तिबेटच्या सीमेला लागून असलेला अरुणाचल प्रदेश आमचाच आहे, असा दावा चीन करत आला आहे. चीनने अरुणाचलला ’झांगनान’ असे नाव दिलेले आहे. अरुणाचलला लागून असलेल्या सीमेवर चीनने पुन्हा एकदा कुरापत काढल्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर परिस्थिती संवेदनशील आहे. दुर्गम सीमा भागात दोन्ही देशांचे सैनिक अनेक ठिकाणी आमनेसामने आले आहेत. तेथे चकमक झाल्याचे वृत्त नाही; परंतु भारताने खबरदारी म्हणून शौर्य कमांडोज आणि ड्रोनद्वारे कडक पाळत ठेवली आहे. तिबेट हा एक स्वायत्त भूभाग होता, त्याला चीनने कधीही मान्यता दिली नाही. सन 1914 साली ब्रिटिश भारत, चीन आणि तिबेट यांच्यातील सीमा निश्चित करण्यासाठी सिमला येथे परिषद झाली. ब्रिटिश भारताचे परराष्ट्र सचिव मॅकमोहन यांनी परिषद बोलावली होती. परिषदेत भारत आणि तिबेट दरम्यानची 890 किमीची सीमा निश्चित करण्यात आली. तिला मॅकमोहन रेषा म्हटले जाते. या रेषेला चीनने आधी मान्यता दिली होती; परंतु नंतर नकार दिला. तिबेट हा चीनचाच भूभाग असल्याने मॅकमोहन रेषेला मान्यता देण्याचा प्रश्नच नाही, असा पवित्रा चीनने घेतला होता. सन 1985 मध्ये चीनने आपली भूमिका आणखी आक्रमक करत अरुणाचल प्रदेशातील तवांगच नव्हे, तर संपूर्ण अरुणाचल प्रदेशावरच दावा ठोकला. भारताने हा दावा नेहमीच फेटाळून लावला आहे. चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटला लागून असलेल्या अरुणाचलला चीन दक्षिण तिबेट (झांगनान) म्हणून समजत आहे. अरुणाचलमध्ये चीन नेहमीच कुरापती काढत असतो. भारताच्या अनेक भागांत विशेषतः लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. सन 2020 मध्ये लडाखच्या गलवान खोर्यात चिनी सैनिकांनी घुसखोरी केली होती. त्यावेळी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये मोठा संघर्ष झाला होता. भारताचे 20 सैनिक शहीद झाले, तर चीनने चार सैनिक मृत झाल्याचे म्हटले होते. एका आंतरराष्ट्रीय अहवालानुसार चीनचे 45 सैनिक मरण पावले. मात्र, चीनने याची पुष्टी केलेली नाही. अरुणाचलच्या सीमेवर गलवानसारखी परिस्थिती नाही. तीन महिन्यांपासून म्हणजे जुलै 2026 पासून दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने आहेत. सीमेवर वेगळे काही घडल्याची माहिती उशिरानेच लोकांपर्यंत पोहोचते. सीमेवर दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने आल्याची माहिती इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) दलाचे महासंचालक शत्रुजीत कपूर यांनी जाहीरपणे दिली. जुलै 2026 पासून अरुणाचल प्रदेशात अनेक चकमकी झाल्याचे त्यांनी म्हटले असल्याचे वृत्त आहे. राजस्थानमधील अलवर येथील सेंट्रल ट्रेनिंग कॉलेजमध्ये आयोजित हिमवीर सन्मान सोहळ्यात जवानांना संबोधित करताना कपूर यांनी ही माहिती अधिकृतपणे दिली. आयटीबीपीच्या 65 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट कामगिरी करणार्या जवानांना महासंचालक प्रशंसा पदकाने सन्मानित करण्यासाठी हा सोहळा 22 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. चिनी सैन्याने भारतीय जवानांना त्यांच्या पारंपरिक गस्तीच्या ठिकाणांपर्यंत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. चिनी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आत (6 ते 7 किमी आत) तंबू ठोकल्याचे समोर आले होते. परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारताने नव्याने तयार केलेली शौर्य कमांडो तुकडी तैनात केली. त्यांनी सीमेवर चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिले, असेही कपूर यांनी सांगितले. चीनच्या कुरापतींना भारताकडून क्लीन चिट दिली जाते, असा विरोधी पक्षाचा आरोप आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या परिस्थितीला अत्यंत चिंताजनक म्हटले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही सरकारवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील उच्चस्तरीय राजनैतिक बैठकांनंतरही सीमेवर असा तणाव का सुरू आहे, असा प्रश्न खरगे यांनी उपस्थित केला. सरकार सीमेवरील नेमकी परिस्थिती देशातील नागरिकांपासून लपवत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. त्यांनी सरकारकडे सीमेवरील सद्यःस्थितीबाबत संपूर्ण पारदर्शकता आणि स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. एका बाजूला चीन सीमेवर घुसखोरी आणि तणाव निर्माण करत असताना, दुसरीकडे भारताचे चीनसोबतचे व्यापारी संबंध आणि आयात का वाढत आहेत, यावरही विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. विरोधी पक्षांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजपा आणि सरकारनेही खुलासे केले. सीमेवर दोन्ही बाजूंच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या वेगवेगळ्या समजुतींमुळे असे स्थानिक वाद होत असतात. याचा अर्थ दोन्ही देशांमध्ये मोठे युद्ध किंवा व्यापक संघर्ष सुरू झाला आहे, असा होत नसल्याचे भाजपा नेते नलिन कोहली यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जात नाही; परंतु सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी लष्करी कमांडर पातळीवरील चर्चा आणि द्विपक्षीय यंत्रणांचा प्रभावी वापर केला जात आहे, असे सरकारने म्हटले आहे. चीनचे सैन्य निर्धारित गस्त पद्धतीपासून विचलित झाल्यास भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती वेळोवेळी बिघडते, असे भारताने स्पष्ट केले. सीमावर्ती भागात शांतता आणि स्थैर्य राखणे हे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असल्याचेही भारताने नमूद केले. तथापि, चिनी सैनिक घुसखोरी करत असतील, तर ती गंभीर बाब आहे. सीमेवर परिस्थिती सामान्य नाही, हे मान्य करावे लागते. कपूर यांनी तसे सूचितच केले
आहे. सीमेवर सैनिक आमनेसामने येत असल्याची माहिती बाहेर आल्यानंतर
सीमा संरक्षणाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. विरोधी पक्षाने सरकारला जाब
विचारला असला आणि सरकार व सत्ताधारी पक्षाने खुलासा केला असला, तरी देशाच्या सीमांवर नेमके काय घडत आहे, याची माहिती देशवासीयांना सरकारने दिली पाहिजे. लडाख जितका संवेदनशील तितकाच अरुणाचल प्रदेश संवेदनशील आहे. कारण हा प्रदेश आमचा असल्याचा चीनचा दावा आहे. या प्रदेशाला लागून असलेल्या सीमेवर तणाव असला, तरी प्रत्यक्ष हिंसक चकमकी झाल्या नाहीत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत दोन्ही देशांचे परस्परविरोधी दावे असल्याने दोन्ही देशांची गस्तीपथके अनेकदा आमनेसामने येतात. पण चिनी सैनिक भारतीय हद्दीत घुसखोरी करून राहुट्या उभ्या करतात. यावेळीही त्यांनी तसे केले असल्यास ती बाब गंभीर म्हणता येते. म्हणून सीमावर्ती भागांतील हालचालींकडे दुर्लक्ष करणेही परवडणारे नाही. भारताचे परराष्ट्र मंत्रालय या परिस्थितीवर राजनैतिक आणि लष्करी माध्यमांतून चर्चा सुरू असल्याचे सरकारकडून सांगितले जात असले, तरी घुसखोरी करून भारतीय हद्दीत तंबू उभारून त्या भागावर दावा करणे ही चीनची जुनी खोड आहे.
Chinese provocations
- प्रा. राजेंद्र आढाव युक्रेनमध्ये रशियाविरुद्धच्या युद्धात अत्यंत महत्त्वाचा ठरलेला एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीचा…
- सीमाताई मराठे ज्या वयात तरुणांच्या हातात बचत, गुंतवणूक आणि भविष्याची सुरक्षितता असायला हवी, त्या…
- राजेश शिरभाते एकावेळेस कोणी आपल्या प्रचारावर कोट्यवधी रुपये खर्च करतो, तर एखादा तरुण त्याचे…
देशाची प्रगती मोजताना अर्थव्यवस्थेचा आकार, अन्नधान्याचे उत्पादन, महामार्गांची उभारणी आणि तंत्रज्ञानातील प्रगती यांचा अभिमानाने उल्लेख…
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये होणार्या…
1,245 कोटींपैकी अवघी 191 कोटींची वसुली पाच महिन्यांत वसुलीचे आव्हान नाशिक : प्रतिनिधी शहरातील घरपट्टी…