मनमाडच्या जवानाचा कार अपघातात मुलासह मृत्यू

जेजुरीला जात असताना काळाचा घाला

मनमाड: प्रतिनिधी
गेल्या दहा दिवसांपूर्वी आपल्या भावाच्या वर्षश्राद्धासाठी सुट्टीवर घरी आलेल्या लष्करी जवानाचा आपल्या एकुलत्या एक मुलासह कार अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी पहाटे नगरजवळ घडली.
बाजीराव त्र्यंबक मिस्कर(38),साई (12) हनुमान नगर,मनमाड असे मृत बाप-लेकाचे नाव आहे. मनमाड येथील रहिवाशी आणि भारतीय सैन्य दलात हिस्सार येथे कार्यरत असलेले जवान बाजीराव त्र्यंबक मिस्कर हे भावाच्या वर्षश्राध्दासाठी सुट्टीवर मनमाड येथे आले होते. नुकतेच त्यांच्या मेहुण्याचा विवाह झाला होता. म्हणून सर्व कुटुंब जेजुरी येथे खंडोबाच्या दर्शनासाठी सोमवारी निघणार होते. मात्र जाण्यावरून बाजीराव यास मेहुण्याने विरोध दर्शवला. याचा राग येऊन जवान बाजीराव हा आपल्या मुलासह स्वत:च्या अल्टोकारने रविवारी रात्रीच मनमाड येथून निघाले असल्याची चर्चा आहे. मात्र रस्त्याने जात असतांना सोमवारी पहाटे नगरजवळ अल्टोकार आणि ट्रकचा अपघात झाला.अपघात इतका भयंकर होता की त्यात कारचा चक्काचूर झाल्याने दोघा पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी नागरिकांनी सांगितले आहे. या अपघाताची माहिती घरच्या कुटुंबाला कळताच त्यांनी तातडीने नगरकडे धाव घेतली. या घटनेने शहर परिसरात शोककळा पसरली आहे.दरम्यान मनमिळावू असलेले बाजीराव आणि त्यांचे कुटुंब सर्वांना परिचित होते. ते सुट्टीवर आल्यानंतर सर्व नातेवाईक,मित्रमंडळींना भेटत होते.देवाला जाताना त्यांच्यावर काळाने क्रूर घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगी एक भाऊ,दोन भावजयी असा परिवार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *