भाजपाचा सर्वांत जुना मित्रपक्ष कोणता असेल, तर तो पंजाबमधील शिरोमणी अकाली दल. या पक्षाशी असलेली युती सहा वर्षांपूर्वी वादग्रस्त तीन कृषी कायद्यांवरून संपुष्टात आली. पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी युतीची घोषणा केली आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स (एनडीए) अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीत अकाली दलाचे पुनरागमन झाले आहे. राजकीय परिस्थिती पाहता अकाली दल व भाजपा या दोन्ही पक्षांना कोणीही मित्र नव्हता. काँग्रेस, आम आदमी पार्टी (आप) आणि अन्य पक्षांपासून दोन्ही पक्ष समान अंतर राखून आहेत. दोन्ही पक्ष मित्राच्या शोधात होते. आपण जुने मित्र आहोत, याची जाणीव बदलत्या काळात दोघांनाही झाली. नव्या परिस्थितीत पुन्हा एकदा मैत्री करण्याशिवाय दोघांना पर्याय राहिला नव्हता. पंजाबमध्ये प्राबल्य असलेला शीख समुदाय हाच पाया असलेल्या अकाली दलाला मोठ्या भावाचा दर्जा देणे भाजपाला भाग पडले. महाराष्ट्रात 1985 पासून मोठ्या भावाचा दर्जा ज्या शिवसेनेला भाजपाने दिला, त्या शिवसेनेचे पुढे काय झाले, हे आता दिसत आहे. पंजाबमध्ये अकाली दलाची अवस्था शिवसेनेसारखी होईल, असे म्हणता येत नाही, कारण तेथील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. तथापि, गेल्या काही वर्षांपासून अकाली दलाची ताकदच कमी होत आहे. सन 2022 च्या विधानसभा निवडणुकीत अकाली दलाला 117 पैकी केवळ तीन जागा मिळाल्या, तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 13 पैकी केवळ एक जागा मिळाली. काँग्रेस आणि ‘आप’चे मोठे आव्हान लक्षात घेता भाजपासोबत हातमिळवणी करणे, हाच पर्याय अकाली दलासमोर होता; दुसरीकडे पंजाबमध्ये मजबूत पाय रोवायचे असतील तर अकाली दलाशिवाय दुसरा चांगला मित्र असूच शकत नाही, याचा विचार
भाजपाने केला. दोन्ही पक्षांनी मंगळवारी (24 नोव्हेंबर 2026) गुरू नानक जयंतीदिनी युतीची घोषणा केली. या युतीत अकाली दल मोठा भाऊ असेल आणि मुख्यमंत्रिपदही त्यांच्याकडेच राहील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले. पंजाब विधानसभेच्या सर्व 117 जागा दोन्ही पक्ष एकत्रित लढवतील, असेही ते म्हणाले. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत अकाली दलाने 2020 मध्ये ‘एनडीए’तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे 24 वर्षांची युती संपुष्टात आली होती. सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी हरसिमरत कौर यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांची युती पुन्हा आकारास
आली आहे. शहा यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्या उपस्थितीत युतीची घोषणा केली. पंजाबला विकसित राज्य बनवण्यासाठी दोन्ही पक्ष मिळून काम करतील, असे नबीन म्हणाले. भाजपा आणि अकाली दल पंजाबमधील अमली पदार्थांच्या समस्येसह सर्व प्रश्न सोडवेल, असा विश्वास बादल यांनी व्यक्त केला. तसेच, युतीला 100 हून अधिक जागा मिळतील, असा दावाही केला. राज्यात 1997, 2007 आणि 2012 मध्ये अकाली-भाजपा युतीने सरकार स्थापन केले होते. 2022 मध्ये दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या होत्या; परंतु त्यांची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली. सन 2019 मध्ये भाजपाला 9.63 टक्के मते मिळाली होती, तर 2024 मध्ये 18.56 टक्के मिळाली होती. 2022 पूर्वी विधानसभा निवडणुकीत भाजपा 23 तर शिरोमणी अकाली दल 94 जागा लढवत असे. लोकसभा निवडणुकीत शिरोमणी अकाली दल 10 आणि भाजपा उर्वरित तीन जागांवर निवडणूक लढवत असे. आता दोन्ही पक्षांना युतीची गरज भासली. अकाली दलाला पुन्हा सत्ता मिळवायची आहे, तर भाजपाला आपली ताकद पंजाबात वाढवायची आहे. दोन्ही पक्ष एकमेकांचे अत्यंत जुने मित्र आहेत. भाजपाचे पूर्वाश्रमीचे नाव भारतीय जनसंघ, असे आहे. जनसंघाशी अकाली दलाची पहिली युती 1967 मध्ये झाली होती. सन 1980 मध्ये भाजपाची स्थापना झाल्यानंतर, दोन्ही पक्षांची पहिली औपचारिक युती 1996 मध्ये झाली. मार्च 1970 मध्ये पंजाबी विरुद्ध हिंदी भाषावाद सुरू झाला. जनसंघाची हिंदीला पसंती होती, तर अकाली दलाची पंजाबी भाषेला. दोन पक्षांत तीव्र मतभेद झाल्याने जनसंघाने पाठिंबा काढून घेतल्याने युती पहिल्यांदा तुटली. 1977 मध्ये जनता परिवारात (जनता पक्ष) जनसंघ सहभागी झाला. जनता पक्षात फूट आणि केंद्रातील सरकार पडल्याने 1980 मध्ये जनसंघवाल्यांनी भाजपाची स्थापना केली. जून 1980 च्या निवडणुकीत नव्याने स्थापन झालेल्या भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढवली, तेव्हा दुसर्यांदा युती तुटली. सन 1996 मध्ये पुन्हा जुळलेली आणि 24 वर्षे टिकलेली युती कृषी कायद्यांवरून तुटली. आता दोन्ही पक्षांनी पुन्हा युती केली आहे. या युतीसमोर निवडणुकीत मोठी आव्हाने आहेत. जुन्या 94 (अकाली) – 23 (भाजपा) जागावाटपाच्या सूत्राऐवजी भाजपा विधानसभेसाठी अधिक जागांची मागणी करत असल्याने जागावाटपाचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. शेतमालाला किमान आधारभूत किंमत कायद्यासाठी शेतकरी संघटनांचा ग्रामीण भागात भाजपाला तीव्र विरोध आहे. हा विरोध सौम्य
करण्याचे आव्हान ग्रामीण भागात प्रभाव असलेल्या अकाली दलासमोर आहे. अमृतपाल सिंग यांच्या वारिस पंजाब दे आणि बंडखोर अकाली गटांमुळे पारंपरिक शीख मतांचे होणारे विभाजन रोखण्याचे आव्हानही अकाली दलासमोर आहे. 2015 मध्ये अकाली-भाजप सरकारच्या काळात श्री गुरू ग्रंथ साहिबचा झालेला अवमान (बेअदबी) व या प्रकरणातील दोषींना अद्याप शिक्षा न झाल्यामुळे शीखांमध्ये नाराजी आहे. सन 1980 व 1990 च्या दशकातील दहशतवादप्रकरणी शिक्षा पूर्ण होऊनही तुरुंगात असलेल्या शीख कैद्यांच्या (बंदी सिंह) सुटकेचा प्रश्न रखडलेला आहे. बेअदबी व शीख कैदी हे भावनिक मुद्दे आहेत. शीख कैद्यांची सुटका करणे केंद्राच्या अखत्यारीत आहे. सत्ताधारी ‘आप’च्या कल्याणकारी योजना आणि लोकसभेत मजबूत झालेल्या काँग्रेसच्या आव्हानाला तोंड देणे ही या नव्या युतीसाठी मोठी कसोटी आहे. एकूण धार्मिक व राजकीय परिस्थिती नव्या युतीसाठी आव्हानात्मक आहे.
Old relationship new round