आस्वाद

समीक्षक व्हा, ट्रोलर नव्हे!

कुंभमेळ्याच्या विकासयज्ञात प्रशासनाला आरसा दाखवताना कौतुकाचीही जोड हवी

– वाहिद बागवान
आजच्या वेगवान डिजिटल क्रांतीने माणसाच्या हातात अवघ्या काही सेकंदांचे जादुई जग दिले आहे. स्मार्टफोनच्या एका क्लिकवर कॅमेरा फिरवायचा, पाश्वर्र्भूमीला एखादे ट्रेंडिंग किंवा उपरोधिक गाणे लावायचे, 15 ते 30 सेकंदांचे एक ’रील’ तयार करायचे आणि ते सोशल मीडियावर भिरकावून द्यायचे, हे आजच्या पिढीच्या दिनचर्येचे अविभाज्य अंग बनले आहे. व्ह्यूज, शेअर्स, कमेंट्स आणि लाइक्सच्या आधारे मिळणारी क्षणिक प्रसिद्धी आज अनेकांसाठी यशाचा नवा निकष ठरत आहे. समाजमाध्यमांनी सर्वसामान्य नागरिकांना व्यक्त होण्याचे व्यासपीठ दिले, ही लोकशाहीच्या दृष्टीने नक्कीच जमेची बाजू आहे; परंतु याच सुविधेचा जेव्हा सवंग प्रसिद्धीसाठी आणि अर्धवट माहितीच्या आधारे सनसनाटी निर्माण करण्यासाठी वापर होऊ लागतो, तेव्हा त्याचे अत्यंत घातक परिणाम संपूर्ण समाज आणि प्रशासकीय व्यवस्थेला भोगावे लागतात.

नाशिक सध्या एका ऐतिहासिक आणि भव्य पर्वाच्या उंबरठ्यावर उभे आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला असून, संपूर्ण शहर एका विशाल विकासयज्ञामध्ये रूपांतरित होत आहे. रस्ते रुंदीकरण, उड्डाणपूल, अंतर्गत जोडणी, गोदाघाटांचा कायापालट, साधुग्राम, मलनिस्सारण आणि पाणीपुरवठ्याची अवाढव्य कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहेत. स्वाभाविकच, या कोट्यवधींच्या विकासकामांवर सध्या नाशिककरांसह सोशल मीडियावरील ’कंटेंट क्रिएटर्स’ आणि ’रील बहाद्दरां’ची बारीक नजर लागली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून एक अत्यंत चिंताजनक प्रवाह पाहायला मिळत आहे. एखादा रस्ता खोदला जात असताना, पाईपलाईनचे काम सुरू असताना किंवा काँक्रीटीकरणाच्या तांत्रिक टप्प्यात असताना,घटनेची कोणतीही पूर्वकल्पना किंवा तांत्रिक ज्ञान नसताना,कॅमेरा चालू करून प्रशासनाला थेट आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जाते. बघा महापालिकेचा भोंगळ कारभार!, असा होतोय जनतेच्या पैशांचा चुराडा!, अशा भडक मथळ्यांसह उपरोधिक रील बनवून प्रशासनाला अक्षरशः ट्रोल केले जाते. अशा रील्सना लाखो व्ह्यूज मिळतात, व्हायरल होण्याच्या नादात हजारो नेटकरी कोणतीही खातरजमा न करता प्रशासनाच्या नावाने खडे फोडू लागतात.
येथे एक मूलभूत गोष्ट समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे; प्रशासनाच्या चुकीवर बोट ठेवणे, त्यांना आरसा दाखविणे आणि कामाच्या दर्जाबाबत जाब विचारणे हा प्रत्येक करदात्या नागरिकाचा अधिकार आणि सामूहिक जबाबदारी आहे. सजग नागरिक हाच गतिमान लोकशाहीचा कणा असतो; परंतु ’सजग नागरिकत्व’ आणि ’अल्गोरिदमच्या भुकेपोटी केलेली स्टंटबाजी’ या दोन्हींमध्ये एक अतिशय सूक्ष्म पण महत्त्वाची लक्ष्मणरेषा असते. दुर्दैवाने, व्ह्यूजच्या नादात ही रेषा पुसट होत चालली आहे.
कुठल्याही मोठ्या पायाभूत प्रकल्पाची निर्मिती ही एका रात्रीत होत नसते. रस्त्याचे काम करताना आधी जुना थर काढावा लागतो, भूमिगत जलवाहिन्या व विद्युत तारांचे स्थलांतर करावे लागते, मातीचे परीक्षण व क्युरिंग (पाणी मारणे) यासारख्या शास्त्रीय प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. या दरम्यान नागरिकांना काही काळ वाहतूक कोंडी किंवा धुळीचा सामना करावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे.
मात्र, हा त्रास तात्पुरता असून तो कायमस्वरूपी विकासाचा मार्ग सुकर करण्यासाठी असतो, याचे भान रील बनवताना सोयीस्करपणे डावलले जाते. काम सुरू असतानाच बघा कसा रस्ता उखडलाय अशी रील बनवून अधिकार्‍यांना धारेवर धरणे, हे केवळ प्रशासकीय अधिकार्‍यांचे मनोधैर्य खचवणारे नाही, तर त्यांच्या निर्णयक्षमतेलाही लकवा मारणारे ठरते.
सततच्या ट्रोलिंगमुळे आणि जनक्षोभाच्या आभासी भीतीपोटी अनेकदा अधिकारी दबावाखाली येतात. या दबावामुळे कामांची गती विनाकारण वाढवण्याचा, तात्पुरती मलमपट्टी करण्याचा किंवा नियोजनात नसलेले अवास्तव बदल करण्याचा प्रयत्न होतो. परिणामी, दीर्घकालीन दूरदृष्टीने आखलेले मूळ प्रकल्प भरकटतात आणि अंतिमतः त्याचे नुकसान नाशिककरांनाच सहन करावे लागते. एखादी अर्धवट माहितीची पोस्ट संपूर्ण यंत्रणेची ऊर्जा आणि वेळ फोल स्पष्टीकरणे देण्यात खर्च पाडते.
नाशिक हा आपला सर्वांचा अभिमान आहे. कुंभमेळा हे केवळ प्रशासनाचे काम नसून ते प्रत्येक नाशिककराचे वैभव आहे. अशा वेळी प्रशासनाने केलेल्या चांगल्या आणि वेळेत पूर्ण झालेल्या कामांची दखल घेणे, त्यांचे जाहीर कौतुक करणे हेही तितकेच औदार्याचे लक्षण आहे. नवीन जोड रस्ते वेळेत झाले, नदीपात्रातील अडथळे दूर झाले किंवा स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक सुरळीत झाली, तर कॅमेरा तिकडेही वळला पाहिजे.
प्रशासनाला अंध विरोध करणे जितके चुकीचे, तितकीच त्यांची आंधळी पाठराखण करणेही अयोग्य. नेटकर्‍यांनी ’समीक्षक’ व्हावे, ’ट्रोलर’ नव्हे! जिथे रस्त्याचा दर्जा निकृष्ट असेल, कामात गडबड असेल किंवा विनाकारण काम रखडले असेल, तिथे पुराव्यासह, माहिती अधिकाराच्या आधारे आणि योग्य व्यासपीठावर जरूर आवाज उठवावा; परंतु निव्वळ स्वतःच्या प्रोफाइलचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी, चार लाइक्सच्या लोभापायी शहराच्या विकासप्रक्रियेला वेठीस धरू नये.
कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकला जागतिक स्तरावर एक आदर्श, शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत शहर म्हणून नावारूपाला आणण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. ही संधी साधायची असेल, तर प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिक यांच्यात परस्पर सामंजस्य, सकारात्मक संवाद आणि जबाबदार दृष्टिकोन असणे ही आजच्या घडीची सर्वात मोठी गरज आहे. समाजमाध्यमांचा कॅमेरा हा शहराच्या विकासाला दिशा देणारा मार्गदर्शक ठरावा, कामात खोडा घालणारा उपद्रव नव्हे!

Be a critic, not a troll!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

7 hours ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

7 hours ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

7 hours ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

7 hours ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

7 hours ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

7 hours ago