आस्वाद

उबदार आठवणींची शेकोटी

थंडीचे दिवस सुरू झाले की, पहाटेची झोंबणारी हवा अन् हातापायांत भिनलेला गारठा आपल्यालाही नकळत गावाकडच्या त्या दिवसांची आठवण करून देतो. शहरातील थंडी कोरडी आणि एकाकी असते – इथले लोक फक्त गरम, लुसलुशीत ब्लँकेट, स्वेटर आणि जर्किंग यांसारखे कपडे अंगावर ओढतात. त्याने शरीराला उबदार वाटते; पण मनातली थंडी मात्र काही जात नाही. मनातली थंडी जाण्यासाठी खेड्यातल्या अंगणात पेटवलेली शेकोटीच लागते. गावाकडच्या थंडीत एक वेगळाच जिव्हाळा असतो आणि त्या जिव्हाळ्याच्या केंद्रबिंदूत असते ती ही शेकोटी!!
ते जुने दिवस आठवले की, मला आठवते ती दिनू तात्याने पहाटे पहाटे खळ्यावर पेटवलेली शेकोटी!
पहाटेच्या धुरकट धुक्यात, सूर्याचे पहिले किरण अद्याप वाकूनही दिसण्याआधी, खळ्याच्या एखाद्या कोपर्‍यात अथवा जनावरांच्या गोठ्याजवळ कुठेतरी शेकोटीची लालसर ज्योत डोलू लागली की समजायचे दिनू तात्याची शेकोटी पेटली. मग डोळ्यांवर कितीही गाढ झोप असली तरी आम्ही सर्व- मावडीपासून ते ब पर्यंत त्या शेकोटीच्या आजूबाजूला गोळा व्हायचो. मग उसाच चिपाड, सरपण अन् पालापाचोळा टाकत त्या शेकोटीचा परीघ अजूनच वाढायचा. आधी तळहातांवर हात घासून ते त्या शेकोटीच्या भोवती धरले जायचे. मग हळूहळू मांडी घालून बसलेली मंडळी मांड्या मोडून एक-एक तळपाय शेकवून घ्यायचे. बैलांना चारा घालण्यापूर्वी क्षणभर शेकोटीभोवती तात्या विश्रांती घ्यायचे, घरातील सुना गोठ्यातील शेणपाणी करून झाले की त्या ओलसर अंगानेच लगबगीने शेकोटीचा आधार घ्यायच्या. तर चुलीवरचा दिवस सुरू करण्याआधी आजी तिच्या नातीसह त्या उबदार स्पर्शात काही क्षण बुडवून घ्यायची. तो तेव्हाचा उबदार स्पर्श किती मौल्यवान असायचा हे आता लक्षात येते.
शेकोटी म्हणजे फक्त आग नसते, ती एक जिवंत साथ असते. ती शरीराला ऊब देते आणि मनाला एक आश्वासक, गोड स्पर्शही देते. तिच्या भोवती बसताना माणसांमधला अनोळखीपणाचा पडदा हळूहळू विरळ होतो. बोलण्याला कुठलेही कारण लागत नाही; शब्द आपोआप ओठांवर येतात. थंड हवेत वर जाणार्‍या धुराबरोबर मनात साठलेली दगदग, काळजी आणि थकवा जणू विरघळून नाहीसा होतो.
खरंतर गावाकडच्या थंड हिवाळ्यात शेकोटीला एक खोल अर्थ होता – ती एकत्र येण्याची परंपरा होती, मन जोडण्याचा संस्कार होता. रात्रीच्या प्रचंड गारव्यात घराबाहेर पेटलेल्या शेकोटीभोवती वृद्ध मंडळी जुन्या कथा सांगत बसत, पोरं हसतखेळत त्या ऐकत, तर आई-वडील दिवसभराचे अनुभव शेअर करत. त्या क्षणांत थंडी, आग आणि माणुसकी यांचा एक अतिसुंदर संगम घडत असे- एक अशी ऊब जी आयुष्याला अर्थ देऊन जात असे.
आजच्या धावपळीच्या आधुनिक जीवनात शेकोटी पेटवण्याइतका वेळ किंवा प्रसंग फार कमी लोकांकडे उरला आहे. तरीही, हिवाळा येताच मनात कुठेतरी एक हळूवार ठिणगी पडते-त्या पहाटेच्या ओलसर जमिनीच्या वासाची, धुरकट धुक्याची आणि शेकोटीच्या त्या उबदार, मायेच्या स्पर्शाची..!
शेकोटी आपल्याला शांतपणे सांगून जाते की, उब ही फक्त आगीची नसते- ती नात्यांची, आठवणींची आणि माणुसकीचीही असते..!! थंडीच्या या दिवसांत मनाला खरी उब देणारी अशी एखादी छोटीशी आठवण आयुष्यभर जिवंत राहते. हिवाळा येतो आणि या आठवणी पुन्हा मनात उजळून निघतात.. उबदार, जिवंत आणि कायमच्या अमर राहण्यासाठी…

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मोहाडीत मोहाडमल्ल महाराजांची शतकाची रोठ परंपरा

लोकसहभागातून साडेतीन लाखांचा रथ; आज भव्य मिरवणूक दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामदैवत श्री…

19 hours ago

सिंहस्थाच्या नावाने त्र्यंबकेश्वरचे रस्ते गाळात

ओव्हर स्मार्ट नियोजनामुळे नागरिक अन् भाविक हैराण त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर…

19 hours ago

पावसा पावसा… तू पण!

नाशिक शहर आणि सभोवतालच्या परिसरात मागील महिन्याभरात धो..धो.. पाऊस बरसला आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यात…

19 hours ago

अब्दुल्लांचे आंदोलन

कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनात 20 जुलै रोजी प्रचंड हंगामा झाला. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी…

19 hours ago

जीवघेणे खड्डे !

पाच जणांचा मृत्यू; नागरिकांमध्ये प्रचंड संताप नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात हजारो कोटी…

19 hours ago

खड्डेमुक्तीसाठी मंत्री महाजनांचा सात दिवसांचा अल्टिमेटम

अन्यथा अधिकार्‍यांवर कारवाई, ठेकेदारही रडारवर नाशिक : प्रतिनिधी वर्षभरात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने शहरात रस्ते…

20 hours ago