जुन्या वादातून दोन शेजार्‍यांत रक्तरंजित संघर्ष

चाकू, रॉड, काठ्यांचा वापर; दोन्ही गटांचे अनेक जण जखमी; उपनगर पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
शहरातील आगर टाकळी परिसरातील राजवाडा भागात रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जुन्या वादातून दोन शेजारी गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेत चाकू, लोखंडी रॉड, लाकडी काठ्या तसेच फरशीच्या तुकड्यांचा वापर झाल्याचा आरोप करण्यात आला असून दोन्ही बाजूंचे अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसाय करणारे कुमार शिवम जितेंद्र पगारे (वय 23, रा. आगर टाकळी) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या घरासमोरील प्रशांत चंदर लोखंडे यांच्या ‘अनुश्री इंटरप्राइजेस’ या किराणा दुकानासमोर काही जण आरडाओरडा करत होते. यावेळी शिवम यांनी आवाजामुळे त्रास होत असल्याचे सांगितल्याने वाद निर्माण झाला.
त्यानंतर प्रशांत लोखंडे, त्यांचे वडील चंदर लोखंडे आणि भाऊ सनी लोखंडे यांनी शिवम यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या शिवम यांच्या आई मनीषा पगारे व मावसभाऊ अभिषेक घोडेराव यांनाही मारहाण करण्यात आली. तक्रारीनुसार, प्रशांत लोखंडे यांनी शिवम यांच्या मानेवर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. शिवम यांनी वार चुकवल्याने चाकू त्यांच्या डाव्या हाताला लागला, तर अभिषेक यांच्या मनगटालाही दुखापत झाली. पुढे चंदर लोखंडे यांनी लाकडी काठीने आणि सनी लोखंडे यांनी फरशीच्या तुकड्याने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, दुसर्‍या बाजूने चंदर बाबूराव लोखंडे (वय 50, व्यवसाय रिक्षाचालक) यांनी दिलेल्या तक्रारीत वेगळा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते मुलगा प्रशांत याला दुकानावर सोडण्यासाठी गेले असता समोर राहणारा सत्यम बाळू ऊर्फ जितेंद्र पगारे हा मद्यधुंद अवस्थेत आला आणि दुकानामुळे त्रास होत असल्याचे सांगून वाद घातला.
या वादानंतर सत्यम पगारे यांनी घरातून लोखंडी रॉड आणून त्यांच्या डोक्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच शिवम उर्फ नन्ह्या पगारे आणि अन्य व्यक्तींनी लाकडी दांडका व दगडाने मारहाण केली. या घटनेत चंदर लोखंडे जखमी झाले. तसेच संशयितांनी सनी लोखंडे यांच्या मालकीची अ‍ॅक्टिव्हा नुकसान करून नाल्यात ढकलल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
याच गोंधळात मोबाईल फोन व सुमारे तीन तोळ्यांची सोन्याची चैन हरवल्याची तक्रारही करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही गटांच्या तक्रारींवरून पोलिसांनी गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

 

Bloody clash between two neighbors over an old dispute.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *