बारामतीत काँग्रेसची माघार पण निवडणूक होणारच!

बारामती : विशेष प्रतिनिधी
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत गुरुवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. ‘राजकीय सुसंस्कृतपणा’ जपण्याच्या भूमिकेतून काँग्रेसने या निवडणुकीतून अखेर आपली माघार जाहीर केली आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आकाश मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून, पक्षाने ही जागा लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, काँग्रेसच्या या निर्णयानंतरही ही निवडणूक पूर्णपणे ‘बिनविरोध’ होण्यात अडथळे कायम आहेत. 53 पैकी 30 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ही लढत महायुतीच्या सुनेत्रा पवार आणि इतर 30 अपक्ष उमेदवारांमध्ये रंगणार आहे.
अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर महायुतीच्या वतीने सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सहकार्याची विनंती केली होती. या विनंतीला मान देऊन आणि दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी सविस्तर चर्चा केल्यानंतर, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ’मोरे’ यांची माघार जाहीर केली. शरद पवार यांनीही काँग्रेसला माघारीचे आवाहन केले होते. सुप्रिया सुळे यांनी नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली होती. रोहित पवार यांनी पार्थ पवार यांच्या वक्तव्याबाबत पवार कुटुंबाच्या वतीने काँग्रेस नेत्यांकडे दिलगिरी व्यक्त करून मनधरणी केली.
काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतल्याने महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत काँग्रेससह इतर सुमारे 30 अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज काढून घेतले आहेत. यामुळे निवडणुकीतील चुरस कमी झाली असली, तरी निवडणूक ’बिनविरोध’ जाहीर होऊ शकलेली नाही.
हे उमेदवार अद्याप रिंगणात
काँग्रेसने माघार घेतली असली तरी, निवडणूक रिंगणात अद्याप काही आव्हानात्मक नावे कायम आहेत. प्रामुख्याने अभिजित बिचुकले आणि करुणा शर्मा यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने बारामतीकरांना मतदानाला सामोरे जावे लागणार आहे.
निवडणूक कार्यक्रम
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आता बारामतीमध्ये 23 एप्रिल 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल आणि 4 मे रोजी निकाल जाहीर केला जाईल.

राहुरीत 7 उमेदवार रिंगणात

अहिल्यानगर : राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. राहुरी मतदारसंघातही काल शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी आपली माघार घेतली असून, 7 उमेदवार रिंगणात कायम आहेत. त्यामुळे कोण होणार राहुरीचा आमदार, याची उत्सुकता आता मतदारसंघात वाढली आहे. राहुरीचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर विधानसभा पोटनिवडणूक होत असून, भाजप महायुतीने अक्षय कर्डिले यांना तिकीट दिले आहे. तर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रामुख्याने या दोन पक्षांतच थेट लढत होत असली, तरीही वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून संतोष चोळके उमेदवार आहेत. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे हेही अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात आहेत.

Congress’s withdrawal from Baramati will still lead to elections!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *