नाशिक

शहरावर पसरली धुक्याची चादर

नाशिक : प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून नाशिककरांच्या दिवसाची सुरुवात दाट धुक्याच्या दुलईत होत आहे. पहाटेच्या वेळी शहरावर पांढरट धुक्याची चादर पसरलेली दिसत असून, दृश्य निसर्गचित्राप्रमाणे मोहक भासत आहे. मात्र, या धुक्यामुळे सकाळच्या वेळी वाहनचालकांना कमी दृश्यमानतेचा त्रास होत असल्याचेही चित्र दिसते. पहाटेच्या वेळी थंडी जाणवत असली तरी दुपारनंतर मात्र उन्हाचा चटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.
नाशिक शहरात गेल्या काही महिन्यांपासून मुसळधार पाऊस झाला. पावसाळा संपल्यानंतरही अवकाळी पावसाच्या सरी जिल्ह्यात कोसळल्या, त्यामुळे यंदा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडीचा प्रभाव जाणवला नाही. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतल्यानंतर हवामान कोरडे होऊन थंडी जाणवायला
लागली आहे.
किमान तापमानात घट झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. गुरुवारी नाशिक शहरात किमान तापमान 18.2 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले, तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस इतके होते. दिवस आणि रात्रीच्या तापमानात जवळपास 13 अंशांचा फरक असल्याने सकाळी व रात्रीच्या वेळी थंडी अधिक जाणवत आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रासह नाशिक परिसरात येत्या काही दिवसांत हवामान कोरडे राहील. मात्र, सकाळच्या वेळात गारवा आणि धुक्याचा प्रभाव वाढेल. उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍यांमुळे तापमान आणखी घसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
नाशिककर मात्र या थंडीचा आणि धुक्याचा आनंद घेताना दिसत आहेत. सकाळी धुक्यात फिरण्यासाठी आणि व्यायामासाठी बाहेर पडणार्‍यांची संख्या वाढली आहे. शहरातील गंगाघाट, कॉलेज रोड, पंचवटी, सातपूर, गंगापूर रोड परिसर या ठिकाणी धुक्याचे अप्रतिम दृश्य दिसत आहे. नाशिककरांसह नाशिकला पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसाठीही हा अनुभव अनोखा ठरत आहे.
दिवसाच्या वेळात ऊन पडत असल्याने वातावरण सुखद भासत असले तरी, सकाळ-संध्याकाळ थंडीमुळे लोक उबदार कपड्यांचा वापर करू लागले आहेत. नाशिकच्या हवामानात पडलेला हा हिवाळी गारवा आता शहरात खरी थंडी दाखल झाल्याचे संकेत देत आहे.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

13 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

13 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

13 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

13 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

13 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

13 hours ago