गुजरातचे भाऊ-बहीण गंभीर जखमी
वणी : प्रतिनिधी
वणी-सापुतारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 953 वर करंजखेड फाट्यानजीक रविवारी दुपारी तीनच्या सुमारास आयशर टेम्पो आणि कार यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की कारच्या चालकाच्या बाजूचा संपूर्ण भाग चक्काचूर झाला. या अपघातात कारमधील भाऊ आणि बहीण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो सापुतारा बाजूकडून वणीकडे येत होता, तर कार सापुताराच्या दिशेने जात होती. करंजखेड फाट्याजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात कारमधील प्रकाशभाई चौधरी (वय 43) आणि जयंतीबेन चौधरी (वय 40) (दोघे रा. कुंडा, पो. साखरपातळ, ता. वघई, जि. डांग, गुजरात) हे गंभीर जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे चालक रंगनाथ भरसट यांनी सहकार्यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्परता दाखवत दोन्ही गंभीर जखमींना तातडीने प्राथमिक उपचारासाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने वणी येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
Eicher truck-car collision near Karanjkhed Phata