जरांगेंचा मुंबईवर धडकण्याचा निर्धार

जालना/मुंबई : प्रतिनिधी
अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाचा गुरुवारी (दि. 10) तेरावा दिवस होता. उपोषणाने त्यांची प्रकृती खालावत असली तरी जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. सरकारने मागण्यांची तत्काळ अंमलबजावणी न केल्यास, 12 सप्टेंबरला मराठा समाज ’मुंबईवर धडक मारेल’, असा ठाम आणि आक्रमक निर्धार त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्या वतीने मंत्री उदय सामंत यांनी सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्मक असल्याचे सांगत जरांगे पाटील यांना आपले उपोषण मागे घेण्याचे पुन्हा एकदा आवाहन केले आहे.
दुसरीकडे, मराठा-कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रांच्या वाटपाबाबत जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासकीय पातळीवरील महत्त्वाची माहिती दिली. प्रशासनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, जालन्यात आतापर्यंत 18 हजारांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. कुणबी नोंदी रद्द करण्याचे प्रमाण केवळ एक टक्का इतकेच आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी आणि प्रलंबित अर्जांच्या निपटार्‍यासाठी जिल्ह्यात 16 सप्टेंबरपर्यंत विविध मंडळांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याचेही जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.
एकीकडे उपोषण सुरू असतानाच, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी खळबळजनक घडामोड समोर आली आहे. जरांगे पाटील यांचे जुने सहकारी अजय महाराज बारसकर यांनी जरांगे आणि त्यांच्या निकटवर्तीयांविरोधात सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) लेखी तक्रार दाखल केल्याचा दावा केला. आंदोलनाच्या आडून किमान एक हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार, अवैध वाळूतस्करी आणि कोट्यवधींची बेनामी मालमत्ता खरेदी केल्याचा अत्यंत गंभीर आरोप त्यांनी केला आहे. बारसकर यांनी नुकताच मुंबईतील ईडी कार्यालयात जाऊन जवळपास तीन तास आपला जबाब नोंदवल्याचा दावा करत काही कथित पुरावेही सादर केले. मात्र, जरांगे पाटील यांच्या सहकार्‍यांनी हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावत, कोणत्याही चौकशीला आणि ’नार्को टेस्ट’ला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे.

अमृता फडणवीसांनी दिले जेवणाचे आवतन
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ’मनोज जरांगे हे माझे भाऊ आहेत, मी त्यांना घरी जेवायला येण्याचे निमंत्रण देते,’ असे म्हणत एक भावनिक साद घातली आहे. त्यांच्या या आग्रहाच्या निमंत्रणावर मनोज जरांगे पाटील यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली.

भाऊबीजेला जेवायला जाईन : मनोज जरांगे
’ताईंनी मायेने दिलेले जेवणाचे निमंत्रण मी स्वीकारतो, पण सध्या मराठा समाजासाठी माझा संघर्ष आणि आंदोलन सुरू असल्याने मी आता जेवायला येऊ शकत नाही. लढाईच्या मैदानात संकटात असताना भावाला बहिणीने जेवायला बोलावू नये. त्याऐवजी मी भाऊबीजेच्या दिवशी साडी-चोळी घेऊन बहिणीकडे नक्की जेवायला जाईन,’ असा शब्दही जरांगे यांनी यावेळी दिला.

Jarange’s resolve to march on Mumbai

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *