मंगेशकर कुटुंबाने भारतीय चित्रपट संगीताला एक मजबूत पाया दिला. त्यांच्या गाण्यांनी भारतीय जनमानसाच्या भावनांना आकार दिला. इतकेच नाही, तर त्यांनी भारतीय जनमानसावर मोहिनी घातली. नव्या पिढीतील गायक त्यांच्याकडून प्रेरणा घेतात. मंगेशकर कुटुंबाच्या योगदानाने भारतीय संगीताच्या इतिहासात एक परंपरा निर्माण केली. दीनानाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, मीना खडीकर ही नावे भारतीयांच्या घराघरांत पोहोचलेली आहेत. मंगेशकर कुटुंबातील सदस्यांनी गायन व संगीत क्षेत्रात एक मालिकाच गुंफली. यातील पहिले नाव म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर. शास्त्रीय गायक व नाट्य कलाकार म्हणून आपली कारकीर्द करणार्या मास्टर दीनानाथ मंगेशकरांनीच कुटुंबात संगीताची पायाभरणी केली. त्यांची कन्या लता मंगेशकर यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘भारताची गानकोकिळा’ म्हणून त्यांना ओळखले जायचे. त्यांनी विविध भाषांत हजारो गाणी गायिली. लता मंगेशकर यांची बहीण आशा भोसले यांनी विविध शैलींमध्ये प्रयोगशील गायन केले. गझल, पाश्चात्य संगीत, पॉप, डिस्को यांचा संगम साधला. आशा भोसले-आर. डी. बर्मन ही जोडी प्रसिद्धीस आली. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतकार म्हणून मराठी भावगीत, भक्तिगीतांना नवे आयाम दिले. संतसाहित्याला संगीतबद्ध करून ते त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवले. आशा भोसले यांची लहान बहीण उषा मंगेशकर यांनी मराठी लोकगीत, धार्मिक गीते गायिली. मीना मंगेशकर-खडीकर मराठी गायिका व संगीतकार आहेत. त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट गीते गायिली आहेत. काही चित्रपटांच्या त्या संगीत दिग्दर्शक होत्या. मराठी बालगीतांना संगीत देण्यासाठी त्या जास्त प्रसिद्ध आहेत. लता मंगेशकर ही त्यांची मोठी बहीण. उषा, आशा, मीना व हृदयनाथ ही भावंडे आणि दीनानाथ हे वडील. या कुटुंबातील आशा भोसले यांचे वयाच्या 92 व्या वर्षी रविवारी, 12 एप्रिल 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण संगीतविश्वात शोककळा पसरली. प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना शनिवारी (दि.11) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या शरीरातील अनेक अवयव निकामी झाले होते. निधनाच्या काही तासांपूर्वीच त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची नात जनाई भोसले हिने सोशल मीडियावर त्या उपचार घेत असल्याचे सांगत गोपनीयता राखण्याची विनंती केली होती. आशा भोसले यांच्या निधनाने मंगेशकर कुटुंबातील एक सूर हरपला आहे. भारतीय संगीतसृष्टीतील एक प्रभावशाली आणि बहुआयामी आवाज, अशी त्यांची ओळख होती. सात दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी हिंदीसह अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये हजारो गाणी ध्वनिमुद्रित केली. त्यांच्या आवाजाने हिंदी चित्रपटसंगीताला नवी ओळख दिली. पिया तू अब तो आजा (कारवाँ), दम मारो दम (हरे रामा हरे कृष्णा), ये मेरा दिल (डॉन), इन आँखों की मस्ती (उमराव जान) आणि मेरा कुछ सामान (इजाजत) इत्यादी गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यांची मराठी चित्रपटांतील गाणी लोकप्रिय आहेत. यात गोमू संगतीनं, जांभूळ पिकल्या झाडाखाली, रूपेरी वाळूत, या रावजी बसा भाऊजी, मनमोहना तू राजा स्वप्नातला, मेंदीच्या पानावर आणि दिस जातील दिस येतील यांसारख्या सदाबहार गाण्यांचा समावेश आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यात प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराचाही समावेश आहे. त्यांच्या कारकिर्दीने भारतीय संगीताचा एक सुवर्णकाळ घडवला. वयाच्या दहाव्या वर्षी आशा भोसलेंनी गाणे गायले होते. त्यांची 12 हजारांहून अधिक गाणी ध्वनिमुद्रित आहेत. भारतीय संगीतविश्वात अशी काही नावे आहेत, जी केवळ कलाकारच नव्हे, तर एका युगाची ओळख बनतात आणि त्यांपैकीच एक म्हणजे आशा भोसले. या गायिकेने अगदी लहान वयातच आपल्या गायन कारकिर्दीला सुरुवात केली आणि केवळ आपल्या आवाजाने पिढ्यान्पिढ्या लोकांना मोहित केले नाही, तर प्रत्येक युगातील नवीन शैलींशी जुळवून घेत, खरा कलाकार काळाबरोबरच प्रगल्भ होत जातो, हे सिद्ध केले. आशा भोसले यांनी 20 वेगवेगळ्या भाषांमधील गाण्यांना आपला आवाज दिला आहे. या यादीत हिंदी, मराठी, पंजाबी, तामीळ, इंग्रजी, आसामी, उर्दू, तेलुगू, बंगाली, गुजराती, रशियन, नेपाळी आणि मल्याळम यांसारख्या भाषांचा समावेश आहे. आशा भोसले यांचा प्रवास अत्यंत संघर्षाचा होता. त्यांना वेदना सहन कराव्या लागल्या आणि कठीण निर्णयही घ्यावे लागले. मंगेशकर कुटुंबीय रूढी-परंपरा जपणारे होते. आशा भोसले यांनी लहान वयातच पळून जाऊन गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केले. हे लग्न मंगेशकर कुटुंबीयांना विशेषत: लता मंगेशकर यांना मान्य नव्हते. आशा भोसले यांना सासरी कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलांना एकट्याने वाढवण्याचा निश्चय केला. त्यांचे दुःख तिथेच संपले नाही. त्यांच्या मुलीने आत्महत्या केली. मुलाचा मृत्यू झाला. आशा भोसले यांचा जन्म 1933 मध्ये महाराष्ट्रातील सांगलीत झाला. त्या अवघ्या नऊ वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर कुटुंबाची जबाबदारी अचानक त्यांच्या खांद्यावर आली. मोठी बहीण लता मंगेशकर यांच्यासोबत त्यांनी लहान वयातच गाण्यास सुरुवात केली आणि कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला. येथेच त्यांच्या संघर्षाची सुरुवात झाली. त्यामुळे त्या अधिक कणखर बनल्या. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी आशा भोसले यांनी कुटुंबाचा विरोध झुगारून आपल्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठे असलेल्या गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केले. त्या घरातून पळून गेल्या. मात्र, लग्नानंतरचे त्यांचे आयुष्य सोपे नव्हते. सासरच्या मंडळींकडून त्यांना वाईट वागणूक मिळाली आणि त्या कौटुंबिक हिंसाचाराच्याही बळी ठरल्या. परिस्थिती बिकट झाली. गरोदरपणातच त्यांना पतीचे घर सोडून मुलांसह माहेरी परतावे लागले. यानंतर त्या पतीपासून विभक्त झाल्या आणि एकट्यानेच मुलांची काळजी घेऊ लागल्या. पहिले लग्न संपुष्टात आल्यानंतर जवळपास दोन दशकांनी आशा भोसले यांनी प्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन यांच्याशी दुसरे लग्न केले. या जोडीने संगीतविश्वाला अनेक अविस्मरणीय गाणी दिली. मात्र, हे नाते फार काळ टिकले नाही. आर. डी. बर्मन यांच्या निधनाने त्या पुन्हा एकदा एकट्या पडल्या. वैयक्तिक अडचणी असूनही, आशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दीत कधीही मागे वळून पाहिले नाही आणि आपल्या आवाजाने पिढ्यान्पिढ्या लोकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या पहिल्या पतीपासून त्यांना हेमंत, वर्षा आणि आनंद अशी तीन मुले होती. मात्र, आयुष्याने त्यांना एक मोठा धक्का दिला. त्यांचा मोठा मुलगा, हेमंत भोसले 2015 मध्ये कर्करोगाने मरण पावला, तर त्यांची मुलगी वर्षा भोसले हिने 2012 मध्ये आत्महत्या केली. या घटनांमुळे त्या खूप खचून गेल्या, पण त्यांनी स्वतःला सावरले आणि आपले काम सुरू ठेवले. त्यांचा धाकटा मुलगा आनंद भोसले हा त्यांच्यासोबत नेहमीच राहत असे. आशा भोसले या वयातही रिअॅलिटी शोमध्ये सक्रिय होत्या. गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती खालावत होती. यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच त्यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. भारतीयांना हवा असलेला एक सूर हरपला…
A song from the Mangeshkar family
इतकेच नव्हे, तर मद्याच्या धुंदीत पोलिसांच्याच अंगचटीला जाणार्या या तरुणींनी नंतर त्यांच्यावरच अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल…
सुख, शांतता, समाधान जिथे मिळते त्याला धर्म म्हणतात. धारण केला जातो तो म्हणजे धर्म. भारतीय…
स्त्रीने तिचा स्वाभिमान जपायला हवा...आणि तुम्हाला स्वतःचा अभिमानही वाटला पाहिजे...स्त्री ही अशी शक्ती आहे.संपूर्ण जगाला…
यशाची नशा आणि दिखावा मनुष्याला न्यायालयाची पायरी चढायला भाग पाडतात. हे लोभाचे चक्र आहे, ज्यामुळे…
आयुष्यातील उलाघाली, स्थित्यंतरे, जगण्याची विविध व्यवधाने अनुभवत असताना कवी नेहमी त्याच्या कवितेमधून डोकावत असतो. किंबहुना…
या जगात आपण अनेक गोष्टी शिकतो अनुभवतो कमावतो, पण तरीही मनात एक पोकळी राहते. मनुष्य…