अल्पवयीन मुलीची बेकायदेशीर प्रसूतीसह बालक विक्रीचा प्रयत्न

मालेगावला डॉ. डांगेंसह चार डॉक्टरांना अटक

मालेगाव : प्रतिनिधी
शहरातील सटाणा नाका परिसरातील एका खासगी रुग्णालयात अल्पवयीन मुलीची बेकायदेशीररीत्या सिझेरियन प्रसूती करून नवजात बालक विक्रीच्या उद्देशाने ठेवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सामान्य रुग्णालयाचे माजी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. किशोर डांगे यांच्यासह चार डॉक्टरांना अटक केली आहे. या गुन्ह्यात एकूण 11 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पोक्सो आणि किशोर न्याय कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामान्य रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जितेंद्र डोलारे यांना एका सामाजिक कार्यकर्त्याकडून मिळालेल्या माहितीवरून त्यांनी चौकशी केली असता हा प्रकार समोर आला. त्यांच्या फिर्यादीवरून कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित मुलीला कन्यारत्न प्राप्त झाले होते. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार अल्पवयीन मुलीला गर्भवती करणार्‍या अज्ञात व्यक्तीसह संजय गवळी, प्रवीण देशमुख, नंदिनी गवळी, डॉ. किशोर डांगे, डॉ. किशोरी डांगे, डॉ. अनुजा शेवाळे, डॉ. प्रीती जाधव, नवसिन रफिक शेख, मोहम्मद फईम मोहम्मद शफिक आणि सार्थक प्रवीण जगताप यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये कारवाई केली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, 3 जून रोजी सकाळी अल्पवयीन मुलीची सिझेरियन प्रसूती केली. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही रुग्णालय प्रशासनाने पोलीस किवा आरोग्य विभागाला माहिती न देता ती जाणीवपूर्वक लपवून ठेवली. प्रसूतीनंतर अल्पवयीन मुलीची ओळख लपविण्यासाठी तिला अज्ञातस्थळी हलविण्यात आले. नवजात बालक विक्रीच्या उद्देशाने ठेवून घेतल्याचा गंभीर आरोप गुन्ह्यात नमूद केला आहे. या प्रकरणी डॉ. किशोर डांगे, डॉ. किशोरी डांगे, डॉ. अनुजा शेवाळे आणि डॉ. प्रीती जाधव यांना अटक केली असून, मालेगाव जिल्हा व सत्र न्यायालयानेे त्यांना 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विजया पवार करीत असून, रुग्णालयातील वैद्यकीय नोंदी, दस्तऐवज आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.

 

Attempted child sale including illegal delivery of minor girl

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *