आजोळ माझं फार छान
किती गावे त्याचे गुणगान
आहे सभोवती हिरवे रान
मिळे तिथे सार्‍यास मान….
‘आजोळ’ कुणाकुणास आठवले…आठवले ना..? चला मग पटकन आजोळी…सुट्टी लागली की लगेच मामा मला व आईला आजोळी घेऊन जाण्यासाठी यायचा…आजही आठवते मला तेच आजोळ… आजी-आजोबांचे प्रेम, मामा-मामीचे लाड, मावशीचा माझ्यावरील जीव, किती किती मजा यायची आजोळी..सुट्टी कधी संपून जायची हेसुद्धा कळत नव्हते..रोज अंगणात खाट टाकून शीतल शांत चांदण्या रात्री झोपायचे…एकटक नभाकडे पाहून चांदण्या न्याहाळत बसायचे…थंडगार हवा त्यात झोप कधी लागायची समजतदेखील नव्हते…भल्या पहाटे आजी उठून अंगण झाडून देत असत, मामी त्यावर सडा मारून रांगोळी टाकत असत..नेहमी प्रमाणे मामा गुरांचे शेण पाणी आवरून मग आजीकडे चहा व नास्तासाठी येत असे…हे सारे मी पहाटेच्या थंडगार हवेत अंगावरील आजीच्या उबेच्या गोधडीतून न्याहाळत असे…तिकडून आवाज आला..“गण्या उठ आता किती वेळ पडशील खाटेवर” ? “सूर्य उगवला बघ कधीचाच…” तुला जायचे ना मामासोबत रानात..? पटकन तयार व्हायचे ना..? एका वर एक किती ते प्रश्न आईचे…“हो आई, उठतो उठतो..लगेच तयार होतो मी..गण्याचे आईला उत्तर…”
पटकन उठायचे मस्त अंगणातच उघड्यावर अंगोळ करायची, टॉवेल अंगाला गुंढळून अर्धा तास तसेच बसायचे…परत आईचा आवाज…अरे ! उठ लवकर किती वेळ नागडा बसशील गण्या..मग काय पटकन तयार व्हायचे आणि ताव मारायचा जेवणावर…चुलीवरच्या गरमागरम बाजरीच्या भाकरी सोबत लसणाची चटणी व सोबत कांदा फोडून पोटभर नास्ता करायचा…त्यानंतर एक वाटी ताजेताजे दही खायचे…“हळूहळू जेव, लई घाई नको उगा…ठसका जाईल नाही तर…”परत आईचेच सांगणे…हो गं बाई…“किती काळजी घेतली तू…” मोठा झाला आता गण्या…मग काय… सारे आवरून झाले की मामाच्या मुलांसोबत व पाळलेल्या खंड्या सोबत…“खंड्या म्हणजे कुत्रा बरं…” खूप जीव त्याच्यात सगळ्यांचा..पटकन जाऊन बैलगाडीत बसायचे…
शेतात आले की डोळ्याला सगळीकडे कसे हिरवेगार दिसायचे…भुईमुगाच्या शेंगा, ऊस, कांदे, मका, सोयाबीन, बाजरी, ज्वारी व भाजीपाला सगळे असायचे मामाच्या शेतात… शेताच्या बांदावर लावलेली चिकू, पेरू, अंजिरची झाडे तर विचारायलाच नको…हात पुरेल इतक्या खाली असायची फळे… मला आजही आठवते शेतातील मोठमोठी आंब्याची, चिंचेची व नारळाची झाडे तर शेताची शोभाच वाढवत असत…
जवळच असलेल्या लिंबाच्या झालाखाली एक मस्त टुमदार झोपडी होती, त्यात शेतीची अवजारे देखील ठेवलेली असायची…मस्त एक मातीची चूल…पाण्याने भरलेला भलामोठा काळा माठ “किती मस्त थंडगार पाणी” फिके पडत असे फ्रिजचे पाणी त्यापुढे….
मामाने आमच्यासाठी आंब्याच्या जाडसर फांदीला एक झोका बांधून दिला होता…आम्ही सारी मुले दम लागेपर्यंत तिथे झोके खेळायचो…दमलो की मस्त त्याच झाडाखाली झोप ठोकायचो…उन्ह कमी झाल्यावर मग बाभळीच्या झाडाचा डिंक काढून तो जमवायचा..आवळीच्या पानाच्या पिपाण्या बनून त्या वाजवत फुलपाखरांमागे धावायचे व त्याला अलगदपणे पकडून आणायचे…त्याचे मागे तासन्तास हिंडायचे… “तिकडून लगेच मामीची आरोळी, अरे पोरांनो झाले की नाही तुमचे खेळून” चला आता पटकन संध्याकाळ झाली, घरी जायला हवे ना..?, “हो मामी, लगेच आलो फक्त थोडे झोके खातो अजून.”
गुरांसाठी डोक्यावर चारा घेऊन मामी बैलगाडीकडे यायच्या आधीच आम्ही सारे बैलगाडीत बसायचो…घरी आल्यावर अंगणातील थंडगार पाण्याने भरलेल्या हौदात उड्या टाकून मस्त एक तासभर पोहायचे…अरे गण्या, मन्या, चिऊताई झाले की नाही तुमचे पाण्यात डुंबून.. चला पटकन, चहा प्यायचा ना तुम्हाला..? लगेच आईच्या आरोळ्या सुरू व्हायच्या..सारे मग एका ठिकाणी जमायचे दिवसभराच्या गप्पा टप्पा व्हायच्या, मुलांना सगळेच विचारत असत, मग काय.. “कसा गेला आजचा दिवस” केली की नाही रानात मजा…मग काय, सगळेच सांगावे लागे आजी-आजोबांना…मध्येच खूप हासी मजाक व्हायची…मामा मामीला खूप चिडवत असे…त्यात वेळ कुठे जायचा कळतदेखील नसे…
त्यात मग माझे गाणे सुरू व्हायचे..
झुकझुक झुकझुक आगीनगाडी…
धुरांच्या रेषा हवेत सोडी….
पळती झाडे पाहूया…
मामाच्या गावाला जाऊ या…जाऊ या मामाच्या गावाला जाऊ या…!
चला चला आता गप्पाटप्पा, गाणे, गोष्टी झाल्या असतील तर बसा पटकन पाटावर जेवायला…मामीची गोड हाक…हो मामी बसतो बसतो…. रात्रीचे जेवण मस्त अंगणातच व्हायचे…तिथेच जेवणाची पंगत बसायची…वा..!! काय चव असायची त्या जेवणाची चुलीवरच्या भाकरी, पिठले, खिचडी, ठेचा, कैरी, पापड..आले ना पानी तोंडाला…? आलेच असेल…मला तर खूप मजा यायची…असे वाटायचे की सुट्टी लवकर संपूच नये…. रुजकर पाहुणचार झाला की, मग लगेच मस्त खाटेवर लोळायचे आजोबांना लाडी गोडी लावायची, आजोबा आजोबा गोष्टी सांगा ना आम्हाला….त्यात आजोबांच्या अटी शर्ती..माझ्या पाठीवर कोण पाय देईल…जो पटकन माझी पाठ दाबून देईल त्यालाच मी चॉकलेट देईन व खूप गोष्टीपण सांगीन..मग काय चॉकलेटसाठी तर रांगच लागायची…आजोबांची पाठ चेपून झाली की, रंगायच्या मग आजोबांच्या अकबर आणि बिरबलाच्या गोष्टी…एक, दोन, तीन, चार…बापरे!! इतक्या गोष्टी ऐकता-ऐकता कधी झोप लागायची समजतदेखील नव्हते…पुन्हा दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळी आई व आजीच्या त्याच आरोळ्या “अरे पोरांनो उठा लवकर, सूर्य आला डोक्यावर, किती वेळ झोपून राहता…” गरम गरम चुलीवरचे दूध प्यायचे ना…? की दूध काला खायचा…अभ्यास नाही करायचा बरं का पोरांनो… सुट्टी आहे ना तुम्हाला असं आजोबा बोलत असे… मग काय फक्त दंगा मस्ती आणि मजाचं मजा…हेच असते म्हणे आजोळ… बर कारे पोरांनो आमचेदेखील आजोळ असेच होते, आम्ही पण तुमच्या सारखीच धमाल करत होतो.. आजी बोलली…
आजही आठवते मला माझे आजोळ…आजीचे ते बोल…पण आता तिथे, ना उरले आजी- आजोबा, ना राहिली झोपडी, ना राहिली खाट, ना राहिले अंगण, ना राहिला झोका आणि माझी आवडती बैलगाडी..
झोपडी जाऊन तिथे सजला सिमेंटचा बंगला, बैलगाडीच्या जागी आले, चार चाकी ट्रॅक्टर…गेले ते आजोळ राहिल्यात फक्त आठवणी व म्हातारे झालेले मामा मामी….पुन्हा येतील का ते दिवस…? नाही ना? पण देवा..!! आजही हवे मला माझे तेच आजोळ व त्यातील गोड अविस्मरणीय आठवणी…

To my uncle’s village

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

6 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

6 hours ago