लहान बाळे खरंच सुरक्षित आहेत का?

बालकांचे शोषण हे जगभरात सातत्यपूर्ण चालूच असते. आपण व आपली बालके सुरक्षित वाढली, त्यांच्यासोबत एकही भयंकर शोषणाची घटना झाली नसेल तर आपण सुटलो, या आविर्भावात आपण जगतो; परंतु वास्तव भयानक भयावह आहे. आपण ते पाहू, ऐकू शकत नाही. मात्र, हीन दर्जाच्या लोकांना ते चौकडीवर, भिंतीआड चघळायलादेखील आवडते हेही कटू सत्यच.
आपल्या सगळ्यांनाच आठवत असेल, आजपर्यंत आपल्या लहानपणापासून म्हणजे फक्त पन्नास वर्षांचा काळ बघितला तरी एकही दिवस असा गेलेला नाही की, वर्तमानपत्रात लहान मुलींवर अत्याचाराची बातमी वाचली नाही. हे वाचून वाचून आपली मनं मुर्दाड झालीत. काय करू शकलो आपण गेल्या पन्नास वर्षांतील दररोज झालेल्या बलात्कारी पीडित बालकांसाठी? आजवर किती गुन्हेगार त्वरित फाशीवर लटकले? हे लिहितानासुद्धा माझा हात थरथरतोय. काही वर्षांपूर्वी ’मी-टू’ चळवळ
महिलांंनी जागवली होती. कोणती स्त्री मी-टूमधून स्वतःस बाजूला काढू शकत होती. काही महिला बोलल्या. ज्या बोलल्या त्या धैर्यवान! काय झाले बोलून? काही जणी बोलत नाहीत. धैर्य खचलेले असते. मला क्रांती चित्रपटातील नाना पाटेकर यांचा एक डायलॉग सदैव आठवतो, ‘लोग रामायण, महाभारत पढकर नहीं सुधरे तो अखबार पढकर क्या सुधरेंगे?’ अर्थात, याचा अर्थ असा नाही की, माणुसकी पेरण्याचे सगळे प्रयत्न थांबवायचे. आपले कर्तव्य आपण करत राहायचे.
आजूबाजूच्या घरांमध्ये कानोसा घ्यायला गेलात तर हादरून जाल, इतक्या लहान बालकांचे गुदमरलेले हुंकार ऐकायला येतील. जेफ्री एपस्टिन प्रकरण काय दर्शवते? 2025-26 मध्ये बाहेर आलेल्या दस्तावेजांमध्ये लाखो पानांचे पुरावे समोर आले. अल्पवयीन मुलींची भरती, वाहतूक आणि शोषण याचे जाळे व्यवस्थित नेटवर्कद्वारे चालत होते. यात प्रभावशाली लोक, सत्ता आणि पैसा यांचा सहभाग दिसतो. म्हणजेच धोका फक्त ‘गुन्हेगार’ व्यक्तीकडून नाही, तर संपूर्ण सिस्टिम फेल झाली की निर्माण होतो. अशा लोकांकडून न्यायाची अपेक्षा करायची? परिस्थिती फार अस्वस्थ करणारी आहे. दरवर्षी हजारो लहान मुले  Trafficking and exploitation  जाळ्यात अडकतात. गरिबी, शिक्षणाचा अभाव यामुळे अनेक केस रिपोर्टच होत नाहीत. त्या बालकांचे काय? अलीकडील भीषण उदाहरण आठवते का? उत्तर प्रदेशातील एका प्रकरणात 33 पेक्षा जास्त मुलांवर अत्याचार करून त्यांचे व्हिडिओ विकले गेले. न्यायालयाने याला ‘rarest of rare’ म्हटले बस्स! पुढे काय? बर्‍याचदा धोका घरच्या किंवा ओळखीच्या लोकांकडूनही असू शकतो, हे सर्वांत जास्त भयावह वास्तव आहे. हे आपण दुर्लक्षित का करतो?
खरी समस्या कुठे आहे? ही फक्त गुन्हेगारीची समस्या नाही, तर सिस्टिम फेल्युअर (उशिरा न्याय, कमी शिक्षा), समाजातील मौन (लाज, भीती, बदनामी), डिजिटल धोके (ऑनलाइन), ओळखीच्या लोकांवर अंधविश्वास अशा अनेक कारणांमुळे गुन्हेगार सुरक्षित राहतात आणि निष्पाप बळी जातात.
आरोग्यसेवेत एक महत्त्वाचा नियम आहे. कुठल्याही आजारावर इलाज करण्याआधी आजार होऊ नये यासाठी आधीपासून उपाययोजना केली पाहिजे. अगदी महाभारतातदेखील रूरुपकथेतून मांडले आहे की, समाजात, गल्लीबोळात आणि अगदी घराघरांतसुद्धा बालके सुरक्षित नाहीत. पुराण ते वर्तमान एक समान धागा आहे. पुतना ‘मायेसारखी’ येते आणि स्तन पाजवून बालकांना ‘विष’ देते. गुन्हेगार ‘ओळखीचे, विश्वासू, प्रेमळ’ चेहर्‍याने येतात आणि मुलांना फसवतात, याचे किती दाखले हवेत? कथा कितीही बदलल्या, पण पद्धती तशाच आहेत. यातून हेच शिकायला हवे की, अजाण बालकांना एकटे सोडायला नको. धोका कधीही कुठेही होऊ शकतो, मुलांना प्रतिकार करायला शिकवायला हवे.
‘घार हिंडते आकाशी,
चित्त तिचे पिलापाशी’
घार आकाशात खूप उंचावर फिरत असली किंवा भक्ष्य शोधत असली, तरी तिचे मन (चित्त) तिच्या पिल्लांच्या सुरक्षेकडे असते. आई कामासाठी किंवा इतर कारणांसाठी घरापासून दूर असली, तरी तिचे मन आपल्या कुटुंबावर, मुलांवर किंवा प्रियजनांवरच असते. आई कितीही कामात व्यस्त असली, तरी तिची काळजी मुलांकडेच असते आणि ज्या घरात आईच अजाण बालिकेला वडिलांची इच्छातृप्तीसाठी देत असेल तर? जगात भयंकर वास्तव अस्तित्वात असते.कसे कसे जगायाचे जगायाचे आहे मला…हसतच वेड्या जीवा लावायचा आहे दिवा! का म्हणत असावेत आरती प्रभू हे काव्य?
का ग्रेस म्हटले होते, ‘ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता.’ आयुष्याची उत्तरंच मुळी गूढतेत असतात. काही वर्षांपूर्वी दिल्लीत भयंकर घटना घडली होती. बस ड्रायव्हरने बालिकेवर स्कूलबसमध्ये बलात्कार केला होता. त्यावेळी आम्ही (आमची शाळा व नाशिक पोलीस विभाग, डॉ. रवींद्रकुमार सिंघल, आयुक्त, नाशिक) व विनिता सिंघल (बाल सुरक्षा विभागप्रमुख) यांच्या सहकार्यातून तो कार्यक्रम
आयोजित केला होता. सजग पालक -चालक असा एक कार्यक्रम नाशिकमधील सर्व शालेय वाहनचालक व पालकांंना एकत्रित निमंत्रित करून बालकांच्या सुरक्षेचे नियम सांगणे, अशा प्रकारच्या गुन्हेगारीला शिक्षेची कठीणता सांगणे आणि समुपदेशन करणे, हा आमचा हेतू होता. वर्तमानपत्रांत बातमी देऊन, वैयक्तिक निमंत्रणे देऊनदेखील पन्नासपेक्षा जास्त लोक कार्यक्रमास आले नव्हते. त्यावेळी मी सर्व पालक व ड्रायव्हरसाठी ‘सजग पालक-चालक’ हे पुस्तकही लिहून त्याच्या हजारो कॉपी पालक व चालकांना शाळाशाळांतून भेट दिल्या होत्या की, जेणेकरून त्यांनी कायदा व सुरक्षेचे नियम वाचून वागावे. सजग व्हावे. पण कितींनी ते वाचले असेल?
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे
कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून
जगतात येथे कुणी मनात कुजून
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे…
परिस्थिती सदासर्वकाळ धोकादायक असते. आपणच सजग असले पाहिजे. पुतनेपासून एपस्टिनपर्यंत आणि आजही प्रत्येक गाव, गल्लीबोळ नसरापूर आहे. काळ बदलला, चेहरे बदलले, पण बालकांवरचे संकट कायम आहे. प्रश्न ‘बालके सुरक्षित आहे का?’ हा नाही, प्रश्न आहे, आपण पालक म्हणून किती सजग आहोत?

Are young babies really safe?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *