बंगल्याच्या परिसरात झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. बिबट्याच्या या हालचाली आणि कुत्र्यावर केलेला हल्ला बंगल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. बिबट्याचा थेट शेतातील घराच्या परिसरात वावर आढळून आल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
विल्होळी येथील शेतकरी दामू थोरात यांचा शेतात बंगला आहे. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास बिबट्या त्यांच्या बंगल्याच्या परिसरात आला. दाराजवळ झोपलेल्या कुत्र्यावर त्याने अचानक झडप घातली. या हल्ल्यात कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर बिबट्या शेताच्या दिशेने निघून गेल्याचे सीसीटीव्ही चित्रणातून दिसून आले. बंगल्याच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात बिबट्याचा वावर आणि कुत्र्यावर केलेला हल्ला स्पष्टपणे नोंदला गेला आहे. त्यामुळे विल्होळी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
विल्होळी परिसरात मोठ्या प्रमाणावर शेती असून, अनेक शेतकरी शेतातील घरांमध्ये वास्तव्यास आहेत. शेतीची कामे करण्यासाठी शेतकरी तसेच शेतमजुरांना पहाटे आणि रात्रीच्या वेळी घराबाहेर पडावे लागते. अशा वेळी बिबट्याने थेट शेतातील बंगल्याच्या परिसरात प्रवेश केल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेची वन विभागाने तातडीने दखल घेऊन परिसराची पाहणी करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप बसवावा, तसेच आवश्यक असल्यास पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leopard spotted in Vilholi; kills a dog.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *