नाशिकमधील उद्यानांची विदारक स्थिती!
– वाहिद बागवान
ज्या शहरात मोकळ्या हिरवळीच्या जागा पद्धतशीरपणे मारल्या जातात, ते शहर स्वतःच्याच विनाशाची व्यवस्था निर्माण करत असते, या स्कॉटिश नगररचनाकार इयान मॅकहार्टने मांडलेल्या सिद्धांताची प्रचिती आज नाशिक शहरात पदोपदी येत असते. एकेकाळी निवृत्तांचे नंदनवन, आल्हाददायक गारवा, गोदा-नंदिनीचा प्रवाही सहवास आणि टेकड्यांच्या हिरव्यागार कुशीत विसावलेले नाशिक आज काँक्रीटच्या जंगलात स्वतःची मूळ ओळख आणि शांत श्वास वेगाने हरवून बसत चालले आहे. शहराच्या चौफेर विस्तारणार्या उड्डाणपुलांना, डांबरी रस्त्यांना आणि टोलेजंग इमारतींना विकासाचे मापदंड मानते जात असले, तरी सामान्य नाशिककराला, कामावरून थकलेल्या नोकरदाराला, ज्येष्ठ नागरिकांना दोन क्षण निवांत बसून मोकळा श्वास घेण्यासाठी, मुलांना खेळण्या-बागडण्यासाठी आवश्यक असणारी सार्वजनिक उद्याने आणि बागा आज प्रशासकीय अनास्था, देखभालीचा अभाव आणि लोकांच्या बेपर्वाईच्या त्रांगड्यात सापडल्या आहेत.
एखाद्या नव्या उद्यानाची उभारणी पूर्ण झाल्यावर लोकप्रतिनिधी आणि अधिकार्यांच्या उपस्थितीत मोठी फीत कापून, नामफलकाचे थाटामाटात अनावरण करून जेव्हा लोकार्पण होते, तेव्हाचे ते हिरवेगार मखमली गवत, त्यावर पाण्याचे उडणारे तुषार, रंगीबेरंगी शोभिवंत झाडांची केलेली पद्धतशीर मांडणी, मुलांसाठी लावलेली चकचकीत खेळणी आणि हवेत दरवळणारा मातीचा व फुलांचा मंद सुगंध यामुळे स्थानिक नागरिकांचे मन सुखावून जाते. मात्र, उद्घाटनाचा तो जल्लोष ओसरला, कॅमेर्यांचे फ्लॅश विझले आणि नामफलक जुने झाले की, त्या देखण्या बागेचा ताबा जणू कायमस्वरूपी उपेक्षेकडे जातो. कालांतराने पाणी देण्याची यंत्रणा कोलमडते, मातीची मशागत थांबते, खतांचा पत्ता राहत नाही आणि कंत्राटदारांचे बिल निघाल्यावर देखभालीकडे ढुंकूनही पाहिले जात नाही. एकेकाळी जी बाग विविधरंगी नटलेली असे. तिथे आज केवळ करपलेले पिवळे गवत, साचलेली धूळ, उखडलेली जमीन आणि कुजलेल्या पालापाचोळ्याची दुर्गंधी उरल्याचे चित्र दिसते.
इंदिरानगर असो, सिडको, सातपूर, पंचवटी, मखमलाबाद असो वा जेलरोड, बिटको चौक, गंगापूर रोड आणि वडाळा-पाथर्डी परिसरातील नागरी वस्त्या; महापालिकेच्या नगररचना आराखड्यात शेकडो उद्याने आणि हिरवे पट्टे कागदावर आरक्षित दिसतात. परंतु, प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन पाहिले तर यातील बहुतांश उद्यानांना उजाड स्मशानशांततेचे स्वरूप आलेले दिसते. बागांमधील घसरगुंड्यांचे लोखंडी पत्रे मधोमध उचकटून धारदार झाले आहेत, झोपाळ्यांच्या साखळ्या गंजून तुटलेल्या अवस्थेत लोंबकळत आहेत आणि सी-सॉची अवस्था पार मोडून पडलेली आहे. काही वर्षांपूर्वी प्रत्येक प्रभागात नागरिकांच्या सुदृढतेसाठी लोकप्रतिनिधींच्या विकासनिधीतून मोठ्या थाटात उभारण्यात आलेल्या ‘ग्रीन जिम’ अथवा खुल्या व्यायामशाळांचे लोखंडी सांगाडे आज बोल्ट निखळून, चक्रे जाम होऊन गंज खात पडले आहेत. अनेक उद्यानांमधील जॉगिंग ट्रॅकचीही अवस्था बिघडलेली आहे.आजूबाजूला काटेरी रानटी झुडपे माजली आहेत, ज्यामुळे पहाटे किंवा संध्याकाळी चालण्यासाठी येणार्या ज्येष्ठ नागरिकांना कसरत करतच चालावे लागते. कुजलेला कचरा, तुटलेली कचराकुंडी आणि घाणीचे साम्राज्य यामुळे बागांचे नैसर्गिक वातावरण पार दूषित झाले आहे. त्यातच अनेक उपनगरांतील उद्यानांच्या कंपाऊंड वॉल तुटलेल्या असून मुख्य लोखंडी प्रवेशद्वारे गायब झाली आहेत, तर पथदिप बंद असल्याने संध्याकाळनंतर हीच उद्याने मद्यपी, गर्दुल्ले आणि समाजकंटकांचे सुरक्षित अड्डे बनत असल्याचे पाहायला मिळते. यामुळे महिलांनी आणि मुलांनी सुरक्षिततेच्या भीतीपोटी या बागांकडे फिरकणेच बंद
केले आहे. बागेतला एखादा मोडलेला बाकडा किंवा उखडलेला पेव्हर ब्लॉक वेळेवर दुरुस्त केला नाही, तर हळूहळू ती संपूर्ण बागच उद्ध्वस्त होत जाते. मात्र, यात केवळ महापालिकेच्या यंत्रणेला दोष देऊन आपली जबाबदारी संपत नाही. उद्याने ही ‘आपली’ सार्वजनिक संपत्ती आहे ही जाणीव नागरीकांमध्ये अजूनही पुरेपूर रुजलेली नाही. बागेत फिरताना रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, वेफर्सची पाकिटे आणि प्लास्टिकचा कचरा अस्ताव्यस्त फेकणे, पाळीव कुत्र्यांना आणून अस्वच्छता करणे आणि नाजूक रोपांची नासधूस करणे याबरोबरच सुजाण नागरिकांची उदासीनताही या हिरवाईचा संकोच होण्यास तेवढीच कारणीभूत आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पायाभूत सुविधांसाठी, रिंगरोडसाठी आणि पर्यायी मार्गांसाठी हजारो कोटींचे भव्य विकास आराखडे आकाराला येत आहेत. प्रशासनाने शहराच्या नागरी आरोग्याचा तोल सांभाळणार्या या उद्यानांच्या सक्षम आणि शाश्वत देखभालीचे धोरण युद्धपातळीवर आखण्याची वेळ आली आहे. कंत्राटदारांना केवळ नवीन बाग तयार करण्याचे कंत्राट न देता, पुढील पाच वर्षांसाठी पाणी, सुरक्षा आणि नियमित दुरुस्तीचा कठोर वार्षिक देखभाल करार बंधनकारक करण्यात यावा.
तसेच शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ, पर्यावरणप्रेमी संस्था किंवा कॉर्पोरेट कंपन्यांना सीएसआर फंडातून बागा दत्तक देण्याची सुलभ योजना राबविली जावी. केवळ परदेशी शोभेचे गवत लावण्याऐवजी देशी सुगंधी फुलांची आणि दाट सावली देणारी स्थानिक झाडे लावण्यावर भर दिला पाहिजे. शेवटी एखाद्या शहराचे सुसंस्कृतपण आणि भव्यता ही केवळ तिथल्या धावणार्या वाहनांच्या वेगावरून किंवा उड्डाणपुलांच्या लांबीवरून सिद्ध होत नाही; तर तिथल्या सर्वसामान्य माणसाला मोकळा श्वास घेण्यासाठी, बालकांना सुरक्षित बागडण्यासाठी आणि ज्येष्ठांना निवांत विरंगुळ्यासाठी शहर किती चांगला पर्याय देते, यावर त्या शहराचे खरे वैभव ठरत असते. नाशिक महानगरपालिका आणि नाशिककर नागरिक वेळीच जागे होऊन या हिरव्या फुप्फुसांना नवसंजीवनी देऊन तो हरवलेला नैसर्गिक सुगंध पुन्हा परत आणणार, की विकासाच्या नावाखाली सिमेंटच्या वेदीवर या हिरवळीचा पूर्ण बळी जाऊ देणार, हाच आजच्या घडीचा सर्वांत कळीचा प्रश्न आहे.
A breath of greenery, or an exile of neglect?