महापालिका शाळांचा होणार कायापालट

साडेअकरा कोटी खर्च निश्चित, नऊ कोटी निधी प्राप्त

नाशिक : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंंतर्गत नाशिक महापालिकेच्या शाळांचा कायापालट होणार आहे. या योजनेंंतर्गत काही शाळांच्या आधुनिकीकरणासाठी 11 कोटी 47 लाख 6 हजार 721 रुपये एवढा खर्च निश्चित करण्यात आला आहे. दरम्यान, शासनाकडून नऊ कोटींचा निधी महापालिकेला मिळाला आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून नाशिक महापालिकेला नऊ कोटी आठ लाख 93 हजार 829 रुपये इतका भरघोस निधी प्राप्त झाला आहे. प्रकल्पाचा उर्वरित खर्च पूर्ण करण्यासाठी नाशिक महानगरपालिका आपला स्वनिधीचा वाटा म्हणून दोन कोटी 38 लाख 12 हजार 892 रुपये खर्च करणार आहे. या निधीतून प्रभाग 18 मधील मनपा शाळा क्र. 49, पंचक आणि मनपा शाळा क्र. 18, आनंदवल्ली या दोन शाळांचा मॉडेल स्कूल म्हणून सर्वांगीण विकास केला जाणार आहे. या निधीतून दोन्ही शाळांच्या जुन्या इमारतींचा कायापालट करून तिथे नूतन व भव्य इमारतींचे बांधकाम केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येचा विचार करून अतिरिक्त आणि प्रशस्त नवीन वर्गखोल्या बांधल्या जातील. या शाळा केवळ सिमेंटकाँक्रीटच्या इमारती न राहता, त्या स्मार्ट होणार आहेत. प्रत्येक वर्गात डिजिटल बोर्ड, प्रोजेक्टर आणि आधुनिक शैक्षणिक उपकरणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

हायटेक कॉम्प्युटर लॅबसह मिळणार सुविधा

विज्ञानाची गोडी लागावी यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा, संगणकीय ज्ञानासाठी हायटेक कॉम्प्युटर लॅब आणि वाचनाची आवड जोपासण्यासाठी समृद्ध ग्रंथालय व अभ्यासिका विकसित करण्यात येणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी सुसज्ज क्रीडांगण, पिण्याच्या पाण्याची शुद्ध यंत्रणा आणि स्वतंत्र स्वच्छतागृहांची सुविधाही या आराखड्यात समाविष्ट आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेमुळे महापालिका शाळांचा कायापालट होणार आहे. शासनाचा निधी आणि महापालिकेचा निधी याद्वारे विद्यार्थ्यांकरिता आधुनिक व सुसज्ज अशा शाळा बांधल्या जाणार आहेत.
– डॉ. मीता चौधरी, प्रशासन अधिकारी, मनपा

Municipal schools will be transformed.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *