आटपाटनगरात एक सधन प्रतिष्ठित कुटुंब राहत होते. कुटुंबप्रमुखांची सार्‍या समाजात प्रतिष्ठा होती. त्यांच्या तत्त्वनिष्ठेचे व दिलदारपणाच्या चर्चा होत्या. त्यांच्याच गावात एक गरीब माणूस राहत होता. त्याला या सधन व्यक्तीचा मोठा हेवा वाटत असे. मी या गावात अनेक वर्षांपासून राहत असूनही माझ्यापेक्षा याची प्रतिष्ठा अधिक कशी, असा विचार तो करत असे. त्याने हळूहळू या सधन व्यक्तीशी मैत्री वाढवली. त्याच्या घरात प्रवेश मिळवला. त्याच्याबरोबर भागीदारीत व्यवसाय सुरू केला. सधन व्यक्तीच्या प्रतिष्ठेमुळे व्यवसाय वाढला. पुढे त्या सधन व्यक्तीचे निधन झाले. त्याचा मुलगा आता व्यवसाय वाढवू लागला. या स्वार्थी मित्राचीही प्रतिष्ठा व पैसा वाढला होता. त्याने आता ज्याच्या आधारावर आपण मोठे झालो त्याच्या मुलाच्या वाटेत काटे पसरायला सुरुवात केला. एके दिवशी त्याने आपली सगळी प्रतिष्ठा पणाला लावून त्या मित्राच्या नोकरचाकरांना मोठे पैसे देऊन आपल्याकडे वळवले व त्याचा व्यवसाय बुडेल यासाठी सर्वस्व पणाला लावले. या कालावधीत या सधन व्यक्तीच्या मुलाचा सख्खा भाऊही दुरावला. तोही मोठा होता. या स्वार्थी व्यक्तीने मांडलेला स्वार्थाचा बाजार आणि मैत्रीतला विश्वासघात पाहून अखेर दुरावलेले भाऊ एकत्र आले. त्याचा समाजात संतोष जाहला.
ही कथा या देशात अनेक भागांत घडलेली आहे. प्रत्येक कुटुंबात कधीकधी एखादा मुलगा स्वार्थी मित्रांमुळे गोत्यात येतो. काही मित्रांना घरी आणायचे नाही, अशी शिकवण दिली जाते ती याचमुळे. तर आपल्या राज्यात ठाकरे कुटुंबाच्या बाबतीत ही कथा घडली. भाजपाने त्यांचा पद्धतशीर वापर करून नंतर त्यांनाच संपवायचा घाट घातला. त्यानंतर आता पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेल्यानंतर राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे एकत्र आले आहेत. त्यांची युती झाली आहे. राज्यात अनेक वर्षांपासून हे दोघे एकत्र येणार असल्याची चर्चा अखेर फळाला आली आहे. त्यावर भाजपाचे सध्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी विनोदी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की जणू युक्रेन-रशिया एकत्र आले. त्यांना कोणीतरी ही आठवण करून दिली पाहिजे ते तर तेव्हाच घडले होते, जेव्हा अजित पवार त्यांच्याबरोबर आले होते.
शिवसेना व मनसे एकत्र आल्याच्या आनंदापेक्षा दोन भाऊ एकत्र आल्याचा आनंद राज्यात मोठा आहे. एक भाऊ संकटात असताना दुसरा भाऊ धावून आला, या महाराष्ट्रातील संस्कारांचे जिवंत रूप दिसले म्हणून लोक आनंदात आहेत. एकाधिकारशाहीला टक्कर देण्यासाठी दोन छावे एकत्र आले, याचा सर्वांना अधिक आनंद आहे. ही लढाई सोपी नाही. याचे ज्ञान सर्वांना आहे. ज्ञान (ज्ञानेश नव्हे) असल्यामुळे ही महानगरपालिकेची निवडणूक म्हणावी तितकी सोपी जाणार नाही. एका बाजूला प्रचंड पैशांचा ओघ आहे. त्यामुळे सध्या जे काही कार्यकर्ते किंवा राजकारणाच्या धंद्यात आलेले लोक आहेत ते या पक्षाच्या मागे जायला सुरुवात झाली आहे. या अशा धंदेवाईकांचा अधिक विचार न करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. काही निवडणुका या पैशांसाठी जरी लढल्या गेल्या असल्या, तरी कधीकधी स्वतःचा समाज, समाजातील गोरगरिबांची कामे, स्वाभिमान, कायदा व सुव्यवस्था या सार्‍या गोष्टींचाही विचार करावा लागतो. जे सरकार बलात्कारी सिंगेरला सोडून देते त्या सरकारकडून काय अपेक्षा करायची? याचाही विचार खास करून लाडक्या बहिणींनी करण्याची वेळ आल्यामुळे ही युती झाली आहे. भाजपाच्या भाषेत सांगायचे झाले तर ही खरोखरीची नैसर्गिक युती आहे.
सध्या ही युती मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी झालेली आहे. मुंबईत शिवसेनेची एकहाती सत्ता राहिलेली आहे. त्यांनी केलेली अनेक कामे आजही लोकांच्या मनात आहेत. मुंबई सर्वांना राहण्यासाठी योग्य शहर असल्याची जी काही कारणे आहेत, त्यात यांनी केलेले कामही महत्त्वाचे आहे. इतकी वर्षे सत्ता राखूनही या महानगरपालिकेची स्वतःची 90 हजार कोटी रुपयांची मुदत ठेव होती, हे कोणालाही मान्य करावे लागेल. ती नंतर युतीच्या सरकारने मोडून खाण्याचा सपाटा लावला आहे, हा भाग वेगळा. मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनातील अनेक कामे ही महापालिकेच्या शिस्तीमुळे पूर्ण होतात. देशातील सर्वाधिक कचरा संकलन व त्याची विल्हेवाट याच शहरात लावली जाते. देशातील सर्वांत मोठे भुयारी गटारांचे जाळे याच शहरात आधी ब्रिटिशांनी व नंतर शिवसेनेने तयार केले. ते सांभाळले. देशात सर्वाधिक चांगली आरोग्यसेवा पुरवणारी जर कोणती महानगरपालिका असेल तर ती केवळ मुंबईचीच आहे. सर्वांत प्रभावी अशी परिवहन व्यवस्थाही मुंबईनेच दिली. पाच रुपयांत प्रवासासारख्या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मोठी सेवा देऊ शकणारी ही एकमेव महानगरपालिका असेल. शहरात विविध कामे सातत्याने करणारी व स्वतःच्या पैशांतून कोस्टल रोड प्रकल्पासारखी योजना उद्धव ठाकरे यांच्याच कल्पनेचे फळ आहे. कोविड काळात या मुंबईत जे काम झाले ते इतर कोणत्याही शहरात झाले नाही. कोट्यवधी लोकांच्या घरोघरी जाऊन केलेल्या तपासण्या असोत किंवा कोविड सेंटरच्या माध्यमातून केलेले उपचार असोत, या सार्‍या कामात त्यांनी जे केले त्याची दखल राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली. याच पक्षाच्या सामाजिक शिस्तीच्या देणगीमुळे आजही या राज्यात महिला अगदी रात्री-बेरात्रीही एकट्या फिरू शकतात. हे सारे याच पक्षाच्या इतक्या वर्षांच्या मेहनतीचा परिपाक आहे. शिवसेनेवर आता अनेक आरोप केले जात असले तरी त्यांचे काम कोणीही दुर्लक्षून चालणार नाही.
शिवसेनेच्या या कामावर कडी करण्यासाठी भाजपाने आता मोठी रणनीती आखली आहे. धारावी प्रकल्पापासूनच त्यांना शिवसेनेची सत्ता नको आहे. आरेचे जंगल तोडण्यासाठी त्यांनी जे केले ते सार्‍या जगाला माहीत आहे. त्यामुळे आता इथे शिवसेनेच्या विषयी लोकांच्या मनात नाराजी आहे असे दाखवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यातील सर्वांत मोठी फोडा व झोडा नीती त्यांनी आखली आहे ती मराठी- अमराठी वाद काढून. अमराठी लोक शिवसेनेच्या राज्यात असुरक्षित राहतात, असा कांगावा त्यांनी सुरू केला आहे. त्यामुळे अमराठी मतांचे ध्रुवीकरण होईल. किमान तसे दिसून येईल व नंतर आपोआप मतांचे राजकारण करता येईल, असा त्यांचा होरा आहे. मुंबईत यावेळी भाजपाकडून सर्वाधिक अमराठी लोकांना उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे एक होते की, मतदारयादीत अमराठी मतांची संख्या वाढवून इतर निवडणुकीप्रमाणेही काम करता येणे शक्य होणार आहे. ते त्यांचे राजकारण आहे. राजकारणात मते एकतर आपल्या सामाजिक प्रतिष्ठेवर मिळवता येतात किंवा ती नसली तर मग अशा विविध कल्पना व संस्थांना हाताशी धरून मिळवता येतात.
शिवसेनेसाठी ही लढाई सोपी नाही. त्यांना आधी त्यांच्याविषयीचा अपप्रचार खोडून काढावा लागेल. त्यानंतर भाजपाच्या पैशांच्या शक्तीच्या विरोधात लढावे लागेल. शिवसेनेला मुंबईत मोठी पारंपरिक मते आहेत. त्यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी त्यांनी शिंदे यांना हाताशी धरलेले आहे. त्यामुळे अनेक मराठी मतांचे विभाजन होऊ शकेल. हीच गोष्ट शिवसेनेच्या मतदारांनी समजण्यासारखी आहे. त्यानंतर काही मतदारसंघांत एकाच नावाच्या उमेदवारांना उभे करण्याची खेळी खेळली जाईल. शिवसेनेच्या मतांची विभागणी करण्यासाठी आर्थिक प्रलोभने देऊन काही उमेदवार उभे केले जातील. प्रचारात गोंधळ केला जाईल. काही जणांच्या विरोधात जुने आरोप पुन्हा निवडणुकीच्या काळात बाहेर काढले जातील. समाजमाध्यमांवर मोठी चर्चा घडवली जाईल. हे सारे काही होणार आहे. शिवसैनिक व मनसैनिकांनी या सार्‍या गोष्टींपासून सजग राहिले पाहिजे. त्यातही या दोन्ही पक्षांनी आपले पोलिंग एजंट आतापासूनच तयार करायला सुरुवात केली पाहिजे. त्यांची नावेही गुप्त ठेवली पाहिजेत. तेलंगणात ज्या प्रकारे काँग्रेसने या पोलिंग एजंटसाठी काही प्रशिक्षण दिले व त्यांची एक संपर्क यंत्रणा उभी केली होती त्याचप्रमाणे काही व्यवस्था या निवडणुकीच्या माध्यमातून उभी केली पाहिजे. इतर प्रचार तर होत राहील. यंदा खरी गरज आहे ती सजग राहण्याची. आपल्या कोणत्या हालचालींमुळे पक्षाचे नुकसान होऊ शकेल, याचा विचार करण्याची. तसे केले नाही, तर आता काहींचा मोठा फायदा होईल. मात्र, यापुढे सामान्य माणसांचे कोणतेही प्रश्न सोडवले जाणार नाहीत. निवडणुका पक्ष, सत्तांमध्ये बदल हे लोकशाहीत नेहमीच होत असते. मात्र, ते लोकशाही तत्त्वाने व्हावे एवढीच सामान्य माणसांची अपेक्षा आहे.

    –  राजेश शिरभाते

Bharat visit

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago