सिंहस्थानंतरही 15 ते 20 वर्षे विकासकामांचा लाभ : शेखर सिंह

मार्चअखेर सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले होणार

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून, शहराच्या सर्वांगीण विकासाची मोठी संधी आहे. कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या विकासकामांपैकी सुमारे 85 टक्के कामे कायमस्वरूपी स्वरूपाची असून, त्यांचा लाभ नाशिककरांना पुढील 15 ते 20 वर्षे घेता येणार आहे. मार्चअखेर शहरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्याचे नियोजन असून, द्वारका सर्कलचा प्रकल्प जानेवारीअखेर पूर्ण केला जाणार असल्याची माहिती सिंहस्थ कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
शंकराचार्य न्यासाच्या कुर्तकोटी सभागृहात द स्टॉलवर्ट्स टॉक्सतर्फे नाशिकचे रस्ते, कुंभमेळा आणि नाशिककर या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सादरीकरणाद्वारे सिंहस्थाच्या नियोजनाची माहिती दिली. तीन अमृतस्नानांसह 65 अतिरिक्त पर्वणी उत्सवांचे आयोजन करण्यात येणार असून, नाशिकमध्ये आठ कोटी, तर त्र्यंबकेश्वरमध्ये चार कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. एवढ्या मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने गर्दी व्यवस्थापन, वाहतूक, पार्किंग, निवास आणि आरोग्य सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे.
द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सुरू असलेले काम जानेवारीअखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये घाटांचे सुशोभीकरण, दर्शन कॉरिडॉर, साधुग्रामचा विस्तार, मंदिरांचे संवर्धन आणि गोदावरी नदी परिसराचा विकास केला जात आहे. या सुविधांमुळे सिंहस्थानंतरही धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल. हॉटेल, व्यापार, वाहतूक आणि सेवा क्षेत्रात मोठी आर्थिक उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. या विकासकामांसाठी नाशिककरांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही सिंह यांनी केले.
यावेळी मिलिंद जहागीरदार, दत्तात्रय देशमुख, सूरज सोनार, अमोल कुलकर्णी, अभिषेक यायचीत, वंदना जहागीरदार, लक्ष्मी सोनार, अमय कुलकर्णी, आशिष जोशी, मुग्धा कुलकर्णी, वैशाली सायंदे आदी उपस्थित होते.

साधुग्रामचा विस्तार दीड हजार एकरांवर
नाशिकमधील साधुग्रामचा विस्तार 323 एकरांवरून सुमारे 1,500 ते 1,600 एकरांपर्यंत करण्याचे नियोजन आहे. तपोवन, नांदूर, दसक आणि आगर टाकळी परिसराचा यात समावेश असेल. त्र्यंबकेश्वरमध्येही 20 एकरांवरून सुमारे 700 एकरांपर्यंत परिसर विकसित केला
जाणार आहे.

द्वारका सर्कल होणार सिग्नलमुक्त
द्वारका सर्कल प्रकल्पाचे सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. जानेवारीअखेर प्रकल्प खुला करण्याचे नियोजन आहे.

मार्चअखेर सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले
शहरातील सुरू असलेली रस्त्यांची कामे मार्चअखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. रस्त्यांखालील ड्रेनेज, पाणीपुरवठा, गॅस पाइपलाइन, विद्युत वाहिन्या, ऑप्टिकल फायबर आणि सीसीटीव्ही यंत्रणा टाकली जात आहे. त्यामुळे भविष्यात वारंवार रस्ते खोदण्याची वेळ येणार नाही.

65.60 किलोमीटरचा रिंगरोड
नाशिकच्या वाहतुकीला पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी 65.60 किलोमीटर लांबीचा रिंगरोड विकसित केला जात आहे.

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी प्रयत्न
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी पुढील तीन ते चार वर्षांत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेशासाठी प्रयत्न केले
जाणार आहेत.

त्र्यंबकेश्वरमध्ये सहा प्रतीक्षागृहे
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन गोदावरीच्या पलीकडे नाथ आखाडा परिसराच्या दिशेने दर्शन कॉरिडॉर विकसित केला जात आहे. यामध्ये प्रत्येकी एक हजार ते बाराशे भाविकांची क्षमता असलेली सहा प्रतीक्षागृहे उभारली जाणार आहेत.

 

Benefits of development projects to continue for 15 to 20 years even after Simhastha: Shekhar Singh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *