एमपीआयडी गुन्ह्यातील दोन फरार आरोपी जेरबंद

लासलगाव : वार्ताहर
आर्थिक फसवणूक आणि ठेवीदारांच्या पैशांचा अपहार केल्याप्रकरणी एमपीआयडी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना लासलगाव पोलिसांनी सोलापूर परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. संजय अभिमान बोराडे (वय 42) आणि जयश्री संजय बोराडे (35, रा. सोहम सिटी, लासलगाव, ता. निफाड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
सुमारे दोन कोटी 32 लाख 59 हजार 500 रुपयांच्या आर्थिक फसवणूकप्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये एमपीआयडी कायद्याच्या कलम 3 व 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलिस अधीक्षक विनला आणि उपविभागीय पोलिस अधिकारी के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होते. पोलिसांनी तांत्रिक माहिती, गोपनीय बातमीदारांचे जाळे आणि मोबाइलच्या तांत्रिक विश्लेषणाआधारे त्यांचा माग काढला. 29 सप्टेंबरला पहाटे साडेपाचच्या सुमारास तपास पथक सोलापूरकडे रवाना झाले. सलग शोधमोहीम राबवून 30 सप्टेंबर रोजी दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या आरोपींना लासलगाव येथे आणून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना दहा दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.

Two absconding accused in MPID case arrested.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *