आरोग्य

पचनसंस्था व यकृत-पित्ताशयाशी संबंधित कर्करोग

आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पचनसंस्था व यकृत-पित्तमार्गाशी संबंधित कर्करोगांचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. यामध्ये अन्ननलिकेचा, जठराचा, मोठ्या आतड्याचा, पित्ताशयाचा आणि स्वादुपिंडाचा कर्करोग यांचा समावेश होतो. दुर्दैवाने, सुरुवातीच्या अवस्थेत हे कर्करोग फारशी ठळक लक्षणे देत नाहीत, त्यामुळे अनेक रुग्ण उशिरा निदान होऊन गंभीर अवस्थेत तज्ज्ञांकडे पोहोचतात. मात्र, चांगली बाब म्हणजे योग्य वेळी लक्षणांची दखल घेतली आणि आवश्यक तपासण्या केल्या तर हे कर्करोग सुरुवातीलाच ओळखता येऊ शकतात व अनेक वेळा पूर्णपणे बरेही होऊ शकतात. त्यामुळे जनजागृती, वेळेवर निदान आणि नियमित तपासणी यांना अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे.
काही सुरुवातीची धोक्याची लक्षणे वेळेत ओळखणे आवश्यक आहे. गिळताना त्रास होणे, अन्न अडकण्यासारखे वाटणे, वारंवार जळजळ किंवा उलट्या होणे, भूक मंदावणे, वजन झपाट्याने कमी होणे, पोटात सतत दुखणे, शौचाच्या सवयी बदलणे, शौचात रक्त येणे किंवा काळसर शौच होणे, सतत बद्धकोष्ठता किंवा जुलाब, अचानक कावीळ होणे, त्वचा पिवळी पडणे, अंगाला तीव्र खाज येणे, पाठीकडे जाणारी पोटदुखी किंवा अनपेक्षित वजन घटणे ही लक्षणे गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. विशेषतः वयाच्या 45 ते 50 वर्षांनंतर अशी लक्षणे आढळल्यास किंवा कुटुंबात कर्करोगाचा इतिहास असल्यास विलंब न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
या कर्करोगांचे लवकर निदान आणि तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे. सतत जळजळ होणे, गिळण्यास त्रास, रक्ताची कमतरता, काळसर शौच, वजन कमी होणे किंवा वारंवार उलट्या होत असल्यास अन्ननलिका व जठराची दुर्बिणीद्वारे तपासणी करणे आवश्यक ठरते. या तपासणीमुळे अन्ननलिका व जठरातील सुरुवातीचे बदल, व्रण, गाठी किंवा कर्करोगाचे प्रारंभिक टप्पे ओळखता येतात. त्याचप्रमाणे वयाच्या 45 वर्षांनंतर, विशेषतः मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असल्यास किंवा शौचात रक्त, सतत बद्धकोष्ठता, वजन कमी होणे किंवा रक्ताची कमतरता असल्यास मोठ्या आतड्याची दुर्बिणीद्वारे तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. या तपासणीमध्ये कर्करोग होण्यापूर्वीच्या गाठी काढून टाकता येतात, ज्यामुळे भविष्यातील कर्करोग टाळता येऊ शकतो. आई-वडील, भाऊ-बहीण किंवा जवळच्या नातेवाइकांमध्ये मोठ्या आतड्याचा, जठराचा किंवा स्वादुपिंडाचा कर्करोग असल्यास अशा व्यक्तींमध्ये धोका तुलनेने जास्त असल्याने तपासणी लवकर सुरू करणे गरजेचे असते.
प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय आहे. तंबाखू, धूम्रपान, गुटखा व मद्यपान टाळणे, जास्त तेलकट, साठवून ठेवलेले व करपलेले अन्न कमी खाणे, ताज्या भाज्या व फळांचा आहारात समावेश, वजन नियंत्रण, नियमित व्यायाम तसेच मधुमेह व लठ्ठपणावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. दीर्घकाळ जळजळ होणे, जिवाणूजन्य जठर संसर्ग, यकृतामध्ये चरबी साचणे, पित्ताशयातील खडे, स्वादुपिंडाचा दीर्घकालीन दाह किंवा आतड्यांशी संबंधित जुनाट दाह असलेल्या रुग्णांनी नियमित तपासणी करून घ्यावी. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, कर्करोग सुरुवातीच्या अवस्थेत निदान झाल्यास अनेक वेळा शस्त्रक्रिया न करता दुर्बिणीद्वारेच उपचार करता येतात. अन्ननलिका व जठराच्या सुरुवातीच्या कर्करोगामध्ये विशेष तंत्रांच्या सहाय्याने कर्करोग पूर्णपणे काढून टाकणे शक्य असते, तर मोठ्या आतड्यातील सुरुवातीचे बदल किंवा गाठी तपासणीदरम्यानच काढता येतात. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, वेळेवर तपासणी करा आणि कर्करोगावर मात करा, हा संदेश प्रत्येकाने लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

Cancers related to the digestive system and liver and gallbladder

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मोहाडीत मोहाडमल्ल महाराजांची शतकाची रोठ परंपरा

लोकसहभागातून साडेतीन लाखांचा रथ; आज भव्य मिरवणूक दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामदैवत श्री…

17 hours ago

सिंहस्थाच्या नावाने त्र्यंबकेश्वरचे रस्ते गाळात

ओव्हर स्मार्ट नियोजनामुळे नागरिक अन् भाविक हैराण त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर…

17 hours ago

पावसा पावसा… तू पण!

नाशिक शहर आणि सभोवतालच्या परिसरात मागील महिन्याभरात धो..धो.. पाऊस बरसला आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यात…

17 hours ago

अब्दुल्लांचे आंदोलन

कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनात 20 जुलै रोजी प्रचंड हंगामा झाला. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी…

17 hours ago

जीवघेणे खड्डे !

पाच जणांचा मृत्यू; नागरिकांमध्ये प्रचंड संताप नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात हजारो कोटी…

17 hours ago

खड्डेमुक्तीसाठी मंत्री महाजनांचा सात दिवसांचा अल्टिमेटम

अन्यथा अधिकार्‍यांवर कारवाई, ठेकेदारही रडारवर नाशिक : प्रतिनिधी वर्षभरात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने शहरात रस्ते…

17 hours ago