गावाकडचं बालपण म्हणजे केवळ मातीचा सुगंध, झाडांची सावली किंवा आकाशभर पसरलेली शांतता नव्हे तर त्या छोट्या छोट्या कृतींमध्ये दडलेली माया, जिव्हाळा आणि काळजीही असते. त्यातलीच एक अविस्मरणीय गोष्ट म्हणजे-दगडावर बसवून घातली गेलेली अंघोळ..!!
आज शहरातल्या बाथरूममध्ये उभं राहून शॉवरखाली घेतलेली अंघोळ कितीही सोयीची वाटतं असली, तरीही त्या दगडावर बसून घेतलेल्या अंघोळीची ऊब आणि आनंद काही वेगळाच होता.
गावाकडे असलो की दररोज सकाळी आईचा एक ठरलेला कार्यक्रम असायचा. मागच्या दारी, नारळाच्या झाडाला खेटून त्या गुळगुळीत, सपाट आणि बरोबर सकाळचे ऊन पडेल अशा जागेवर ठेवलेल्या दगडावर आम्हाला बसवायचं. सुरुवातीला पाण्याचा पहिला तांब्या अंगावर पडला की अंग शहारून जायचं. आई, थंड आहे! असं म्हणत आम्ही कुरकुर करायचो आणि आई हसत म्हणायची, अरे दोन मिनिटांत गरम वाटेल बघ
कधी नुसतेच तवलीत भरलेले शिकेकाईचे तपकिरी पाणी त्याचा तो वेगळाच कसातरी; पण हायसा वाटणारा वास, काहीतरी दिलेला आमच्याही हातात मावत नसायचा एवढा मोठा असलेला लाईफबॉयचा साबण तर कधी फुलपात्रात दिलेला पिठाचा साबण.. त्या पिठाची खडबडीत अशी अंगाला होणारी फिलिंग.. सगळं कसं एकदम भारी होतं आणि त्यात आईचे हात- ते तर जादुईच वाटायचे. कुठून घरातल्या बायांनी अंग घासायला दगड सापडून आणलेले असायचे देव जाणे. बाबांच्या पाठीसाठी वेगळा.. तो जास्त खडबडीत तर आम्हा मुलांसाठी चांगला गुळगुळीत असे किमान दोन दगड तर तेथे हमखास दिसायचे.
इकडे आमचे हातपाय घासतांना आईच्या हातातली ताकद आणि मायेचा स्पर्श दोन्हीही एकत्र जाणवायचे. पाठ घासताना थोडं हळू! म्हणायचो, पण आतून मात्र तेच आवडायचं..
सुट्ट्यामध्ये सर्व भावंडं गावी आजीकडे जमलो की मग अंघोळीचा एक वेगळाच उत्सव असायचा. मोठ्या दादांच्या गळ्यातली माळ आम्हाला मोहून टाकायची.
आजीचा वेळ निवांत तिची पद्धत सवडीची आणि तिची माया तर अफाट..! पाठमोरं उभं केलं की तिचा एक खास कार्यक्रम असायचा-गुडघ्याच्या मागच्या बाजूला दगडाने घासणं. त्या जागी कितीतरी मळ साचलेला असायचा आणि ती जेव्हा तो हळूहळू काढायची, तेव्हा मळाच्या वळकुट्या बाहेर पडायच्या. आम्हाला थोडंसं लाजल्यासारखं वाटायचं, पण आजीच्या चेहर्यावर समाधान असायचं-आता झालं स्वच्छ!
पाठ घासण्याचा भाग तर अजूनच खास मोठी आत्या जेव्हा पाठ घासायला यायची, तेव्हा तिच्या त्या पाठ घासण्याचा वेगानुसार तिच्या हातातल्या बांगड्यांची होणारी छन.. छन.. मनाला मोहून टाकायची. तो बांगड्यांचा नाद, घासून झालेल्या पाठीवर होणारा पाण्याचा हलका स्पर्श आणि अंगावर फिरणार्या तिच्या हातांची लय, हे सगळं मिळून जणू एखादं मंत्रमुग्ध करणारं संगीत तयार व्हायचं. आम्ही गुपचूप खाली मान घालून, डोळे मिटून बसायचो आणि त्या संगीताच्या पार्श्वभूमीवर चालणारा पाठ घासण्याचा कार्यक्रम मनापासून एन्जॉय करत रहायचो. त्या क्षणी वेळ जणू थांबून जायची. आम्ही आमच्याच अंघोळीच्या पाण्यावर तरारलेली आळूची पाने पाहत बसायचो.
मिलिटरीमध्ये असलेले रावसाहेब तात्या सुट्टीवर गावी आले की घरात सणासारखंच वातावरण व्हायचं. काकाही सुट्टी टाकून आम्हाला घरी घेऊन जायचे. आजी एक एक तास तात्यांना अंघोळीच्या दगडावर घेऊन बसायची, जणू वर्षभराची राहून गेलेली त्यांची अंघोळ पूर्ण करायची. आम्ही त्या दोघांच्या बाजूला गराडा घालत रहायचो. त्यांची मिलिटरीची टोपी डोक्यात घालून वावरभर पळत सुटायचो.
घरात लग्नकार्य असले की मग या अंघोळीला तर एक वेगळंच रूप यायचं. घरातल्या लहान मुलांची एक रांगच लागायची.. जणू रेल्वेचे डबेच! एक अंघोळ संपली की दुसरा तयार. एक आत्या अंघोळ घालायला, दुसरी अंग पुसायला आणि काकू कपडे घालायला अशी सगळ्यांची टीम तयार असायची. तो गोंधळ, हशा आणि निरागस खोड्या.. त्या क्षणांमध्येच खरा आनंद दडलेला असायचा..
त्या काळात अजून एक गोष्ट खूप वेगळी होती. आजसारखा प्रत्येकासाठी तेव्हा वेगळा टॉवेल वैगरे नसायचा. भल्या पहाटे गुरांना चारा टाकून झाला की सर्वात आधी दिनू तात्यांची अंघोळ व्हायची, त्यांचा टॉवेल शेजारी दोरीवरच वाळत टाकलेला असायचा आणि मग त्याच टॉवेलने पुढच्या व्यक्तीला अंग पुसावं लागायचं. आजच्या दृष्टीने हे विचित्र वाटेल पण तेव्हा त्यात कसलाच कमीपणा नव्हता, तर होती ती फक्त आपुलकी ! आणि गंमत म्हणजे, त्यामुळे कुणाला कुठलेही आजार, इन्फेक्शन झालं असं माझ्या बघण्यात आणि ऐकण्यातही नाही उलट त्या ओलसर वाळलेल्या टॉवेलने अंग पुसण्यातच एक समाधान मिळायचं..! जे आज मिळत नाही..
या सगळ्या आठवणींमध्ये अजून एक खास प्रसंग कायम मनात जिवंत आहे कधी कधी घरातून अचानक फर्मान निघायचं-आज आहाळ धुवायचा आहे!
बस्स! मग आमच्या आनंदाला पारावर उरत नसे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी केलेला तो आहाळ आतून शेवाळाने भरलेला असायचा. आम्ही सगळी छोटी मंडळी त्यात उतरायचो. कुणाच्या हातात उचटणी, कुणाकडे उलतणी, कुणी टोकदार दगड घेऊन तयार व्हायचो – जणू मोठं काम हाती घेतल्यासारखं!
आतल्या भिंतींवरचं शेवाळ खरवडून काढायचं, ते बाहेर फेकायचं कुणाच्या अंगावर पाणी उडायचं, कुणी घसरायचं, कुणी हसायचं -सगळं एकदम जिवंत आणि उत्साही..!
तो आहाळ स्वच्छ झाल्यावर जेव्हा मोटार सुरू व्हायची आणि त्यात पाणी भरायला लागायचं तेव्हा तर आमचा आनंद गगनात मावेनासा व्हायचा. त्या पाण्यात उड्या मारत, खेळत, आम्हाला जणू समुद्रात अंघोळ केल्याचा आनंद मिळायचा. तो दिवसच वेगळा असायचा- रात्री थकवा असायचा, पण त्याहून जास्त समाधान चेहर्यावर दिसायचं ! काम केल्याचा आनंद, आणि खेळल्याचा सुखद थकवा…
आज मागे वळून पाहिलं की जाणवतं-त्या अंघोळी फक्त अंग धुण्यासाठी नव्हत्यातर त्या आयुष्य घडवणार्या होत्या. त्या दगडावर, त्या आहाळात, त्या टॉवेलमध्ये आम्ही फक्त स्वच्छ होत नव्हतो, तर आम्ही जगायला शिकत होतो.
आणि म्हणूनच त्या साध्या, छोट्या, पण मनात खोलवर रुजलेल्या आठवणी- आजही आयुष्याला एक वेगळीच उब देत राहतात.. या अशा…
A stone bath of memories