नाशिक

कला शाखेत करिअरचे उत्तम पर्याय

बारावी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर उभा राहणारा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे करिअरची निवड. बहुतांश वेळा विज्ञान आणि वाणिज्य शाखांबाबतच अधिक चर्चा होत असते; मात्र कला शाखेतही करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, भूगोल, हिंदी, इंग्रजी यांसारख्या विषयांचा अभ्यास करून विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वी कारकीर्द घडवू शकतात.
समाजात, विशेषतः पालकवर्गामध्ये कला शाखेबाबत अनेक गैरसमज आढळतात. त्यामुळे या शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या करिअरच्या नव्या वाटा अनेकदा दुर्लक्षित राहतात. प्रत्यक्षात कला शाखा विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारसरणी, सर्जनशीलता, संवादकौशल्ये, नेतृत्वगुण आणि समाजाविषयीची सखोल समज विकसित करते. ही कौशल्ये आजच्या रोजगार बाजारात अत्यंत महत्त्वाची मानली जातात.
करिअर निवडताना तीन घटक महत्त्वाचे असतात-आवड, क्षमता आणि पात्रता. एखाद्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी त्या क्षेत्राविषयीची आवड, आवश्यक कौशल्ये आणि शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
स्पर्धा परीक्षा व प्रशासकीय सेवा
कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे क्षेत्र अत्यंत व्यापक आहे. बी.ए. नंतर विद्यार्थी यूपीएससी आणि एमपीएससीच्या माध्यमातून आयएएस, आयपीएस, आयएफएस, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक, पीएसआय, एसटीआय, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी यांसारख्या पदांसाठी प्रयत्न करू शकतात. इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल आणि अर्थशास्त्र हे विषय या परीक्षांसाठी उपयुक्त ठरतात.
याशिवाय ग्रामसेवक, तलाठी, वनरक्षक, कृषी सहाय्यक, पोलीस, सैन्यदल, अग्निशमन दल आणि बीएसएफ यांसारख्या क्षेत्रांमध्येही संधी उपलब्ध आहेत.
शिक्षक व प्राध्यापक
अध्यापनाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे क्षेत्र आदर्श आहे. बी.ए. नंतर बी.एड. करून शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करता येते. तसेच पदव्युत्तर शिक्षण आणि यूजीसी-नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालय किंवा विद्यापीठात प्राध्यापक होण्याची संधी मिळते.
व्यवस्थापन आणि कॉर्पोरेट क्षेत्र
बी.ए. नंतर एमबीए करून कॉर्पोरेट क्षेत्रात प्रवेश करता येतो. मानव संसाधन व्यवस्थापन (एचआर), मार्केटिंग, प्रशासन, व्यवसाय विकास आणि प्रकल्प व्यवस्थापन अशा क्षेत्रांत आकर्षक करिअरच्या संधी उपलब्ध आहेत.
कायदा क्षेत्र
कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी कायदा हे एक प्रतिष्ठित आणि संधीपूर्ण क्षेत्र आहे. एलएलबी पदवी प्राप्त करून वकील, कायदेशीर सल्लागार, कॉर्पोरेट वकील, फौजदारी वकील किंवा बौद्धिक संपदा तज्ज्ञ म्हणून काम करता येते.
डिजिटल मार्केटिंग
डिजिटल युगात डिजिटल मार्केटिंग हे सर्वाधिक मागणी असलेले क्षेत्र बनले आहे. सोशल मीडिया मार्केटिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (डएज), ई-मेल मार्केटिंग, कंटेंट मार्केटिंग आणि डिजिटल ब्रँडिंग यामध्ये करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
डेटा विश्लेषण आणि डेटा सायन्स
डेटा सायन्स हे केवळ विज्ञान शाखेपुरते मर्यादित नाही. संगणक, विश्लेषण आणि संशोधनाची आवड असलेले कला शाखेतील विद्यार्थीही डेटा विश्लेषक, व्यवसाय विश्लेषक, मार्केट रिसर्च विश्लेषक किंवा धोरण विश्लेषक म्हणून करिअर घडवू शकतात.
बँकिंग क्षेत्र
बी.ए. पदवीधरांना सार्वजनिक आणि खासगी बँकांमध्ये विविध पदांसाठी संधी उपलब्ध आहेत. आयबीपीएस, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर राष्ट्रीयीकृत बँकांच्या स्पर्धा परीक्षांद्वारे प्रोबेशनरी ऑफिसर, लिपिक आणि इतर प्रशासकीय पदांवर नियुक्ती मिळू शकते.
इव्हेंट मॅनेजमेंट
नियोजन, समन्वय आणि व्यवस्थापन कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांसाठी इव्हेंट मॅनेजमेंट हे आकर्षक क्षेत्र आहे. विवाहसोहळे, कॉर्पोरेट कार्यक्रम, सांस्कृतिक महोत्सव आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांचे नियोजन करून स्वतंत्र व्यवसायही सुरू करता येतो.
सार्वजनिक धोरण आणि प्रशासन
धोरणनिर्मिती, सामाजिक विकास आणि प्रशासनामध्ये रस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे क्षेत्र उपयुक्त आहे. शासन, स्वयंसेवी संस्था, थिंक टँक आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम करण्याच्या संधी येथे उपलब्ध आहेत.
मानसशास्त्र आणि समुपदेशन
मानसिक आरोग्याबाबत वाढती जागरूकता लक्षात घेता मानसशास्त्र आणि समुपदेशन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होत आहेत. समुपदेशक, करिअर मार्गदर्शक, एचआर सल्लागार किंवा मानसिक आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक म्हणून काम करता येते.
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही. विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम, ऑनलाइन कोर्सेस, इंटर्नशिप आणि प्रत्यक्ष अनुभव यांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी आपली कौशल्ये सातत्याने विकसित केली पाहिजेत. कला शाखा ही केवळ पारंपरिक शिक्षणाची शाखा नसून ती विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवा, शिक्षण, व्यवस्थापन, कायदा, बँकिंग, डिजिटल क्षेत्र आणि सामाजिक विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी करिअर घडवण्याची संधी उपलब्ध करून देते.
म्हणूनच, योग्य नियोजन, मेहनत आणि कौशल्यांच्या बळावर कला शाखेतील विद्यार्थीही उज्ज्वल आणि यशस्वी भविष्य घडवू
शकतात.

Best career options in the arts

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

5 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

5 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

5 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

5 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

5 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

6 hours ago