नाशिक

उसाच्या शेतात बिबट्याने दोन महिला मजुरांवर झडप घातली.

सिन्नर : प्रतिनिधी
उसाच्या शेतात कामकाज करताना बिबट्याची चाहूलही लागली नाही आणि अचानक त्याने दोन महिला मजुरांवर झडप घातली. बिबट्याच्या या अनपेक्षित हल्ल्यात दोन ऊसतोड मजूर महिला गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. 22) दुपारी वडांगळी येथे घडली. जखमी महिलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असले, तरी हल्ल्यानंतरही बिबट्या परिसरात मुक्तपणे फिरत असल्याचे स्थानिकांनी केलेल्या चित्रीकरणातून समोर आले आहे. गेल्या वर्षी याच परिसरात नरभक्षक बिबट्याने दहशत निर्माण केली होती. आता पुन्हा हल्ल्याची घटना घडल्याने शेतकरी व ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

या हल्ल्यात सोन्याबाई ज्ञानेश्वर राठोड (वय 25) आणि योगिता अर्जुन जाधव (30, दोघी रा. चिंचगव्हाण, ता. चाळीसगाव) जखमी झाल्या आहेत. सोन्याबाई यांच्या गुडघा, कंबर आणि पाठीवर बिबट्याच्या नखांनी खोलवर जखमा केल्या आहेत. योगिता यांच्या डोक्याला आणि उजव्या दंडाला बिबट्याच्या पंजाचा मार लागला आहे. वडांगळी-तामसवाडी रस्त्यालगत शांताराम सैंद यांच्या मालकीच्या गट क्रमांक 250 मधील शेतात रविवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. शेतात सुमारे 20 ते 25 मजूर ऊसतोडीच्या कामात व्यस्त होते. पुरुष मजूर ट्रॅक्टरमध्ये ऊस रचत होते, तर महिला मजूर शेतातील उर्वरित दहा गुंठे क्षेत्रातील ऊस तोडत होत्या. याचवेळी अचानक बिबट्याने महिलांवर हल्ला चढविला. काही क्षणांत घडलेल्या या प्रकारामुळे मजुरांमध्ये एकच गोंधळ उडाला. जीव वाचविण्यासाठी मजुरांनी शेतातून धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. वनपरिक्षेत्राधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल तानाजी भुजबळ, वनरक्षक दीपाली सदावर्ते, मधुकर शिंदे तसेच वन्यजीव रक्षक रोहित लोणारे आणि निखिल वैद्य यांनी दोन्ही जखमी महिलांना सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी बिटको सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.पश्चिम विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक कल्पना वाघेरे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी

दोन महिलांवर हल्ला केल्यानंतरही बिबट्या परिसरातून निघून गेलेला नाही. स्थानिकांनी केलेल्या चित्रीकरणात तो याच परिसरात फिरताना दिसला आहे. त्यामुळे ऊसतोडीसाठी शेतात जाणार्‍या मजुरांसह शेतकर्‍यांमध्ये भीती वाढली आहे. गेल्या वर्षी वडांगळी परिसरात नरभक्षक बिबट्याने घातलेले थैमान नागरिक विसरलेले नाहीत. त्यातच पुन्हा हल्ल्याची घटना घडल्याने नागरिक धास्तावले आहेत. संभाव्य धोका लक्षात घेता वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

A leopard pounced on two female laborers while they were working in a sugarcane field.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

त्र्यंबकेश्वरला भीषण दुष्काळी परिस्थिती

पिके करपली, पशुधनावरही चाराटंचाईचे सावट त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी यंदा त्र्यंबकेश्वर तालुक्यात कागदोपत्री सरासरीपेक्षा जास्त पावसाची…

15 minutes ago

अतिरिक्त उत्पादन; अंदाजाने कांदा उत्पादक धास्तावले

वर्षभर 3 हजार रुपये दराची मागणी; निर्यातीसाठी स्थिर धोरण राबविणे गरजेचे लासलगाव : वार्ताहर कांदा…

21 minutes ago

निफाड हिवाळ्यात का होते थंडा थंडा कूल कूल?

भौगोलिक रचना पाहता तालुका पाण्याचे खोरे असल्याचे तज्ज्ञाचे मत निफाड : तालुका प्रतिनिधी दरवर्षी हिवाळ्यात…

34 minutes ago

सप्तशृंगगड भाविकांनी गजबजला

वणी-सप्तशृंगगड घाटरस्त्यावर वाहनांची वर्दळ सप्तशृंगगड : प्रतिनिधी दिवाळीच्या सुट्ट्या संपून दैनंदिन कामकाजाला सुरुवात झाली असली,…

41 minutes ago

महापौरांच्या प्रभागातील 29 कामांसाठी बांधकाम विभागाला हवीय एनओसी

मनपाची यंत्रणा असतानाही बांधकाम विभागावर भरोसा नाशिक : प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेचा स्वतंत्र बांधकाम विभाग आणि…

57 minutes ago

राहुड घाटात दोन ट्रकच्या धडकेत तिघे जखमी

ब्रेक निकामी झाल्याने कंटेनरला धडक; ट्रकला लागली आग चांदवड (वार्ताहर) : मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाट…

1 hour ago