– अंजली रहाणे-थेटे
खुंटलेला श्वास रोखून ठेवतो दोरीत
पाहून दोरीला बंद करतो अडगळीत..
बंदिस्त तो लख्ख प्रकाश
अडगळीच्या खोलीत..
ह्याच दुरास्थेत
शेतकरी झाला व्यथित..
शेतकर्याचा श्वास परिस्थितीच्या दोरीत अडकून पडला आहे; अडगळीत बंदिस्त झालेल्या प्रकाशासारखं त्याचं जगणंही अंधारात हरवलं आहे. स्वतःला खुराड्यात बंदिस्त करून निजला आहे. त्याचं खुराड्यातला जीव खडबडून उठतो आणि भयानक वास्तव स्वप्नांत दिसतेच तोपर्यंत पहाटेला नुकताच डोळा लागलेला चिंताग्रस्त शेतकरी खाडकन उठतो. मनात कितीही चिंता असल्या तरी डोळे पुसून त्याचं सूर्याला पाहून नमस्कार करतो आणि दिनक्रम सुरु करतो. पहाटेचा कोंबडा आरवतो गाव जागं होतं पण शेतकर्याच्या घरातली पहाट काही उजाडत नाही. अंगणातल्या चुलीवर धूर निघतो, गुरांच्या गोठ्यातून हंबरडा ऐकू येतो, लेकरं अजून अंथरुणात असतात आणि घरचा धनी मात्र हातातल्या रिकाम्या कळशीकडे, आभाळाकडे आणि मग शेताकडे एकटक पाहत उभा असतो. काळ्या मातीत त्याने घामाचे कितीतरी थेंब मिसळलेले असतात; पण आता त्याच मातीत भेगा पडलेल्या असतात. त्या भेगा केवळ जमिनीवर नसतात त्या त्याच्या काळजावरही उमटलेल्या असतात
हुंदका दाटलेला एक श्वास…
गुदमरतो आहे अख्खी रात्र..
चुकला काळजाचा एक ठोका..
धुगधुगीत जगतो आहे जीवनसत्र..
आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकर्याच्या काळजात आज याच शब्दांचा आक्रोश घुमतो आहे. पावसाची वाट पाहता पाहता डोळ्यांतलं पाणीही आटून गेलं, पण काळ्या आईच्या कुशीत पडलेलं बी अजूनही पावसाच्या एका थेंबासाठी आसुसलेलं आहे. विहिरींच्या तळाशी दिसणारी कोरडी भेग, शिवारावर पसरलेली पिवळसर उदासी आणि जनावरांच्या डोळ्यांतली तहान हे केवळ दुष्काळाचे चित्र नाही; हा जगण्याच्या मुळावर आलेला आघात आहे. आभाळाने पाठ फिरवली की केवळ शेती करपून जात नाही, तर शेतकर्याच्या स्वप्नांची पालवी, घराच्या चुलीची ऊब आणि उद्याच्या आशेची हिरवळही हळूहळू करपायला लागते. तरीही हा माणूस रोज पहाटे उठतो, कोरड्या बांधावरून हात फिरवतो आणि पुन्हा आभाळाकडे पाहतो… कदाचित उद्या पाऊस येईल, या एका आशेवर आपलं अख्खं जीवनसत्र धुगधुगत ठेवतो.
पावसाची वाट पाहणं शेतकर्याच्या नशिबात नवीन नाही. पण प्रत्येक वेळी पावसाची वाट पाहताना त्याच्या मनात एक वेगळंच गणित सुरू असतं. यंदा पीक आलं तर मागचं कर्ज फेडायचं मुलाच्या शिक्षणाची फी भरायची मुलीच्या लग्नासाठी थोडं बाजूला काढायचं, घराच्या छपराची डागडुजी करायची, शेतीसाठी घेतलेल्या मोटारीचे हप्ते भरायचे आणि उरलं तर पुढच्या हंगामासाठी बियाणं, खतं आणि औषधं घ्यायची. पण आभाळानेच जर पाठ फिरवली, तर ही सगळी गणितं एका क्षणात विस्कटून जातात. दुष्काळ हा फक्त पावसाचा अभाव नसतो. दुष्काळ म्हणजे एका शेतकर्याच्या स्वप्नांना आलेली तहान असते. दुष्काळ म्हणजे विहिरीच्या तळाशी दिसणारा काळा दगड असतो. दुष्काळ म्हणजे चार्याच्या शोधात गावोगाव भटकणार्या जनावरांच्या डोळ्यांतली अस्वस्थता असते. दुष्काळ म्हणजे पाण्यासाठी मैलोन्मैल चालणार्या मायबहिणींच्या डोक्यावरची हंड्यांची रांग असते. दुष्काळ म्हणजे शाळेची फी भरता येणार नाही म्हणून मुलाच्या डोळ्यांत आलेली चिंता असते. आणि दुष्काळ म्हणजे घरातल्या मोठ्यांनी स्वतःचा घास कमी करून लेकराच्या ताटात वाढलेली शेवटची भाकरी असते.
यंदाच्या दुष्काळी परिस्थितीने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला कठीण प्रश्नांसमोर उभं केलं आहे. राज्यातील अनेक तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले आहेत. ही नोंद महत्त्वाची आहे; पण त्या आकड्यांच्या मागे किती घरे आहेत, किती शेतं आहेत, किती कोरड्या विहिरी आहेत, किती तहानलेली जनावरं आहेत आणि किती अपूर्ण स्वप्नं आहेत, याची मोजदाद कोणत्या आकडेवारीत होणार?महाराष्ट्राने यापूर्वीही दुष्काळ पाहिला आहे. 1972 चा दुष्काळ आजही अनेकांच्या आठवणीत जिवंत आहे. त्या काळात माणसं पाण्यासाठी, चार्यासाठी आणि रोजगारासाठी भटकली. पुढेही राज्याला अनेक दुष्काळी वर्षांचा सामना करावा लागला. पण काळ बदलला, साधनं बदलली, तंत्रज्ञान आलं, योजना आल्या तरी शेतकर्याच्या आभाळाकडे लागलेल्या डोळ्यांतली प्रतीक्षा मात्र फारशी बदलली नाही.कारण शेतकरी आजही निसर्गाशी दोन हात करत असतो.कधी पाऊस येतो, पण इतका की उभं पीक वाहून जातं. कधी पाऊस येतच नाही. कधी रोग येतो, कधी बाजारभाव कोसळतो, कधी उत्पादन खर्च वाढतो. बियाणं महाग, खतं महाग, औषधं महाग, मजुरी महाग; पण शेतमालाला मिळणारा भाव मात्र त्याच्या हातात नसतो. शेती करताना तो निसर्गावर अवलंबून असतो आणि माल विकताना बाजारावर. या दोन्ही टोकांच्या मध्ये त्याचं आयुष्य कधी ताणलं जातं, कधी तुटतं.
शेतकरी जेव्हा बियाणं मातीत टाकतो, तेव्हा तो फक्त बी पेरत नसतो; तो आशा पेरत असतो. रोप उगवतं तेव्हा त्याला लेकरू उगवल्यासारखं वाटतं. पिकाची हिरवाई दिसली की त्याच्या चेहर्यावर समाधानाची पालवी फुटते. पण त्याच पिकावर पावसाने दगा दिला की तो हिरवा रंग डोळ्यांसमोर राखाडी होतो. शेतात उभं असलेलं कोमेजलेलं पीक पाहताना शेतकर्याच्या मनात किती काही कोमेजत असेल, याचा विचार आपण किती वेळा करतो? दुष्काळाचं आणखी एक मोठं दुःख म्हणजे तो घरातल्या स्त्रीच्या खांद्यावरही उतरतो. पाण्यासाठी लांबचा पल्ला गाठणारी आई, घरातल्या माणसांसाठी दोन वेळच्या जेवणाची जुळवाजुळव करणारी गृहिणी, जनावरांसाठी चार्याची चिंता करणारी शेतकरी महिला आणि त्याच वेळी शेतात राबणारी कष्टकरी बाई तिच्या श्रमांची किंमत कोणत्या हिशेबात मोजायची? तिच्या हातावरच्या भेगा आणि कपाळावरच्या आठ्या या ग्रामीण दुष्काळाची खरी नोंद आहेत.
आपणही या सगळ्या चित्रापासून अलिप्त राहू शकत नाही. आपल्या ताटातली भाकरी, भाजी, डाळ, फळं या सगळ्यांच्या मागे शेतकर्याचा घाम आहे. आपण शहरात कितीही उंच इमारती बांधल्या, कितीही मोठी बाजारपेठ उभी केली, कितीही आधुनिक जीवन जगलो, तरी अन्नासाठी शेवटी आपल्याला मातीशीच जोडावं लागतं. म्हणून शेतकर्याच्या संकटाकडे केवळ दयेने पाहण्याची वेळ नाही; त्याच्या श्रमाचा सन्मान करण्याची वेळ आहे. पाण्याची किंमत समजून घेण्याची वेळ आहे. अन्नाची नासाडी थांबवण्याची वेळ आहे. जलसंधारणाला केवळ सरकारी योजना न मानता गावागावाची चळवळ बनवण्याची वेळ आहे. पाऊस पडला की पाणी वाहून जाऊ देण्याऐवजी ते जमिनीत मुरवण्याची, गावच्या विहिरी पुन्हा जिवंत करण्याची आणि भविष्यातील दुष्काळाशी लढण्यासाठी आजपासून तयारी करण्याची वेळ आहे.शेतकरी हा केवळ ‘अन्नदाता’ म्हणून भाषणात आठवणारा शब्द नसावा. त्याच्या कष्टाला बाजारात योग्य मूल्य, संकटात शासनाची साथ आणि जगण्यात सन्मान मिळाला पाहिजे. कारण त्याच्या घरातला दिवा विझला तर त्याची सावली आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही.आज महाराष्ट्राच्या अनेक भागांत आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी आपल्याला जणू एकच प्रश्न विचारतो आहेमाझ्या शेतात पाणी कधी येईल? पण त्या प्रश्नाच्या मागे आणखी एक मोठा प्रश्न आहे माझं जगणं कोण वाचवणार?या प्रश्नाचं उत्तर केवळ शासनाने द्यायचं नाही. आपण सर्वांनी मिळून द्यायचं आहे.कारण दुष्काळ फक्त शेतात पडत नाही तो घराघरांत उतरतो.
आभाळ कोरडं पडणं ही निसर्गाची परीक्षा असेल; पण त्या कोरड्या आभाळाखाली शेतकर्याच्या डोळ्यांतली आशा जिवंत ठेवणं ही आपल्या माणुसकीची परीक्षा आहे आणि ही परीक्षा आपण सगळ्यांनी मिळून पास
व्हायलाच हवी.
A dry sky