मुंगसरा शेतकरी मारहाण घटनेचे त्र्यंबकेश्वर परिसरात पडसाद
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
नाशिक तालुक्यातील मुंगसरा येथे शनिवारी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रिंगरोडला जमीन मोजणी करताना शेतकर्यांना मारहाण झाली. त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसरातील शेतकर्यांच्या भावना या घटनेने तीव्र झाल्या आहेत. त्यामध्ये त्र्यंबकेश्वर शहरातील विस्थापित दुकानदारांनादेखील आपल्यावर शासनाने अन्याय केल्याची भावना सतावत आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर रुंदीकरणाच्या नावाने केलेली कारवाई, घोटी-त्र्यंबक रस्त्यावर बाधित शेतकर्यांबाबत असलेली भूमिका या सर्वांची आता उजळणी होत आहे.
त्र्यंबकेश्वर येथे शिवनेरी धर्मशाळा पाडली, त्यानंतर देवस्थान ट्रस्टचे भाडेकरू दुकानदार अवघ्या तीन दिवसांची नोटीस देऊन काढण्यात आले. या दोन्ही प्रकरणांत शासनाने अधिकाराचा आणि बळाचा वापर केला आहे. नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरदेखील अनेकांना बेरोजगार केले आहे. यापुढे त्र्यंबकेश्वर शहरात आणखी काही उलथापालथ होऊ घातली आहे. त्यामध्ये येथील संपूर्ण घडी विस्कटणार आहे. वास्तविक पाहता, यासाठी पुरेसा वेळ हाती होता. तीन वर्षांपासून तयारी सुरू केली असती आणि विस्थापितांना बाजारपेठ निर्माण करून दिली असती तर अशी वेळ आली नसती.
देवाच्या दारात फुले विकणारे पारंपरिक व्यावसायिक हटवण्यात आले आहेत. इतिहास काळापासून देवासाठी फुले मिळावीत म्हणून जमिनींचे वतन दिलेले असायचे. येथे फूल विक्री अवैध ठरवली आहे. आता तर पन्नास-शंभर वर्षांपासून असलेले फूलविक्रेते हद्दपार केले आहेत. पुनर्वसन होईल तेव्हा होईल तोपर्यंत काय करायचे याचा पर्याय ठेवलेला नाही. देवस्थान ट्रस्टच्या भाडेकरूंना अतिक्रमणधारक असे संबोधण्यात आले. त्र्यंबकेश्वर येथील घाट रस्ते आणि डीपी रस्त्यांबाबत चर्चेचे गुर्हाळ लावले. टाउनशिपसारखे पर्याय पुढे केले. त्यानंतर थेट अवॉर्ड जाहीर केले आणि शेतकर्यांना प्रतिगुंठा 25 हजार रुपये देणार असल्याची नोटीस देण्यात आली. त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसरात एका गुंठ्याला 25 ते 30 लाख रुपये भाव मिळत आहे. मात्र, सिंहस्थासाठी आणि इतर प्रकल्पांसाठी जमिनी घेताना शासन गुंठ्याला 25 ते 30 हजार रुपये देत आहे. शेतकर्यांच्या जमिनीला कवडीमोल किंमत देत असलेल्या शासनाविरुद्ध संतप्त भावना निर्माण झाली आहे.शेतकरी शेतजमीन मूळ मालकाची अशी हेळसांड होत असताना भूमाफियांकडे मात्र डोळेझाक होत आहेत. सिंहस्थ पार्किंगच्या आरक्षित जागांवर बांधकामे उभी राहिली आहेत. आरक्षण उठवण्याचे ठराव होत आहेत. डोंगरालगत असलेल्या जमिनी बिगरशेती करण्याचे पत्रक राजपत्रात प्रसिद्ध होत आहेत, याबाबत तीव्र संताप व्यक्त
होत आहे.
उपजाऊ शेतजमिनी प्रकल्पांसाठी
शेती करण्यासाठी असलेल्या उपजाऊ जमिनी प्रकल्पांसाठी घेत आहेत. सपाट भूक्षेत्र हिरव्या पट्ट्यात असल्याने त्यांना शासन किंमत देत नाही. डोंगरदर्या पिवळ्या पट्ट्यात घेऊन त्यांचे मूल्य वाढवण्यात आले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात भराव टाकणे, डोंगर टेकडी तोडणे, वृक्षतोड करणे व नदी-नाले बुजवणे अथवा त्यांचे प्रवाह बदलण्यात येत आहेत. पर्यावरणीय साखळी धोक्यात आणली जात आहे. याकडे डोळेझाक करणारे शासन सर्वसामान्य शेतकर्यांच्या मागे लागले आहे. त्यामुळे मुंगसरा येथील घटनेचे तीव्र पडसाद त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसरात उमटले आहेत. शेतकर्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी त्र्यंबकवासीय पुढे सरसावत आहेत.
Anger among affected farmers, displaced shopkeepers