गोंदेश्वर मंदिर

महाराष्ट्रातील सर्वोत्तम पंचायतन मंदिर हे गोंदेश्वर असून, सिन्नरमधील पुरातन भूमिज शैली कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना म्हणून ते सुप्रसिद्ध आहे. आजपर्यंत लाखो लोकांनी हे मंदिर श्रद्धेने काहींनी अभ्यासाच्या दृष्टीने पाहिलेले आहे. परंतु प्रा. जावेद शेख सरांनी हा सर्वांच्या श्रद्धेचा आणि जिव्हाळ्याचा विषय अतिशय बारकाव्याने अभ्यास करून या शैवपंचायतन मंदिरावर प्रकाशझोत टाकला.
सिन्नरचा ऐतिहासिक शहर म्हणून आपल्या ग्रंथातून केलेला उल्लेख पुराव्यासह मांडला. तसेच शैवपंचायतन गोंदेश्वर मंदिर बांधणारा गोविंद राजा, त्याचे शिल्प आणि ती शिल्प शोधण्याची सर्व गृहीतके तपासून मंदिराच्या सभामंडपात असलेला गोविंद राज्याची शिल्प शोधून एक आगळीवेगळी दृष्टी अभ्यासकांना दिली.
मंदिराच्या आराखड्यापासून मंदिराची रचना, मंदिराचे गर्भगृह, अंतराळ, मंडप, मंदिराचे शिखर व गोंदेश्वर मंदिराच्या भोवतालची मंदिरातील शिल्पे तसेच लौकिक जीवनातील शिल्पे, स्त्रीशिल्पे, प्राणीशिल्पे, कामशिल्पे, तसेच प्रत्येक शिल्पाच्या हातातील आयुधं, त्यांचा अर्थ, शिल्पांची उभी राहण्याची पद्धत तसेच ब्राह्मी शिल्प, महिषासुरमर्दिनी शिल्प, त्रिविक्रम शिल्प, नृसिंह अवतार शिल्प, चामुंडाशिल्प, समुद्रमंथन शिल्प, गंगा व यमुना शिल्प, तसेच अनेक लौकिक शिल्पे आणि रामायण-महाभारतातील वेगवेगळे प्रसंग वाली-सुग्रीव युद्ध, रामायण-वाली युद्ध, धनुर्धारी राम-लक्ष्मण, शंकर-पार्वती, द्रोणागिरी पर्वत घेऊन जाताना हनुमान, अशोक वाटिकेतील सीतामाता, नंदी मंडपातील व त्याच्या बाजूची सर्व शिल्पे शिवाय त्या काळातील प्रचलित अलंकार, आभूषणे, वस्तू, त्रिशूल, डमरू आदी अनेक शिल्प अतिशय अभ्यासपूर्वक मांडलेली आहेत.
महानुभाव पंथाचे श्री चक्रधर स्वामींचे वास्तव्य सिन्नरमध्ये दहा महिने होते. या कालावधित त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलेल्या लीळा आणि म्हाईंभटांनी आपल्या लीळाचरित्र ग्रंथातून केलेलं वर्णन याचा आधार घेत समकालीन पुराव्याचा बारकाईने अभ्यास करून तसेच संगमनेर ताम्रपट, कळस बुद्रुक ताम्रपट, वसई ताम्रपट, आश्वी ताम्रपट अशा अनेक ताम्रपटांचा दाखला देत तसेच इतर संदर्भग्रंथांचा अभ्यास करून वास्तववजन्य पुरावे सादर करून गोंदेश्वर मंदिरावर निश्चितच आशादाई प्रकाशझोत टाकला. त्यातून अनेकांच्या श्रद्धा द्विगुणित होतील तर अनेकांना लिहिण्याची उर्मी नक्कीच मिळेल. आपल्या सिन्नरकरांची अस्मिता असलेल्या गोंदेश्वर मंदिराबद्दल डोळसपणे चर्चा होऊन आपल्याला मंदिर पाहण्यासाठी नवी दृष्टी मिळेल. प्राध्यापक जावेद शेख सरांनी गोंदेश्वर मंदिर दर्शन या ग्रंथात बांधकामासंदर्भात आपल्या ग्रंथात भू-परीक्षा, शीलापरीक्षा, दगडांचे विविध प्रकार, पुल्लिंगी दगड, स्त्रीलिंगी दगड, नपुसलिंगी दगड त्याचबरोबर त्यांना घडविणारे कारागीर त्यांची सामाजिकता, त्यांची श्रद्धा यातून समाज जीवन देखील साधलेलं आहे. तसेच मंदिर निर्माण करताना मोजमापाची मानकेदेखील दिलेली आहेत. त्यामध्ये यव, अंगुल, तालमापन पद्धत त्याचेदेखील सविस्तर वर्णन आहे.
गोंदेश्वर मंदिर हे आपण कितीही वेळा पाहिले, कसेही पाहिले तरी मन काही भरतच नाही. ते दक्षिणेकडून बघा, पूर्वेकडून किंवा उत्तरेच्या बाजूने बघा त्याची वेगवेगळी रूपे आपल्याला दिसतील. एवढेच काय पहाटेच्या अंधुक प्रकाशात तांबड फुटण्याच्या वेळी जर मंदिर बघितलं तर आपल्याला या मंदिराची दिव्यता, भव्यता आणि त्याचे आकार याचं दर्शन होऊन मनभक्ती भावाने भरून जाईल.
प्रा. जावेद शेख सरांनी मंदिराचे दर्शन दर्शनाची सुरुवात कोणत्या बाजूने करावी, मंदिरात प्रवेश कशा पद्धतीने करावा, मंदिर कसे बघावे याची सखोल माहिती दिली असून एकेक शिल्प पाहताना आपण गोंदेश्वर मंदिर हे पुस्तक सोबत घेऊन प्रवेश केला आणि संपूर्ण शिल्प बघितले तर याचि देही याचि डोळा अनुभव आल्यासारखे होईल.

Gondeshwar Temple

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *