नाशिक

छठपूजेने गोदाघाटावर कुंभमेळ्याची अनुभूती!

मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण; भव्य देखाव्यांनी वेधले लक्ष

पंचवटी : प्रतिनिधी
सूर्योपासना, श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम असलेल्या छठ महापर्वानिमित्त रविवारी (दि.15) गोदाघाटावर उत्तर भारतीय बांधवांचा जनसागर उसळला होता. लाखावर भाविकांच्या उपस्थितीमुळे रामकुंडासह संपूर्ण गोदाघाट परिसराला कुंभमेळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. सायंकाळी मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करण्यासाठी महिला व पुरुष भाविकांनी नदीपात्रात गर्दी केली होती. पारंपरिक पूजासाहित्य, उसाचे तोरण, फळांनी सजविलेल्या टोपल्या आणि भक्तिमय वातावरणामुळे गोदाकाठ छटमातेच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
उत्तर भारतीय बांधवांचा महत्त्वाचा धार्मिक उत्सव असलेल्या छटपूजेच्या निमित्ताने सकाळपासूनच गोदाघाटावर भाविकांची वर्दळ सुरू झाली होती. दुपारनंतर गर्दीत मोठी वाढ झाली. रामकुंड, लक्ष्मणकुंड, गांधी तलाव, धनुषकुंड, सीताकुंड, दुतोंड्या मारुती परिसर तसेच गाडगे महाराज पुलाच्या पुढील नदीपात्रापर्यंत भाविकांनी पूजा करण्यासाठी गर्दी केली होती. व्रतस्थ महिला व पुरुषांनी कमरेइतक्या पाण्यात उभे राहून मावळत्या सूर्याची मनोभावे पूजा केली. ऊस, नारळ, विविध फळे, ठेकुआ आणि पूजासाहित्याने सजविलेल्या सूप व दउर्‍याच्या माध्यमातून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्यात आले. त्यानंतर छठीमय्याची आरती करण्यात आली.
चार दिवस चालणार्‍या या महापर्वाची सुरुवात शुक्रवारी (दि. 13) नहाय-खाय विधीने झाली. शनिवारी (दि.14) खरना विधी पार पडला. रविवारी सायंकाळी अस्ताचलगामी सूर्याला पहिले अर्घ्य अर्पण करण्यात आले. व्रतस्थ महिला व पुरुष रात्रभर उपवासाचे व्रत सुरू ठेवणार असून, सोमवारी (दि.16) पहाटे उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण केल्यानंतर व्रताची सांगता होणार आहे.
कुटुंबाच्या सुख-समृद्धीसह संततीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सर्वांच्या कल्याणासाठी या वेळी प्रार्थना करण्यात आली. यावेळी महापौर हिमगौरी आहेर-आडके, खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, उपमहापौर विलास शिंदे, मच्छिंद्र सानप, माजी आमदार बाळासाहेब सानप, के. सी. पांडे, मनीष मिश्रा, गणेश गिते, माजी उपमहापौर गुरमित बग्गा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हिरालाल परदेशी, संतोष कोकाटे, मदन जाधव, प्रकाश चव्हाण, श्याम विश्वकर्मा, जयकृष्ण दवे, अयोध्या यादव, भरत जोशी, रवी सोनार यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

शिवतांडव, राधा-कृष्ण अन् माँ कालीचे देखावे
छठपूजेनिमित्त गणराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पंचवटी यांच्या वतीने श्री चक्रधरस्वामी मंदिराजवळ, गांधी तलाव परिसरात भव्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात भगवान श्री राधा-कृष्ण यांचा मनमोहक देखावा, भगवान शंकर व माता पार्वती यांचे दिव्य स्वरूप, शिवतांडव नृत्याचे विशेष सादरीकरण आणि माँ कालीचा भव्य देखावा भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. भोजपुरी भजन आणि कीर्तनाने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.

पोलिसांचा चोख बंदोबस्त
छठपूजेनिमित्त गोदाघाटावर भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता पंचवटी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली. तसेच वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले. गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रमुख मार्गांवर विशेष लक्ष देण्यात आले.

 

Chhath Puja brings the experience of a Kumbh Mela to the Goda Ghat!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दिवे उजळले, पण श्वास कोंडला!

- अश्विनी पांडे निसर्गाची मुक्त उधळण, आल्हाददायी हवामान, हिरवळ आणि तुलनेने शुद्ध हवा ही नाशिकची…

15 hours ago

सभागृहातील सत्तेच्या विकेंद्रीकरणाला ‘ब्रेक’!

- गोरख काळे येत्या महासभेत स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा सोपस्कार पार पडणार असून, महापौर हिमगौरी आहेर-आडके…

15 hours ago

‘धरती आबा’ बिरसा मुंडा

अन्यायाविरुद्ध पेटलेला स्वाभिमानाचा अग्निकुंड! - ग्रीष्मा नागमोती ज्या भूमीवर पिढ्यान्पिढ्या वास्तव्य केले, ज्या जंगलांनी जगण्याचा…

15 hours ago

संकटातून संधीकडे…

दुष्काळावर मात करणारा जलसंधारणाचा ’पेठ पॅटर्न’ - देवयानी सोनार यंदा पावसाची अवकृपा झाल्याने नाशिक जिल्ह्यातील…

15 hours ago

दिवाळीतील एक्यूआय समजून घेऊया…

सध्या एक्यूआय अर्थातच ’एअर क्लॉलिटी इंडेक्स’ आणि त्यावरील आकडेमोड मीडियातील सर्वांत महत्त्वाची बातमी बनवून राहिली…

15 hours ago

इस्रायली सत्तासंघर्ष

आशिया खंडातील पश्चिम भागात असलेला इस्रायल हा एक छोटा देश आहे. पॅलेस्टाइनवरील ब्रिटिश राजवट संपुष्टात…

15 hours ago