नाशिक

दिंडोरीत दहा लाखांत एखादाच दुर्मिळ पांढरा पाहुणा

रत्नागिरीनंतर महाराष्ट्रातील दुसराच चमत्कार!

♦ 1965 नंतर पांढरा बिबट्या प्रथमच
फोटोत फ्रेमबद्ध
♦ दुर्मिळता जपण्याची वन विभागावर जबाबदारी

नाशिक : विक्रांत पाटील
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव शिवारात निसर्गाचा एक असा चमत्कार पाहायला मिळाला, ज्याने वन्यजीवप्रेमी आणि शास्त्रज्ञांनाही थक्क केले आहे. उसाच्या शेतात आढळलेल्या बिबट्याच्या तीन बछड्यांपैकी एक बछडा चक्क ’पांढरा’ आहे. ही केवळ एक बातमी नसून निसर्गातील दशलक्षात घडणारी एक दुर्मिळ घटना आहे. यामुळे नाशिकच्या जैवविविधतेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. दहा लाखांत एखादाच असा दुर्मिळ ‘ल्यूसिझम’चा चमत्कार पाहायला मिळतो. रत्नागिरीनंतर ही महाराष्ट्रातील दुसरीच घटना मानली जात आहे. यापूर्वी 2025 मध्ये रत्नागिरीतही असाच एक पांढरा बछडा दिसला होता. नेमका हा बिबट्या पांढरा का असतो? तो इतर बिबट्यांपेक्षा वेगळा कसा? आणि त्याला जंगलात जगताना कोणत्या संकटांचा सामना करावा लागतो? याचा रंजक आणि शास्त्रीय आढावा आपण घेऊया.

हा पांढरा बिबट्या नेमका काय आहे? चमत्कार? नवीन प्रजाती? की निसर्गाचा रंगीबेरंगी खेळ? सोप्या शब्दांत सांगायचे तर, हा सामान्य भारतीय बिबट्याच (पॅन्थेरा पार्डस) आहे. फक्त त्याचा रंग बदललेला आहे. याला ल्यूसिझम म्हणतात. प्राण्यांच्या त्वचेला आणि केसांना रंग देण्याचे काम ’मेलानिन’ नावाचे रंगद्रव्य करते. जेव्हा एखाद्या प्राण्यामध्ये हे रंगद्रव्य तयार करणारी जनुके (जीन्स) कमकुवत होतात, तेव्हा त्याचा रंग पांढरा किंवा फिकट होतो.
संपूर्ण देशाचा विचार केला तर ओडिशाच्या नंदनकानन प्राणिसंग्रहालयात अशा पांढर्‍या बिबट्यांची नोंद आहे. परंतु जंगलात, मोकळ्या निसर्गात असा बछडा आढळणे, हे जागतिक पातळीवरही अत्यंत दुर्मिळ मानले जाते.
अल्बिनिझम (पूर्ण रंगद्रव्य नसणे) आणि ल्यूसिझम यात फरक आहे. ल्यूसिझममध्ये रंगद्रव्य आंशिक कमी होते, डोळे मात्र काळे किंवा तपकिरी राहतात. दिंडोरीच्या बछड्याचे डोळे आणि नाक सामान्य दिसतात, या बछड्याच्या अंगावर फिके काळे ठिपके दिसत आहेत, याचा अर्थ हा ’ल्यूसिस्टिक’ (ल्यूसिझम) आहे. जर हा पूर्णपणे शुभ्र असता आणि त्याचे डोळे गुलाबी असते, तर त्याला ’अल्बिनो’ म्हटले गेले असते.
इतकी दुर्मिळता का?
जंगली प्राण्यांमध्ये ल्यूसिझम किंवा अल्बिनिझम दहा लाखांत एखाद्या बिबट्यात दिसते. भारतात ‘पांढर्‍या’ बिबट्याची ही दुसरी फोटो नोंद आहे. 1965 नंतर प्रथमच अशी घटना! बिबट्यांचा सामान्य रंग पिवळा आणि काळे गोल डाग असतो, हा छद्मवेश (कॅमोफ्लाज) साठी उपयुक्त. पण ल्यूसिझम हे आनुवंशिक (जेनेटिक) बदल आहे. भ्रूण विकासात ‘न्यूरल क्रेस्ट सेल्स’ नीट स्थलांतर करू शकत नाहीत, म्हणून रंग बनवणार्‍या कोशिका कमी होतात. हे रिसेसिव्ह जीनमुळे येते, दोन्ही पालकांकडे, म्हणजे- जर आई आणि वडील या दोघांमध्येही हे दुर्मिळ ’कॅरिअर’ जनुक (जीन) असेल, तरच त्यांच्या पोटी असा पांढरा बछडा जन्माला येतो. दिंडोरीतच तीन बछड्यांपैकी फक्त एकालाच हा रंग आला, बाकी दोन सामान्य आहेत, हे या संयोगाची दुर्मिळता दाखवते. हे अगदी मानवी कुटुंबात एखाद्या मुलाचे डोळे निळे असण्यासारखेच नैसर्गिक, पण दुर्मिळ आहे. पर्यावरण, हवामान किंवा आहार याचा काहीही संबंध नाही. त्यामुळे उष्ण नाशिकमध्येही हे सहज घडू शकले.
शेवटी एक गैरसमज दूर करूया
पांढर्‍या रंगाचा हिम बिबट्या (स्नो लियोपार्ड) हा पूर्णपणे वेगळा प्राणी आहे- पँथेरा उन्सिया. तो हिमालय आणि मध्य आशियातील 3,000-5,000 मीटर उंचीवर बर्फात राहतो. त्याचा राखाडी-पांढरा रंग नैसर्गिक छद्मवेश साठी असतो, शरीर स्टॉकी, शेपटी खूप लांब. तो डरकाळी फोडत नाही. ते जगात फक्त 4,000-6,000 शिल्लक राहिले आहेत. भारतात त्याची संख्या केवळ 400 ते 700 इतकी असून, तो विलुप्तप्राय प्रजाती आहे. नाशिकसारख्या उष्ण हवामानात त्याचे येणे जैविकदृष्ट्या पूर्णपणे अशक्य आहे. तो दिंडोरीत कधीच येणार नाही!
वन्यजीव शास्त्रज्ञांच्या मते, जगभरातील बिबट्यांच्या लोकसंख्येत दहा लाखांत एखाद्याच बिबट्याला हा पांढरा रंग येतो. काही तज्ज्ञ तर हे प्रमाण आणखी कमी असल्याचे सांगतात. भारतात आज अंदाजे 12,000 ते 14,000 बिबटे असल्याचा अंदाज आहे. म्हणजे संपूर्ण भारतात एखाद-दुसराच असा पांढरा बिबट्या असेल आणि त्यातला एक दिंडोरीच्या जंगलात आहे.
दिंडोरी वन विभागाने या बछड्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुन्हा त्याच्या आईच्या स्वाधीन केले आहे, ही सवार्ंत आनंदाची बाब आहे. सध्या हा बछडा आईसोबत सुरक्षित आहे, हीच सर्वांत मोठी आशादायक बाब आहे. आई त्याला शिकार करणे शिकवेल, जगणे शिकवेल. पण स्वतंत्र झाल्यावर या बछड्याचे आयुष्य सोपे नसेल. वन खात्याने कॅमेरा ट्रॅपद्वारे त्याच्यावर दीर्घकाळ लक्ष ठेवणे, डीएनए नमुने गोळा करणे आणि निसर्गातील ही दुर्मिळता जपण्यासाठी त्याच्या अधिवासाचे संरक्षण करणे या गोष्टी अत्यावश्यक आहेत.

पांढर्‍या बिबट्याला जंगलात जगताना फायदे…
भारतासारख्या उष्ण जंगलात पांढर्‍या रंगाचे फारसे फायदे नाहीत. पण बर्फाळ भागात (उदा. हिमालय) पांढरा रंग छद्मवेशसाठी फायद्याचा ठरू शकतो.
रात्रीच्या शिकारीत काहीसा फायदा : बिबटे प्रामुख्याने रात्री शिकार करतात. चंद्रप्रकाशात किंवा खडकाळ, पांढुरक्या भूभागात पांढरा रंग काहीसा छद्मवेश म्हणून काम करू शकतो.
माणसांपासून धोका कमी असू शकतो : विचित्र दिसणार्‍या प्राण्यापासून काही स्थानिक लोक अंधश्रद्धेपोटी दूर राहतात. त्यामुळे अनावधानाने संरक्षण मिळते. (मात्र, हा तसा फायदा नाही; अंधश्रद्धा हानिकारकच असते.)
वैज्ञानिक संरक्षण : एकदा ओळख पटली की, वन खाते आणि संशोधक विशेष लक्ष देतात, जे इतर बिबट्यांना मिळत नाही.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा कुठला ‘रोग’ नाही, नवीन प्रजाती नाही. निसर्गातील नैसर्गिक विविधता आहे. दिंडोरीच्या बछड्याला आईकडे परत सोडणे हेच योग्य होते, तो सामान्य बिबट्याच आहे; फक्त रंग वेगळा!

पांढर्‍या बिबट्याला जंगलात जगताना तोटे…
दिसायला हा बछडा अत्यंत देखणा असला, तरी निसर्गात वावरताना त्याचे हे सौंदर्यच त्याच्यासाठी शाप ठरू शकते.
लपण्यात अडचण : लपण्याची क्षमता शून्य! घनदाट जंगल किंवा ऊसशेतीत पांढरा रंग शिकारी (वाघ, इतर बिबटे) आणि शिकार (हरिण, ससे) दोघांनाही सहज दिसतो. बिबट्याचा मूळ रंग त्याला वाळलेल्या गवत किंवा झाडाझुडपात लपण्यास मदत करतो. पण पांढरा रंग लांबूनच उठून दिसतो. यामुळे शिकार करताना भक्ष्याला तो लवकर दिसतो आणि स्वतःचा बचाव करताना शत्रूला (वाघ किंवा इतर मोठे प्राणी) चटकन सापडतो.
त्वचेची संवेदनशीलता : पांढर्‍या रंगामुळे सूर्याच्या अतिनील किरणांचा (अल्ट्राव्हायोलेट रेज) त्रास होण्याची शक्यता जास्त असते. या किरणांमुळे त्वचा संवेदनशील, कॅन्सरचा धोका.
दृष्टिदोष : दृष्टी किंवा शिकार करण्यात काही अडचण येऊ शकते. त्यामुळे अशा बछड्यांचा जगण्याचा दर खूप कमी असतो.
प्रजनन मिळणे अवघड : निसर्गात मादी बिबट्या नेहमी सशक्त आणि सामान्य दिसणार्‍या नरालाच पसंत करते. असामान्य दिसणार्‍या नराला सोबती मिळणे अवघड असते. त्यामुळे या जनुकाचे पुढे संक्रमण होण्याची शक्यता कमी असते.
इतर बिबट्यांकडून स्वीकार नाही ः इतर बिबटे त्याला स्पर्धक म्हणून ओळखत नाहीत असे नाही. उलट त्याचे असामान्य रूप त्याला एकट्याने जगणे भाग पाडू शकते.

A rare white visitor in Dindori, one in a million

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 days ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 days ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 days ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 days ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 days ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 days ago