गणेशोत्सव तोंडावर आला आहे, गणपती बाप्पाच्या आगमनासाठी गावी जाणार्या विशेषतः कोकणवासीयांची लगबग चालू आहे. गणेशोत्सव आणि कोकणवासीयांचे एक भावनिक नाते वेगळेच आहे. कोकणवासीयां बरोबरच राज्यात अनेक ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि जो तो आपल्या घरी जाऊ इच्छितो. दरवर्षी कोकणवासीयांना आशा असते ती सुखकारक, किफायतशीर आणि वेळेत प्रवास होण्याची. मात्र, दरवर्षी कोकणवासीयांच्या पदरी निराशाच पडते.
गेल्या पंधरा-सोळा वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे रुंंदीकरण होता होईना. दरवेळेस कुठे ना कुठे माशी शिंकते आणि काम पूर्ण होत नाही. आतातर खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीच हात टेकले आहेत. 95 टक्के काम पूर्ण झाल्याचे दावे होत असले तरी अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. म्हणूनच मंत्री गडकरी यांनी मी उउद्घाटनाला जाणार नाही, असे जाहीर करून टाकले आहे. याउलट आता काही ठिकाणी टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. रेल्वे कितीही अधिकच्या गाड्या सोडण्याचे दावे करत असली, तरी एका मिनिटाच्या आत आरक्षण फुल होते आणि लांबलचक वेटिंग लिस्ट लागते. एकीकडे ही परिस्थिती, तर दुसरीकडे एखाद्या राजकीय नेता, पक्ष यांच्यासाठी मात्र अख्खी रेल्वेगाडी उपलब्ध होते आणि सोडली जाते, हे नेमके काय गौडबंगाल आहे? एसटीदेखील शेकडो बसेस सोडते. मात्र, त्या अपुर्या पडतात म्हणून खाजगी ट्रॅव्हल्सने जावे तर खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांना तर गणेशोत्सव ही लुटीची पर्वणी ठरते.
सरकार, प्रशासन, परिवहन विभाग केवळ कागदी घोडे नाचवते यापलीकडे काही होत नाही. खाजगी ट्रॅव्हल्सचा महागडा प्रवास सुरक्षित होईल याची शाश्वती नाही. काही वर्षांपूर्वी रो-रो सेवा सुरू केली होती. मात्र, खर्चिक आणि लागणारा वेळ यामुळे रो-रो सेवेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मुंबई-गोवा महामार्गाचे रुंंदीकरण कधी होईल हे कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. मात्र, लवकरच पूर्ण होईल असे दावे-प्रतिदावे सगळेच करतात. त्यावरून तू तू मैं मैं, राजकारण, आरोप-प्रत्यारोप मात्र सगळेच करतात. एकूणच यावर्षीदेखील कोकणवासीयांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन खड्डेयुक्त रस्तावरूनच होणार आहे. आतातर कुंभमेळा होऊ घातला आहे. त्यावेळी वाहतुकीचे नियोजन नेमके कसे असेल? एकीकडे गणेशभक्तांची ही परिस्थिती, तर दुसरीकडे मुंबईची लाइफलाइन आणि लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलची परिस्थिती. मुंबईत पश्चिम, मध्य, हार्बर, ट्रान्सहार्बर या चार मार्गांवर, कसारा, डहाणू, कर्जत, उरणपर्यंत लोकल सेवा चालवली जाते आणि या लोकलमधून दररोज जवळपास ऐंंशी लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, कधी रेल्वेसेवा विस्कळीत होते, कधी कामांसाठी घोषित- अघोषित मेगा ब्लॉक घेतला जातो. कधी अपघात घडतो. त्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत होते. मध्य रेल्वेच्या बाबतीत तर रोज मरे त्याला कोण रडे, अशीच परिस्थिती आहे. कल्याणपुढील कसारा, आसनगाव, कर्जत, खोपोली या मार्गावर अगोदरच अपुर्या लोकल सेवा. त्यात गेल्या काही वर्षांपासून साधारण लोकलच्या जागी एसी लोकलचा अट्टाहास. यामुळे नाहक प्रवाशांना वेठीस धरले जाते.
गेल्या काही दिवसांपासून टिटवाळा स्थानकात पंधरा डब्यांच्या लोकल ट्रेनसाठी प्लॅटफॉर्म रुंंदीकरणाचे काम सुरू असल्याने लोकलच्या वेळापत्रकाचा विचकाच झाला आहे. टिटवाळा येथे लोकल उभी करण्यास जागा नसल्याने काही लोकल आसनगाव येथे आणून विशेष लोकल म्हणून सोडल्या जायच्या. मात्र, काही दिवसांपासून या गाड्या कारशेड रेक म्हणून टिटवाळापर्यंत नेल्या जातात. या सगळ्या गोंधळात प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात न घेता रेल्वे प्रशासन आपला अट्टाहास रेटून नेत आहे. काही दिवसांपूर्वीच एक महिला दिवा-मुंब्रादरम्यान लोकलमधून पडली. मात्र, सुदैवाने वाचली. अशा अनेक दुर्घटना आजवर घडल्या आहेत आणि याला कारण म्हणजे, प्रवाशांची वाढती संख्या आणि अपुर्या लोकल फेर्या. त्यातही रेल्वे प्रशासनाकडून आसनगाव, कसारा या भागातील प्रवाशांना सापत्नभावाची वागणूक दिली जाते. आहे त्या लोकलदेखील वेळेवर चालविल्या जात नाहीत. अनेकदा तर लोकल ट्रेन प्लॅटफॉर्मवर उभी ठेवून मेल, एक्स्प्रेस गाड्या पुढे काढल्या जातात. गेल्या काही वर्षांपासून तर याचा अतिरेक झाला आहे. यामुळे या भागातील प्रवाशांमध्येे प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि यामुळे त्याचा उद्रेक कधीही होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. याबाबत ना रेल्वे प्रशासन गंभीर आहे ना शासन-प्रशासन ना या भागातील लोकप्रतिनिधी. प्रवासी, प्रवासी संघटना याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र, रेल्वे प्रशासन काहीच सकारात्मकता दाखवत नाही. या भागातील प्रवाशांनी संयम तरी किती बाळगायचा? या संबंधितांनी विचार करायला हवा. प्रवाशांच्या संयमाचा उद्रेक झाला की प्रवाशांवरच कारवाईचा बडगा उगारला जातो. या भागातील प्रवाशांची परवड थांबणार तरी कधी? प्रवाशांचा संयम सुटत चालला आहे. याची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. एकूणच ऐन सणासुदीला प्रवासी वेठीला, अशी परिस्थिती आहे.
Commuters held to ransom right in the middle of the festive season…