डिजिटल युगातील बालपण हरवत चालल्याची चिंताजनक बाब निदर्शनास येत आहे, आजचे युग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आहे. मोबाइल, इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता, सोशल मीडिया आणि डिजिटल शिक्षणामुळे जग जवळ आले आहे. माहितीचा महासागर एका क्लिकवर उपलब्ध झाला आहे; परंतु या चमकदार डिजिटल क्रांतीची एक गंभीर आणि शांतपणे वाढणारी किंमत समाजाला मोजावी लागत आहे ती म्हणजे मुलांचे निसर्गापासून वाढते दुरावलेपण.
एक काळ असा होता की मुलांचे बालपण अंगणात, मातीमध्ये, झाडांच्या सावलीत, नदीकाठी आणि मैदानी खेळात फुलत असे. घराबाहेर जा आणि खेळून ये हे वाक्य प्रत्येक घरात ऐकू येत असे. आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. मोबाईल घे आणि शांत बस हे आधुनिक पालकत्वाचे नवीन वास्तव बनले आहे. ते नाकारून चालणार नाही. दोन तीन वर्षांच्या लहान मुलांच्या हातातसुद्धा मोबाइल सहज दिसतो. जेवताना, रडताना, झोपताना किंवा प्रवासात मोबाईल हा मुलांचा सततचा साथीदार झाला आहे.
बालपण पूर्णपणे बदलून गेले आहे. पूर्वी मुलांचे खेळ शारीरिक हालचालींनी भरलेले असायचे लपाछपी, लगोरी, कबड्डी, क्रिकेट, विटीदांडू, दोरीउड्या, झाडांवर चढणे, सायकल चालवणे इत्यादी. हे सर्व खेळ निसर्गाच्या सान्निध्यात खेळले जात होते. या खेळांमधून शरीराचा व्यायाम, धैर्य, टीमवर्क, सहकार्य, सहनशीलता आणि नेतृत्वगुण विकसित होत असत. आजचे मूल मात्र स्क्रीनवर बोट फिरवत आभासी जगात रमलेले दिसते. गेम्समध्ये लेव्हल वाढत आहेत; पण वास्तविक जीवनातील अनुभव आणि भावनिक परिपक्वता कमी होत चालली आहे. निसर्गाशी नाते तुटत चालले आहे.
आज अनेक मुलांना निसर्गातील चिमणीचा आवाज ओळखता येत नाही, झाडांची नावे माहित नसतात, मातीचा वास अनुभवण्याची सवय नसते किंवा सूर्यास्त शांतपणे पाहण्याचा संयमही उरलेला नाही. ही परिस्थिती केवळ सांस्कृतिक बदल नसून भावनिक आणि जैविक तुटलेपणाचे लक्षण आहे.
मोबाइलचे मानसिक परिणाम भयंकर वाढत आहे. मोबाइलचा अतिवापर मुलांच्या मेंदूच्या विकासावर परिणाम करतो. सतत बदलणारे व्हिडिओ, रील्स आणि गेम्स मेंदूला झटपट उत्तेजना देतात. त्यामुळे मुलांची एकाग्रता कमी होते. अभ्यासात मन लागत नाही. संयम आणि प्रतीक्षा करण्याची क्षमता घटत आहे. लहान वयातच चिडचिडेपणा, अस्वस्थता, हट्टीपणा आणि आक्रमकता वाढताना दिसत आहे. ज्या डोळ्यांनी निसर्ग पहायचा आहे त्याच डोळ्यांना मोठं मोठे भिंगाचे चष्मे लागले आहे.
अनेक मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, सतत स्क्रीनसमोर राहणार्या मुलांमध्ये सामाजिक संवाद कमी होतो. प्रत्यक्ष मित्रांपेक्षा आभासी मित्र वाढतात. भावना व्यक्त करण्याची क्षमता कमी होते. काही मुलांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव, नैराश्य, एकटेपणा आणि चिंता यांसारख्या समस्या वाढताना दिसत आहे.
मोबाइलवरील हिंसक गेम्स आणि वेगवान कंटेंट मुलांच्या मनावर खोल परिणाम करत आहे. वास्तव आणि आभासी जगातील सीमारेषा धूसर होत आहे. काही मुले भावनिकदृष्ट्या असंवेदनशील बनत आहे तर काही सतत उत्तेजना शोधणारी होत आहे. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात खेळण्यास प्रवृत्त करणे.
निसर्गापासून दूर आणि स्क्रीनजवळ राहणार्या मुलांमध्ये अनेक शारीरिक समस्या वाढत आहेत. त्यात स्थूलपणा, डोळ्यांचे विकार, झोपेचे त्रास, मान व पाठदुखी शारीरिक तंदुरुस्ती कमी होत आहे, रोगप्रतिकारशक्ती घटत आहे. निसर्गातील सूर्यप्रकाशाचा अभाव असल्याने व्हिटॅमिन ’डी’ची कमतरता वाढत आहे. दिवसभर घरात बसल्याने शरीराची नैसर्गिक हालचाल कमी होत आहे. परिणामी मुलांचे आरोग्य लहान वयातच बिघडू लागले
आहे.
निसर्गाचे मुलांच्या जीवनातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. निसर्ग हा मुलांसाठी फक्त मनोरंजन नसून एक जिवंत विद्यापीठ आहे. झाडे मुलांना शांतता आणि संयम शिकवतात. पक्षी स्वातंत्र्याची जाणीव करून देतात. नदीप्रवाह हा सतत पुढे जाण्याचा संदेश देत असतो. पाऊस आनंद शिकवतो, तर माती वास्तवाशी जोडून ठेवते.
वैज्ञानिक संशोधन सांगते की, हिरवाईत वेळ घालवल्याने ताण कमी होतो, मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि मानसिक आरोग्य सुधारते. निसर्गाच्या सहवासात राहणारी मुले अधिक सर्जनशील, संवेदनशील आणि आनंदी असतात. त्यांच्यात निरीक्षणशक्ती, कल्पनाशक्ती आणि भावनिक स्थैर्य अधिक विकसित होते. निसर्गाच्या सानिध्यात मुलांना ठेवण्याची जबाबदारी ही पालकांची आहे. आज पालकांनी स्वतःच्या सवयींकडेही पाहण्याची गरज आहे. अनेकदा पालक स्वतः सतत मोबाईलमध्ये व्यस्त असतात आणि नकळत मुले त्याच वर्तनाचे अनुकरण करतात. मुलांना वेळ देणे, त्यांच्यासोबत खेळणे, फिरायला जाणे आणि निसर्गाशी जोडणे ही आधुनिक पालकत्वाची खरी गरज आहे. त्यासाठी घरात काही नियम तयार करता येतील, जेवताना मोबाइल बंद ठेवणे, रात्री ठराविक वेळेनंतर स्क्रीन बंद करणे, आठवड्यातील एक दिवस डिजिटल फ्री डे ठेवणे, दररोज किमान एक तास मैदानी खेळासाठी देणे, कुटुंबासोबत बाग, डोंगर, शेत किंवा निसर्गभ्रमण करणे.
शाळा आणि समाजाची भूमिकादेखील महत्त्वपूर्ण आहे, शाळांनी केवळ गुणांवर भर न देता मुलांच्या जीवनकौशल्यांवरही लक्ष दिले पाहिजे. पर्यावरण शिक्षण केवळ पुस्तकापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष अनुभवात्मक बनवले पाहिजे. वृक्षारोपण,शालेय बाग, पक्षीनिरीक्षण, ट्रेकिंग, शिबिरे आणि मैदानी उपक्रम यामुळे मुलांचा निसर्गाशी भावनिक संबंध तयार होतो. शहरीकरणामुळे मोकळी मैदाने कमी होत आहेत. त्यामुळे समाज आणि प्रशासनाने मुलांसाठी सुरक्षित खेळाची मैदाने, उद्याने आणि हिरवळीचे क्षेत्र जपणे अत्यंत आवश्यक आहे. त्यावर अतिक्रमण करू नये.
या डिजिटल युगात संतुलन ही काळाची गरज आहे. मोबाइल पूर्णपणे चुकीचा नाही. योग्य वापर केल्यास तो शिक्षण, ज्ञान आणि संवादासाठी उपयुक्त साधन आहे. प्रश्न मोबाइलचा नसून त्याच्या अतिरेकाचा आहे. जेव्हा स्क्रीन मुलांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनते आणि निसर्ग, खेळ, नाती व अनुभव यांची जागा घेते, तेव्हा समस्या निर्माण होते. आज गरज आहे ती डिजिटल संतुलनाची. मुलांनी तंत्रज्ञान शिकावे, पण त्याचबरोबर झाडांशी, मातीशी, पावसाशी, सूर्याशी आणि वास्तव जीवनाशी नातेही टिकवावे. कारण निसर्गातील नैसर्गिक जीवनातच मुलांचे भवितव्य आहे.
जर मुलांचे बालपण स्क्रीनमध्येच बंदिस्त झाले, तर भविष्यात आपण तांत्रिकदृष्ट्या प्रगत पण भावनिकदृष्ट्या रिकामा समाज निर्माण करू. मोबाईल माहिती देऊ शकतो, पण जीवनाची खरी अनुभूती निसर्गच देऊ शकतो. म्हणूनच प्रत्येक पालक, शिक्षक आणि समाजाने मुलांना पुन्हा निसर्गाच्या कुशीत नेण्याचा प्रयत्न करणे ही आजची सर्वांत मोठी सामाजिक गरज आहे. कारण हिरवाईत वाढलेले बालपणच निरोगी, संवेदनशील आणि आनंदी भविष्य घडवू शकते. पुन्हा नव्याने मुलांचा निसर्गाशी तुटलेला सहवास जोडूया आणि या नव्या पिढीचे उज्ज्वल भविष्य घडवूया..!
Children’s connection with nature is broken due to mobile phones
मालेगावला डॉ. डांगेंसह चार डॉक्टरांना अटक मालेगाव : प्रतिनिधी शहरातील सटाणा नाका परिसरातील एका खासगी…
तंत्रज्ञान, डिझाइनचा अनोखा संगम; 11 जून रोजी उद्घाटन सोहळ्यात होणार वापर मेक्सिको सिटी : फिफा…
नवजात बालक गोणीत भरून नेण्यास सांगितल्याचा आरोप मालेगाव : प्रतिनिधी शहरातील मच्छी बाजार परिसरातील सिद्दिकी…
15 जूनपर्यंत पेरण्या न करण्याचे शेतकर्यांना आवाहन मुंबई : राज्यात मान्सून दाखल झाला आहे. तळकोकणाच्या…
नवी दिल्ली/मुंबई : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढता खर्च आणि पश्चिम आशियातील तणावाचे कारण देत तेल…
मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…