– राजेश शिरभाते
जगभरात उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. दहा दिवस चालणारा हा उत्सव राज्यातल्या गल्लीबोळांपासून ते अगदी थेट जगात जिथे जिथे भारतीय नागरिक आहेत, त्या- त्या ठिकाणी साजरा होत असतो. एकाच वेळेस भक्ती, शक्ती आणि कलात्मकता, निर्णयक्षमता, नेतृत्व, वैचारिक आदानप्रदानाबरोबर मोठी आर्थिक उलाढाल होणारा हा सण आहे. कोकणातील गणेशोत्सवाचे महत्त्व विशेष आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासूनच कोकणवासीयांच्या घराघरांत एकप्रकारची लगबग सुरु झालेली आहे. त्यातील अनेक कुटुंबे आपल्या कबिल्यासह मिळेल त्या वाहनाने आपापल्या मूळ गावात पोहोचले आहेत. त्यामुळे एरवी शांत निवांत वाटणारे कोकण आता गजबजलेले आहे.
विदर्भात याच काळात असलेल्या महालक्ष्मी सणासाठीही विदर्भातील मुंबई, पुणे, नाशिक, बेंगळुरू आदी ठिकाणी नोकरीनिमित्त गेलेली तरुणाईही आपल्या मातीच्या ओढीने घराकडे परतत आहेत. उर्वरित महाराष्ट्रातही या सणाचा उत्साह कुठेही कमी नाही. बुद्धीची देवता आणि स्वातंत्र्यलढ्यात जनगागृतीचे कार्य केलेल्या या उत्सवाचे स्वरूप कितीही पालटले असले तरी श्रद्धेचा तो गाभा अद्याप कायम आहे. गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीचे व्यवस्थापन हा एक मोठा प्रश्न आहे. मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होत नसल्याने कोकणी माणसांना दरवर्षी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यासाठी दुसरा रेल्वेचा पर्याय आहे. मात्र, एकतर रेल्वेचे तिकीट मिळण्यासाठी मोठे सायास करावे लागतात आणि अनेकांची गावे ही रेल्वेस्थानकांपासून दूर असल्याने व स्थानिक प्रवासासाठी अधिक खर्च येत असल्याने कोकणवासीयांची भिस्त रस्तेमार्गे प्रवासावरच आहे. त्यातही जो सधन वर्ग आहे तो आपल्या
स्वतःच्या वाहनातून जात असतो. मात्र, बहुसंख्य अद्याप लालपरीला आपली मानत आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून राजकारणी व्यक्तींनी आपापल्या मतदारसंघातून कोकणात गावी जाण्यासाठी एसटी बस सोडण्याचा व त्यातही ती प्रवाशांसाठी विनामूल्य सोडण्याचा प्रघात सुरू केलेला आहे. काही प्रवाशांना त्यामुळे नक्कीच फायदा होत आहे. अर्थात, केवळ प्रवाशांना मोफत बसप्रवास घडवणे महत्त्वाचे नाही, तर त्या अनुषंगाने इतरही विचार झाले पाहिजेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, गोवा महामार्ग आहे. या महामार्गाच्या कामात अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अगदी काही महत्त्वाच्या ठिकाणी इथे मोठी वाहतूक कोंडी होते. सध्याही अनेक जण आपापल्या गाड्यांमध्ये अडकून पडलेले असतील. त्यांच्यासाठी आधीपासूनच जरा गंभीरपणे विचार आणि योजनाबद्ध काम करण्याची गरज आहे.
राजकारणी व्यक्तींनी कधीतरी आपल्या फायद्याच्या पुढे जाऊन लोकांना कमीत कमी त्रास कसा होईल याचा विचार करायला हवा आणि अधिकारी व तांत्रिक कर्मचारी यांना विश्वासात घेऊन त्यावर काम करायला हवे. प्रत्येक वेळी मे महिन्यात घोषणा होते की, यंदा गणेशोत्सवापर्यंत रस्ता पूर्ण होणार. नंतर गणेशोत्सवात दिवाळीची घोषणा होते. दिवाळीत पुन्हा मे महिन्याचे हे चक्र गेल्या कित्येक वर्षांपासून असेच सुरू आहे. बरं हा झाला एक प्रश्न.
दुसरा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे सार्वजनिक स्वच्छतागृहांचा. एसटी महामंडळांची जी स्वच्छतागृहे आहेत ती बांधा आणि वापरा व काही काळाने पुन्हा बांधा या तत्त्वावर असतात. त्यामध्ये मधला देखभालीचा भाग हा नसतोच. त्यामुळे या प्रवाशांची व खास करून महिलावर्गाची मोठी कुचंबणा होते. हाच अनुभव
स्वतःच्या वाहनांनी जाणार्यांच्या बाबतीतही होतो. काही महागड्या विश्रांतिीस्थळांवरील स्वच्छतागृहे वगळता इतर ठिकाणी मोठा त्रास होतो.
सण-उत्सव या काळात रेल्वे काही विशेष गाड्या सोडत असते. यंदा काही अनारक्षित गाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्या गाड्यांची अवस्था दाखवणारे अनेक व्हिडीओे सध्या समाजमाध्यमांवर फिरत आहेत. रेल्वेने भंगारात काढण्याआधी हे डबे या रेल्वेला लावले की काय, अशी शंका येते. केवळ वंदे भारत या महागड्या गाड्या सोडणे हे काही रेल्वेचे काम नाही. गेल्या सत्तर वर्षांत रेल्वेला सामान्यांच्या प्रवासाचे साधन म्हणून जपण्यात आले आहेत. एकेकाळी रेल्वेच्या स्वच्छतागृहांची अवस्था आणि आजची अवस्था पाहता आपण प्रगती करत आहोत की अधोगती असा विचार येतो. बरं हे केवळ जनरल डब्यात असते असे नाही, तर ते अगदी वातानुकूलित द्वितीय श्रेणीच्या डब्यातही तीच अवस्था आहे. केवळ खाजगीकरण आणि आपल्या लोकांना कंत्राटे देऊन हे काम होणारे नाही. त्यासाठी खरोखर हे काम करून घेण्याची इच्छा असावी लागते. केवळ प्रचारात अनेक गाड्या सोडल्या हे सांगायला बरे वाटते. मात्र, प्रत्यक्ष प्रवास करणार्यांचे काय हाल होतात, हे त्यांचे त्यांनाच माहीत.यंदाच्या गणेशोत्सवात डीजेचा मुद्दा चालला. बुद्धीची देवता असलेल्या गणेशाच्या विद्यानंद बापट या नावाच्या खर्या व्यक्तीने तो ऐरणीवर आणला. त्याला सहकार्य करून आपल्या सणाचे स्वरूप अधिक लोकाभिमुख करण्याऐवजी स्वतःला धर्माचे रक्षक समजणार्यांनी त्यांचा निषेध सुरू केला. नशीब पुण्यातील काही विचारी लोकांनी हा विचार उटलून धरला आहे. एकेकाळी गणेशोत्सव हे कला प्रदर्शनाचे माध्यम होते. सर्वांनी एकत्र येत सणाचा आनंद घेण्याची भावना होती. आता त्याचे स्वरूप अधिकाधिक लोकांना त्रासदायक असे झाले आहे. डीजेच्या स्पर्धेने निर्माणहोणारा त्रास कदाचित तरुणाईला जाणवणार नाही. मात्र, वयस्कर आणि आजारी व्यक्तींना तो नक्कीच जाणवणार आहे. आपल्याला सणाचा देखावा करण्यापेक्षा अधिकाधिक लोकांना त्यामध्ये सामावून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. गणेशोत्सवाचा आनंद समाजातील सर्वच घटकांना घेता यावा याचीही काळजी घ्यायला हवी. केवळ निर्थक आर्थिक श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यापेक्षा काही अर्थपूर्ण आणि सर्वांना आनंद देणार्या गोष्टी या गणेशोत्सवात होणे आवश्यक आहे. सामाजिक देखाव्यांची जागा आजकाल केवळ काही दिवे आणि लेसर शो यांनी घेतली आहे. त्याऐवजी आपल्या परिसरातील कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य गणेशोत्सवांनी पुन्हा अगदी आवर्जुन सुरू करायला हवे, असे वाटते. या पुढील दिवसांमध्ये महाराष्ट्राचा हा सण कसा आदर्श असू शकतो हे जगाला दाखवण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. त्याचप्रमाणे मराठी अधिकार्यांनीही आपल्या लोकांना कमीत कमी त्रास होईल यासाठी आपले अधिकार व बुद्धिमत्ता वापरली पाहिजे. या सणाच्या दिवसांमध्ये होत असलेल्या मिठायांच्या आर्थिक उलाढालीमुळे या व्यवसायात काही गैरप्रकार होऊ शकतात. तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने आतापर्यंत चार ट्रक बनावट मावा पकडण्यात आला आहे. त्या गोष्टींकडेही लक्ष दिले पाहिजे. गेल्या काही दिवसांपासून वह्या व पेन देण्याची एक चळवळ उभी राहात आहे. अशाच प्रकारचे इतरही काही प्रयत्न आणि नवीन कल्पना पुढे यायला हव्यात. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने पर्यावरणाचा विचारही व्हावा. हा गणेशोत्सव आनंदात आणि उत्साहात पार पडावा ही शुभेच्छा. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी पार पाडावी.
A Joyful Ganeshotsav
- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…
- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…
- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…
- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…
तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…
रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…